गडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी जाहीर केल्यानंतर राजकीय पक्षांपुढे आता बंडखोरीचे आव्हान आहे. यात जिल्ह्यातील अहेरी व गडचिरोली या दोन क्षेत्रात डॉ. देवराव होळी आणि अम्ब्रीशराव आत्राम यांची बंडखोरी शमविण्यासाठी भाजपची चांगलीच दमछाक होणार आहे. त्यामुळे यावर देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अहेरी विधानसभा क्षेत्रात आत्राम राजघराण्यात होत असलेल्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागून आहे. येथे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासमोर मुलगी भाग्यश्री आत्राम आणि बंडखोर पुतण्या अम्ब्रीशराव आत्राम यांचे आव्हान आहे. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी दिल्याने भाजपचे माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम नाराज आहेत. त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी केलेले शक्तिप्रदर्शन आणि त्यादरम्यान दिलेले भाषण यावरून ते माघार घेतील याची शक्यता कमीच आहे. पक्षातील वरिष्ठ स्तरावरून मनधरणीचे प्रयत्न सुरू असले तरी ते आपल्या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे अहेरीत महायुतीला याचा फटका बसू शकतो.

आणखी वाचा-“उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणल्यास आत्महत्या करणार,” ब्रिजभूषण पाझारे यांचा इशारा

दुसरीकडे गडचिरोली विधानसभेत भाजपने भाकरी फिरवून विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांचा पत्ता कट केला. त्यांच्याऐवजी डॉ. मिलिंद नरोटे या तरुण उमेदवाराला संधी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या होळी यांनी समर्थकांची बैठक घेत अपक्ष अर्ज दाखल केला. ‘मेक इन गडचिरोली’ उपक्रमात झालेल्या कथित घोटाळ्याचे आरोप, लोकसभेत पक्षविरोधी कारवाया केल्याच्या तक्रारी, आदिवासी समाजाची नाराजी आणि वारंवार केलेले वादग्रस्त वक्तव्य, यामुळे भाजप नेतृत्व त्यांच्यावर नाराज होते. यामुळेच त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. परंतु होळी यांनी अपक्ष अर्ज दाखल करून भाजप नेतृत्वालाच आव्हान दिले आहे. त्यामुळे या दोघांचे बंड शमवण्यासाठी भाजप काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

आणखी वाचा-अपक्ष बिघडवणार पक्षीय उमेदावारांचे राजकीय गणित? चंद्रपूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत ‘उदंड जाहले अपक्ष’

फडणवीस काय भूमिका घेणार?

गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. मागील दोन वर्षात ते बऱ्याचदा जिल्ह्यात आले आहेत. त्यामुळे त्यांचे पक्षातील हालचालींकडे बारीक लक्ष होते. म्हणूनच विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांचा पत्ता कट करण्यात आला. दुसरीकडे अहेरीची जागा महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडे गेली. त्यामुळे अम्ब्रीश आत्राम यांनी बंडखोरी केली. आत्राम फडणवीस यांच्या खास मर्जीतले समजल्या जातात. म्हणून या दोघांची समजूत काढण्यासाठी स्वतः फडणवीस पुढाकार घेऊ शकतात, अशी माहिती आहे. असे झाल्यास होळी आणि आत्राम अर्ज मागे घेतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Story img Loader