Maharashtra Assembly Speaker Rahul Narvekar: विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. निवडणुकीत मिळालेल्या बहुमतानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेचं तीन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. या अधिवेशनात आमदारांच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर भाजपाचे नेते तथा आमदार राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदासाठी प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह आदी नेत्यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१ जुलै २०२२ रोजी भाजपाने महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांना पहिल्यांदा नामनिर्देशित केलं होतं. तेव्हा अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. कारण विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांना का निवडलं? याबाबत अनेकांनी वेगवेगळी कारणं उपस्थित केली होती. असं मानलं जातं की या पदासाठी अनुभवी आमदारांची निवड केली जाते. जेव्हा पहिल्यांदा राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली होती.

हेही वाचा : खातेवाटपाच्या पेचामुळे दोन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकावणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाशी भाजपाने सरकार स्थापन केलं होतं. तेव्हा शिवसेनेतील फुटीनंतर दोन गटात घडलेल्या राजकीय घडामोडीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भूमिका देखील महत्त्वाची मानली गेली. यावरून विरोधकांनी भाजपावर टीकेची झोड उठवली होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहानंतर नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचीही चर्चा होती. राहुल नार्वेकर हे पेशाने वकील असून ते देशातील सर्वात तरुण विधानसभेचे अध्यक्ष बनले आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा दुसऱ्यांदा राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुल नार्वेकर हे मुंबईतील कुलाबा मतदारसंघातून पुन्हा निवडून आले आहेत. राहुल नार्वेकरांनी रविवारी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची बिनविरोध निवड होईल हे निश्चित मानलं जात होतं. कारण विरोधकांनी त्यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली.

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला २८८ पैकी २३४ जागा मिळाल्या तर एमव्हीएला ४८ जागा मिळाल्या आहेत. खरं तर राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्षातून राजकारणाला सुरुवात केली होती. त्यांच्यावर शिवसेनेच्या युवा शाखेची जबाबदारी होती. शिवसेनेत असताना नार्वेकर यांचे आदित्य ठाकरे यांच्याशी सलोख्याचे संबंध होते. नार्वेकर यांनी शिवसेनेत अनेकवर्ष काम केल्यानंतर २०१४ मध्ये शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने त्यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.

हेही वाचा : विधानभवन परिसराचा कायापालट, अध्यक्षपदी फेरनिवड होताच राहुल नार्वेकर यांचा पुनरुच्चार; सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर विकास

ऑक्टोबर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल नार्वेकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाने त्यांना कुलाबा मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि ते तेथून विजयी झाले. त्यांची राज्य भाजपाच्या मीडिया प्रभारीपदीही नियुक्ती करण्यात आली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रमुख प्रादेशिक पक्षांमधील मतभेदांमुळे त्यांचा अध्यक्ष म्हणून पहिला कार्यकाळ विशेष आव्हानात्मक होता. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाशी संबंधित पक्षाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या गटांच्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्याचे निर्देश सभापतींना दिले होते.

तेव्हा इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत राहुल नार्वेकर म्हणाले होते की, “ही एक मोठी जबाबदारी आणि आव्हान आहे. मी माझ्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा वापर करेन आणि निष्पक्ष खेळ करेन. कोणताही पक्षपाती राजकारण किंवा पक्षपातीपणा न करता केवळ गुणवत्तेवर आणि वस्तुस्थितीवर आधारित निर्णय घेतला जाईल.”, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये राहुल नार्वेकर यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरी शिवसेना म्हणून निर्णय दिला.

दरम्यान, जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात बंड केलं आणि त्यांच्या आमदारांसह महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले. १५ फेब्रुवारी २०१४ रोजी राष्ट्रवादीत पडलेल्या दोन गटाच्या राजकीय संघर्षांनंतर दोन गटाने एकमेकांविरुद्ध केलेल्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय देताना राहुल नार्वेकरांनी अजित पवार गटच खरी राष्ट्रवादी असल्याचा निकाल दिला होता. दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे संभाव्य उमेदवार म्हणून नार्वेकरांचे नाव चर्चेत होते. मात्र, सर्व पर्यायांचा विचार केल्यानंतर पक्षाने त्यांना दिल्लीला न पाठवण्याचा निर्णय घेतला. यावरून भाजपाचे अध्यक्ष म्हणून त्यांचे महत्त्व अधोरेखित झाले. राहुल नार्वेकर हे राजकीय घराण्यातील आहेत. त्यांचे वडील सुरेश नार्वेकर हे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) माजी नगरसेवक होते. त्यांचा भाऊ मकरंद दुसऱ्यांदा बीएमसीचा नगरसेवक आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते आणि माजी विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर यांचे ते जावई आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly speaker rahul narvekar how is the political journey of rahul narvekar gkt