बुलढाणा : जिल्ह्यातील सातपैकी सहा जागांवर महाविकास आघाडीचे मतैक्य झाले असले तरी जळगाव जामोद मतदारसंघाचा तिढा कायमच आहे. या जागेसाठी शरद पवार आग्रही असून त्यांनी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याचा आग्रह धरल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे, मागील सलग चार लढतीत दारुण पराभव होऊनही काँग्रेस ही जागा सोडायला तयार नसल्याचे चित्र आहे.
हेही वाचा >>> Maharashtra Election 2024 : तुमसर विधानसभा मतदारसंघात ‘राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी’?
२००४ ते २०१९ दरम्यानच्या चार लढतीत काँग्रेसचा या मतदारसंघात दारुण पराभव झाला आहे. यातील दोन लढतीत तर काँग्रेस चक्क तिसऱ्या क्रमांकावर होती. भारिप बहुजन महासंघाने दोनही लढतीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. रामविजय बुरुंगले सलग दोनदा पराभूत झाल्यावर २०१९ च्या लढतीत काँग्रेसने स्वाती वाकेकर यांना संधी दिली. मात्र, त्या ४० हजारांच्या फरकाने पराभूत झाल्या. विस्कळीत संघटन, गटबाजी, नेत्यांचा सुकाळ, सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेण्याचे धोरण, आंदोलनापासून घेतलेली फारकत, आदी कारणांमुळे काँग्रेस या मतदारसंघात दिवसेंदिवस दुबळी होत राहिली. मात्र, यंदाही काँग्रेस जळगावसाठी आग्रही आहे. यावर कळस म्हणजे, यंदा चार पाच नव्हे तर तब्बल २२ उमेदवार इच्छुक आहेत. बुलढाण्यात पार पडलेल्या मुलाखतींत बहुतेक इच्छुक हजरही होते.
हेही वाचा >>> Maharashtra Election 2024 : तुमसर विधानसभा मतदारसंघात ‘राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी’?
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे बुलढाणा जिल्ह्याशी जुने ऋणानुबंध राहिले असून त्यांचा जिल्ह्यात मोठा चाहता वर्ग आहे. सिंदखेडराजापुरता मर्यादित पक्षाचा विस्तार संपूर्ण जिल्ह्यात करण्याच्या दृष्टीने पक्षाने जळगाववर मागील काही वर्षांपासून लक्ष केंद्रित केले. जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. प्रसेनजीत पाटील यांना पाठबळ दिले. पाटील यांनी मागील वर्षभरात आंदोलनाचा धडाका लावत भाजप आमदार संजय कुटे यांच्या विरोधात आवाज उठवला. जळगाव बाजार समितीचे सलग पाचव्यांदा सभापती असलेले पाटील हे पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष आहेत.
२००९ मध्ये भारिपकडून लढतानाही तुल्यबळ मते मिळवत त्यांचा भाजपचे संजय कुटे यांच्याकडून ४०४७, तर २०१४ मध्ये ४६९५ मतांनी निसटता पराभव झाला होता. त्यानंतर ते राष्ट्रवादीत आले. सिंदखेडराजाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी अनपेक्षितपणे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात जाऊन पक्षाला धक्का दिला. यामुळे आणि मतदारसंघातील अनुकूल स्थितीमुळे शरद पवार जळगावसाठी आग्रही आहेच. हरियाणा राज्यातील पराभवामुळे काँग्रेस ‘बॅकफूट’वर आल्याने राष्ट्रवादी जळगावसाठी आता आक्रमक झाली आहे.