मुंबई : महाराष्ट्र हे देशात सर्वच क्षेत्रांत आघाडीवर असलेले राष्ट्र होते. मात्र भाजपच्या सत्ताकाळात या राज्याची उद्याोग, सेवा क्षेत्रासह सर्वच बाबतीत मोठ्या प्रमाणावर पीछेहाट झाली आहे. कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, गुजरात, हरियाणा या राज्यांच्या दरडोई उत्पन्नाच्या तुलनेतही महाराष्ट्र पिछाडीवर गेल्याची टीका माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी शनिवारी येथे केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिदंबरम यांनी काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयातील पत्रकार परिषदेत बोलताना राज्याच्या आर्थिक घसरणीविषयी तपशीलवार आकडेवारी सांगितली. चिदंबरम म्हणाले, महाराष्ट्र २०१४ च्या आधी सर्वच क्षेत्रांत आघाडीवर होता. महाविकास आघाडीचा अडीच वर्षांचा कार्यकाळ वगळता राज्याची सत्ता भाजपच्या हाती आहे. या काळात राज्य पिछाडीवर गेले असून सकल राज्य उत्पन्न २०२२-२३ ते २०२३-२४ या आर्थिक वर्षात ९.६ टक्क्यांवरून ७.६ टक्के घसरले आहे. राज्याची महसुली तूट एक हजार ९३६ कोटींवरून १९ हजार ५३१ कोटी रुपयांवर तर वित्तीय तूट ६७ हजार कोटींवरून एक लाख १२ हजार कोटी रुपयांवर पोचली आहे. शेती उत्पन्नात ४.५ टक्क्यांवरून १.९ टक्के, सेवा क्षेत्रात १३ टक्क्यांवरून ८.८ टक्के, दळणवळण क्षेत्रात १३ टक्क्यांवरून ६.६ टक्के, बांधकाम क्षेत्रात १४.५ टक्क्यांवरून ६.२ टक्के इतकी घसरण झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचा दर १०.८ टक्क्यांवर गेला आहे. नोकरदारांच्या संख्येत ४० वरुन ३१ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे, तर ४० टक्के लोक स्वयंरोजगार करीत आहेत. राज्यात तलाठी पदासाठी ४८०० पदांच्या भरतीत ११.५ लाख तरुणांनी अर्ज केले होते, तर पोलीस वाहनचालक पदासाठी ११ लाख तरुणांचे अर्ज आले होते.

हेही वाचा >>> लक्षवेधी लढत : ‘शिवसेना- ठाणे’ समीकरण अडचणीत?

महाराष्ट्रातील उद्याोग अन्य राज्यांत

महाराष्ट्रातीत उद्याोग अन्य राज्यांमध्ये गेल्याचा आरोप करून चिदंबरम म्हणाले, रायगडमध्ये होणारा बल्क ड्रग्ज प्रकल्प, तळेगावमध्ये होणारा सेमीकंडक्टरचा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प, नागपूरला होणारा टाटा एअरबस प्रकल्प हे राज्याबाहेर गेले. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मिळणार कुठून, असा सवाल चिदंबरम यांनी केला. महाराष्ट्रातील नागरिकांचे दरडोई उत्पन्नही घटले असून ते वार्षिक एक लाख ५३ हजार रुपये इतके आहे. तर ते तामिळनाडूतील नागरिकांचे एक लाख ६६ हजार रुपये, कर्नाटकचे एक लाख ७६ हजार रुपये तर गुजरातचे सर्वाधिक एक लाख ८२ हजार रुपये आहे. त्याचप्रमाणे राज्यातील एकूण लोकसंख्येच्या १७.४ टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून गेल्यावर्षी महाराष्ट्रात २८५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी मोठ्या संकटात असताना कर्जमाफी देऊन त्याच्यावरचे ओझे उतरविणे आवश्यक असताना महायुती सरकारने ती दिली नाही, असे चिदंबरम यांनी नमूद केले.

‘बटेंगे तो कटेंगे ’ चालणार नाही – राज बब्बर

महाराष्ट्राने सर्व जाती-धर्माच्या लोकांना मान सन्मान आणि रोजीरोटी दिली आहे. लोकांची स्वप्न मुंबईत पूर्ण झाली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राज्यात ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है, तो सेफ है’, यांसारख्या घोषणा देऊन फूट पाडण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अभिनेते राज बब्बर यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राची एक वेगळी ओळख व संस्कृती आहे. त्याला अन्य राज्यातून आलेले नेते धक्का लाऊ शकत नाहीत. भाजपने देशभरात जातीधर्मात फूट पाडून राजकीय पोळी प्रयत्न केला आहे. भाजपमधील अशोक चव्हाण, पंकजा मुंडे, या नेत्यांनी ‘बटेंगे तो कटेंगे ’ घोषणेला विरोध केला आहे. महायुतीमध्ये अशा घोषणांवरुन अंर्तगत वाद सुरू आहे, असा आरोप बब्बर यांनी केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly polls 2024 state economy in decline during bjp rule says chidambaram print politics news zws