मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ पैकी २२ मतदार संघांवर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला मुंबईत जास्त जागांची अपेक्षा नाही. त्यांनी मुंबईतील पाच ते सहा जागांवर आग्रह धरला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात मुंबईत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभेसाठी जागा वाटपाच्या रणनितीवर चर्चा झाली. मुंबईतील वादातील जागांचा निर्णय दिल्लीतील काँग्रेसचे वरिष्ठ नेते सोडवणार आहे.
हेही वाचा : भाजपची तिसरी यादी जाहीर, विरोधानंतरही जम्मू-काश्मीरमध्ये जुन्या यादीमधील बहुसंख्य नावे कायम
महाविकास आघाडीतील घटक पक्षात मुंबईत शिवसेना ठाकरे गटानंतर काँग्रेसची ताकद आहे. काँग्रेस व ठाकरे गटाने काही मतदार संघावर एकाच वेळी दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीत वादग्रस्त जागांबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील तो मान्य असेल असे राज्यातील काँग्रेस नेत्यांनी मान्य केले आहे. मुंबईतील घाटकोपर पूर्व, कुर्ला, वर्सोवा, जोगेश्वरी, दहिसर, अणुशक्ती नगर, मलबार हिल या सात जागांवर राष्ट्रवादी पवार गट लढवण्यास इच्छुक आहे. मात्र, त्यांना पाच जागांवर समाधान मानावे लागणार आहे. उमेदवारांना प्रचारासाठी योग्य वेळ मिळावा यासाठी यावेळी जागावाटप लवकर होणार आहे.