वारणा, मोरणा नद्यांच्या खोर्यात असलेला शिराळा तालुका तसा डोंगराळ, कोकणी वातावरणा, जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्यवृष्टी होणारा हा तालुका डोंगराळच. यामुळे अपुर्या शेतीमुळे गावात घराआड एकजण रोजंदारीसाठी मुंबईत. यामुळे राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या या तालुक्यात चिखलीचे नाईक घराणे आणि कोकरूडचे देशमुख घराणे यांच्यातच राजकीय संघर्ष आतापर्यंत पाहण्यास मिळाला. मात्र, गेल्या निवडणुकीत आमदार नाईक यांनी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचा पराभव करतांना कोकरूडच्या देशमुखाची मदत घेतली होती. याच बरोबर वाळव्यातून आमदार जयंत पाटील यांची मदतही मोलाची ठरली. तथापि, त्यावेळी अपक्ष मैदानात उतरलेल्या महाडिक गटाने ४५ हजाराहून अधिक मतदान घेतले. यामुळे भाजपचा पराभव सहज करता आला. आता हेच महाडिक भाजपच्या तंबूत आहेत. तर दुसर्या बाजूला चिखलीचा नाईक वाडा एकत्र आला आहे. यामुळे यावेळी अटीतटीची लढत अपेक्षित आहे.
हेही वाचा >>> कोल्हापूरमधील काँग्रेसच्या माघारनाट्याने निकालाची समीकरणे बदलणार ?
विश्वास कारखाना, विराज उद्योग समूह या माध्यमातून नाईक यांनी मतदार संघात बस्तान बसवले आहे. मात्र, देशमुखांचा निनाई कारखाना खासगीकरणात गेला. तर नाईक यांच्या सोबत आज असलेले शिवाजीराव नाईक यांचा खासगी साखर कारखाना आर्थिक संकटात सापडला. याचा फायदा आज कोणालाच होत नसल्याचे दिसते. वाकुर्डे योजना बराच काळ रखडली. या योजनेचे पाणी अगदी आष्ट्यापर्यंत आणण्याचे नियोजन आता झाले आहे. यासाठी गेल्या पाच वर्षात झालेले प्रयत्न महत्वाचे ठरले असले तरी पै-पाहुण्याचे संबंध आता कुठल्या पातळीवर जाणार ही शंका सर्वानाच आहे. कारण भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे नात्याने एकमेकांचे साडू आहेत. दोघांच्या पत्नी म्हैसाळचे माजी आमदार स्व.मोहनराव शिंदे यांच्या कन्या आहेत. यामुळे राजकारणात काहीही घडू शकते. वाळवा तालुक्यातील ४८ गावात ज्याचा गवगवा तो गुलालाचा धनी असेच म्हणावे लागेल.