मुंबई : Body Starting: Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha Election 2024 ‘एक मत, दोन आमदार’, या प्रचारामुळे तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे. महाआघाडीचे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील आणि महायुतीचे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार संजय पाटील यांच्यात जोरदार आरोप – प्रत्यारोप होताना दिसत आहे.
संजय पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरताना पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी एक मत संजय पाटील यांना द्या, कवठेमहांकाळ तालुक्यातून मताधिक्य द्या, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे पुत्र राजवर्धन घोरपडे यांना विधान परिषदेवर घेतो, अशी घोषणा करून अजित पवार यांनी प्रचाराचा शुभारंभ केला होता. मतदारसंघात हाच मुद्दा कळीचा बनला आहे. गावोगावी कार्यकर्ते संजय पाटील यांना मतदान केले, तर राजवर्धन घोरपडे यांच्या रुपाने तालुक्याला दुसरा आमदार मिळणार आहे. एक मतदान आणि दोन आमदार, असा प्रचार करीत आहेत.
हेही वाचा >>> भाजपच्या जाहिरातीविरोधात काँग्रेसची तक्रार; चौकशी करण्याचे निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
प्रारंभी रोहित पाटील आणि संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांच्यात लढत होईल, अशी चर्चा होती. पण, रोहित पाटील यांच्या समोर टिकाव लागणार नाही, अशी चिन्हे दिसून लागताच प्रभाकर पाटील यांच्या ऐवजी खुद्द संजय पाटील रिंगणात उतरले. संजय पाटील यांच्या उमेदवारीमुळे या पूर्वी रोहित पाटील यांच्या बाजूने एकतर्फी वाटणारी निवडणूक आता चुरशीची झाली आहे. संजय पाटील यांच्या सोबत माजी मंत्री घोरपडे ताकदीने प्रचार करताना दिसत आहेत. व्यासपीठांवर नेत्यांची गर्दी दिसत आहे.
हेही वाचा >>> ठाण्यातील स्वपक्षीय नाराजांची मुख्यमंत्र्यांकडून समजूत,प्रचाराला लागण्याचे आदेश; केळकर यांनाही कार्यकर्त्यांना जपण्याचा सल्ला
दुसरीकडे रोहित पाटील यांना आर. आर. पाटील यांची पुण्याई कामी येताना दिसत आहे. शांत, तरुण चेहरा म्हणून रोहित पाटील यांना सर्वसामान्य लोकांची सहानुभूती मिळताना दिसत आहे. संजय पाटील अनुभवी, मुरब्बी राजकारणी असल्यामुळे डावपेच, गावनिहाय बैठका, गावोगावचे गट – तट आणि विविध जाती – धर्मांच्या मतदारांची मोट बांधण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. रोहित पाटील यांना अद्याप पर्यंत तरी आपला गट शाबूत ठेवण्यात यश आले आहे. सर्वसामान्य मतदारांना आकर्षित करण्यात त्यांना यश मिळताना दिसत आहे. त्यामुळे नेते संजय पाटील यांच्या सोबत आणि सर्वसामान्य कार्यकर्ते रोहित पाटील यांच्या सोबत, अशी सध्याची स्थिती आहे.
पराभवाचा डाग पुसून काढण्याचा चंग
लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजय पाटील यांचा दारूण पराभव झाला होता. आता तेच संजय पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. संजय पाटील यांना तासगाव – कवठेमहाकांळमध्येही खासदार विशाल पाटील यांच्यापेक्षा कमी मते मिळाली होती. त्यामुळे मतदारसंघातील संजय पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत लागलेला पराभवाचा डाग पुसून काढण्याचा चंग बाधला आहे. संजय पाटील यांनी तासगावात तालुक्यात जोर लावला आहे, तर कवठेमहांकाळ तालुक्यात अजितराव घोरपडे यांनी जोर लावला आहे.