हरियाणात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर इंडिया आघाडीतील मित्रपक्षांनीही काँग्रेसला लक्ष्य केलं होतं. या निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करताना काँग्रेसला अतिआत्मविश्वास नडला, असं आम आदमी पक्षासह इंडिया आघाडीतील इतर पक्षांचं म्हणणं होतं. अशातच आता पुढच्या महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीत हरियाणातील चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत.
या प्रयत्नांचा भाग म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांसाठी ११ निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. याबरोबरच राज्य पातळीवर अन्य दोन निरीक्षकांना नियुक्त करण्यात आलं आहे. याशिवाय जागावाटपातही काँग्रेसकडून समतोल साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत मतभेद होणार नाही, यासाठी काँग्रेसकडून सावध पवित्रा घेतला जातो आहे. हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रातही तिकीट वाटपात गोंधळ होणार नाही, याची खबरदारी पक्षाकडून घेतली जात आहे.
हेही वाचा – महिला नेत्या सरसावल्या! काँग्रेससाठी एक तरी महिला उमेदवार लाडकी बहीण ठरणार का?
ज्या भागात दलित-मुस्लीम मते सर्वाधिक आहेत आणि जिथे लोकसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळालं आहे, त्या जागांवर काँग्रेसने विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला १३ जागांवर, तर भाजपाला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला प्रत्येकी ९ जागांवर विजय मिळाला होता.
यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणाले, हरियाणा आणि महाराष्ट्रातील परिस्थिती खूप वेगळी आहे. मात्र, आम्ही येथील चुकांतून बोध घेतला आहे. जागावाटपाबाबत आमची चर्चा सुरू आहे. मित्रपक्षांना खूश ठेवण्याचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. काँग्रेस नेत्याचं हे विधान राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे.
याशिवाय अन्य एका काँग्रेस नेत्याने सांगितलं की, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी महाराष्ट्रातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. यासंदर्भात विविध बैठकाही झाल्या आहेत. या बैठकांतील चर्चांमध्ये हरियाणातील चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, त्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी जातीने लक्ष घालत आहे.
आम्ही तिकीट वाटपासाठीही विशिष्ट पद्धत अवलंबण्याचा निर्णय घेतला असून तिकीट वाटप करताना उमेदवारांची निवडून येण्याची क्षमता या एकाच निकषाचा विचार केला जाईल, असेही काँग्रेस नेत्याने सांगितलं. तसेच तिकीट मिळालं नाही म्हणून बंडखोरी करणाऱ्यांना रोखण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.
हरियाणात काँग्रेसला बंडखोरीचा मोठा फटका बसला होता. पक्षाचे तिकीट न मिळाल्याने अनेकांनी अपक्ष निवडणूक लढवली होती, त्यामुळे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या मतांमध्ये घट झाल्याचं बघायला मिळालं होतं. परिणामत: अनेक उमेदवारांचा पराभव झाला होता.
महत्त्वाचे म्हणजे हरियाणात जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी काँग्रेसने उशीर केला होता, त्यामुळे तो जाहीरनामा जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी वेळच मिळाला नाही, असा आरोपही काही नेत्यांकडून करण्यात आला होता. यातून काँग्रेसने बोध घेत महाराष्ट्रासाठी लवकरात लवकर जाहीरनामा प्रसिद्ध केला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय लाडकी बहीण योजनेला शह देण्यासाठी काँग्रेसकडूनही लवकरच पाच आश्वासनं दिली जाण्याचीसुद्धा शक्यता आहे.
हेही वाचा – कर्नाटकात भाजपमध्ये घराणेशाहीला प्राधान्य, येडियुरप्पानंतर बोम्मई पुत्राला उमेदवारी
काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील जनतेला पाच आश्वासने देण्याच्या प्रयत्नात आहे. यात रोजगार भत्ता, महिलांना आर्थिक मदत, मोफत प्रवास, मोफत धान्य अशा गोष्टींचा समावेश असेल, असं एका काँग्रेस नेत्याने सांगितलं आहे. तसेच जी पूर्ण होऊ शकतील तीच आश्वासने देण्याचा आमचा प्रयत्न आहे असे ते म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसने २०२२ मध्ये हिमाचल प्रदेशमध्ये अशा प्रकारची आश्वासनं दिली होती, त्याचा फायदाही पक्षाला झाला होता. त्यानंतर तेलंगणा आणि कर्नाटकातही काँग्रेसला यश मिळालं होतं.