सोलापूर : विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच महाविकास आघाडीला प्रचंड धक्का बसला असताना तुलनेने सोलापूर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना साथ दिली आहे. मात्र त्याचवेळी संपूर्ण जिल्ह्यातून काँग्रेस पक्ष हद्दपार झाला आहे. त्याचे खापर ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर फोडले जात आहे.
नवीन वर्षात सोलापूर महापालिकेची निवडणूक लागण्याची अपेक्षा असून त्यादृष्टीने भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. परंतु काँग्रेसची झालेली दयनीय अवस्था पाहिली तर आगामी महापालिका निवडणुकीत या पक्षापुढे कडवे आव्हान असेल.
एकेकाळी काँग्रेसचा मजबूत बालेकिल्ला असलेल्या सोलापुरातून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी ग्रामसभा आणि लोकसभेत प्रतिनिधित्व करीत चार दशके सत्ताकारणात होते. परंतु त्यांच्याच कार्यकाळात पक्षाचा बालेकिल्ला हळूहळू ढासळत गेला आणि भाजपची ताकद वाढत गेल्याचे दिसून येते. काँग्रेसमध्ये स्थानिक नेतृत्व एकापाठोपाठ एक लुप्त होत गेल्याने पक्षाला शिंदे कुटुंबीयांवरच सर्वस्वी अवलंबून राहावे लागत आहे. परंतु मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, लोकसभा नेते अशी अनेक उच्च पदे असूनही सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात पक्षाची वाढ न होता उलट खुंटत गेल्याचे पाहावयास मिळते. अलीकडे शिंदे यांच्या कन्या खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे पक्षाच्या स्थानिक राजकारणाची सूत्रे एकवटली आहेत. परंतु त्यांच्याकडूनही पक्षाच्या बळकटीच्या दृष्टीने अपेक्षाभंग झाला आहे. त्याचे प्रत्यंतर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दिसून आले आहे. नेतृत्वाच्या अपरिपक्वतेमुळे पक्षाची धूळधाण झाली असून खासदार प्रणिती शिंदे यांनी यापूर्वी सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघात त्यांच्या विशेष मर्जीतील चेतन नरोटे यांना उमेदवारी दिली असता त्यांची अनामत रक्कमही वाचू शकली नाही. दुसरीकडे सोलापूर दक्षिण मतदारसंघातही अपक्ष धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला असता त्यांचीही अनामत रक्कम गमावली गेली. शहराशी निगडित तीनही विधानसभेच्या जागा भाजपने प्रचंड मतफरकाने जिंकल्या आहेत. या अपयशाचे खापर शिंदे कुटुंबीयांवर फोडले जात आहे.
सोलापूर महापालिकेत यापूर्वी वर्षानुवर्षे काँग्रेसची सत्ता होती. परंतु पक्ष उत्तरोत्तर खिळखिळा होत गेल्याने मागील २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीत पक्षाची पुरती दाणादाण उडाली होती. त्यावेळी एकूण १०५ नगरसेवकांच्या सभागृहात काँग्रेसचे अवघे १४ नगरसेवक निवडून आले होते. भाजपने ४९ नगरसेवक निवडून आणले होते. शिवसेनेचे ११, एमआयएमचे ९, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ नगरसेवक होते. पालिकेत सत्तेत राहिलेल्या भाजपच्या कारभाराबद्दल जनतेत चांगले बोलले जात नव्हते. काँग्रेसने आपली ताकद वाढविणे अपेक्षित असताना त्याकडे नेतृत्वाचे दुर्लक्षच झाल्याचे पाहावयास मिळते. आता महापालिकेची निवडणूक होण्याचे संकेत मिळत असताना त्या दृष्टीने गलितगात्र काँग्रेसला महापालिकेची सत्ता भाजपच्या ताब्यातून हिसकावून घेणे तर दूरच राहील पण निभाव लागणेही कठीण दिसते.