औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवरून सोमवारी नागपूरमध्ये मोठा हिंसाचार झाला. असं असताना भाजपा नेते आणि राज्यमंत्री नितेश राणे त्यांच्या वक्तव्यावरून चर्चेत आहेत.
एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व वादावरून संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर कबर हटवण्याच्या मागणीवरून निदर्शने करत असताना पवित्र ग्रंथाची विटंबना झाल्याच्या अफवेमुळे सोमवारी नागपुरात हिंसाचार झाला. हा हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले. दुसरीकडे औरंगजेबाची कबर पाडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांचे नितेश राणे यांनी समर्थन केले आहे.
सोमवारी हिंदू पंचागानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर नितेश राणे उपस्थित होते. यावेळी “मुघल सम्राटाने केलेल्या क्रूरतेची आठवण करून देणाऱ्या सर्व खुणा पुसून टाकल्या पाहिजेत, अशी तीव्र भावना हिंदूंमध्ये आहे, असे राणे यांनी म्हटले. सरकार आपले काम करेल आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आपले काम करावे. बाबरी मशीद जेव्हा पाडली तेव्हा काही एकमेकांशी चर्चा केली नव्हती. मात्र, आपल्या कारसेवकांनी जे योग्य होते तेच केले”, असेही ते यावेळी म्हणाले.
नितेश राणे हे औरंगजेबाशी संबंधित वादाच्या केंद्रस्थानी येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. राणे हे त्यांच्या कट्टर हिंदुत्ववादी राजकारणासाठी ओळखले जातात. तसंच अल्पसंख्याकविरोधी वक्तव्यांसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलसारख्या संघटनांसाठी ते एक लोकप्रिय नेते आहेत.
जून २०२३ मध्ये नितेश राणेंना विरोधकांकडून जोरदार टीका सहन करावी लागली. राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार हे औरंगजेबाचा अवतार आहेत असं वक्तव्य नितेश यांनी केलं होतं. शरद पवार यांनी वाढत्या जातीय तणावावरून महायुती सरकारवर त्यावेळी टीका केली होती. साधारण दोन महिन्यांनंतर, काही तरुणांनी औरंगजेबाचा फोटो त्यांच्या सोशल मीडियावर स्टेटस म्हणून वापरला होता. यावरून राज्याच्या काही भागांत घडलेल्या जातीय घटनांच्या चौकशीकरिता राणेंनी विधानसभेत विशेष तपास पथक स्थापन करण्याची मागणी केली होती.
सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान नितेश राणेंनी पुन्हा या वादात उडी घेत शिवाजी महाराजांच्या सैन्यात एकही मुस्लीम नव्हता असा दावा केला. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्ष राजा असं म्हणणाऱ्यांवरही त्यांनी यावेळी आक्षेप घेतला होता. “छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते. हिंदुत्व अशी असलेली ओळख कमकुवत करता येणार नाही. राजांना धर्मनिरपेक्ष म्हणणारे त्यांची ओळख मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत”, असे राणे यावेळी म्हणाले.
वरिष्ठ नेत्यांनी नितेश राणेंच्या बोलण्याला अद्याप अंकुश का घातलेला नाही असं भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “राजकारणात आपल्याला अनेक रणनीतींचा अवलंब करावा लागतो. शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे नेते अशीच भाषा बोलतात तेव्हा कोणीही त्यांच्यावर भाजपाविरोधी म्हणून टीका करत नाही, तर आपल्याकडे काँग्रेसमधून आलेले आणि भाजपाचे फायरब्रँड बनलेले नितेश राणे नेमकी तीच भाषा बोलत आहेत. शिवाय ते कट्टरपंथीयांच्या मोठ्या गटांना संबोधित करतात.”
राणेंची वादग्रस्त विधानं
लंडनमध्ये उच्च शिक्षण पूर्ण करून नितेश राणे भारतात परतले. २००६ मध्ये त्यांनी वडील नारायण राणे यांच्याबरोबर काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबई युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली, परंतु स्थानिक पक्ष नेत्यांशी झालेल्या मतभेदांमुळे पुढच्याच वर्षी त्यांनी पदाचा राजीनामा दिला. २०१४ मध्ये ते पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विधानसभेवर निवडून आले आणि पाच वर्षांनंतर भाजपा पुन्हा निवडणूक लढवत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
महाराष्ट्र मंत्रिमंडळात सामील होण्याआधी राणेंच्या नेतृत्वाखालील सकल हिंदू समाज या उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी लव्ह जिहाद आणि लँड जिहाद विरोधात मोहीम राबविली. मुस्लीम पुरुष हिंदू मुलींना लग्नाचं आमिष दाखवून त्यांना धर्मपरिवर्तन करण्यास भाग पाडतात, याला हिंदू उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी ‘लव्ह जिहाद’ असे म्हटले. अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांनी हिंदूंची जमीन बळकावत त्यावर मुस्लीम प्रार्थनास्थळं उभारण्याला ‘लँड जिहाद’ असं म्हटलं आहे.
गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये, अहमदनगर इथे दोन सार्वजनिक सभांमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. “जर कोणी आमचे धार्मिक नेते रामगिरी महाराजांविरूद्ध बोलण्याचे धाडस करेल तर आम्ही मशिदींमध्ये घुसून त्यांना (मुस्लिमांना) एकेक करून मारू”, असे त्यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात म्हटले होते. “पोलिसांनी शुक्रवारी विश्रांती घ्यावी, मग आम्ही आमची ताकद त्यांना दाखवू” असेही त्यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते. त्यावेळी रामगिरी महाराज यांच्यावर पैगंबर यांच्याबद्दल कथित अपमानास्पद वक्तव्य केल्याबाबत अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते.
काही महिन्यांपूर्वीच राणे यांनी केरळचा मिनी पाकिस्तान असा उल्लेख करत नवीन वादाला तोंड फोडलं होतं. गेल्याच महिन्यात त्यांनी भाजपात सामील होण्यावरून आणखी एक नवा वाद ओढवून घेतला होता. “जे भाजपा आणि महायुतीच्या विरोधात आहेत, त्यांना विकास निधीतली एकही दमडी मिळणार नाही. मी माझ्या लोकांना अशा गावांची यादी करण्यास सांगितले आहे. जर कोणाला विकास निधी हवा असेल तर त्यांनी भाजपामध्ये सामील व्हावे, असं वक्तव्य त्यांनी सिंधुदर्गातील एका कार्यक्रमात केलं होतं.
अहमदनगरमधील मढी ग्रामपंचायतीने वार्षिक मढीच्या यात्रेत मुस्लीम व्यापाऱ्यांवर बंदी घालण्याचा ठराव केला होता. मात्र, त्यानंतर अहिल्यानगर गट विकास अधिकाऱ्यांनी या ठरावाला स्थगिती दिली होती. स्थगिती देण्याच्या या निर्णयाबाबत राणेंनी या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला होता. “गट विकास अधिकाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की महाराष्ट्रात एक हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आहे. मढी ग्रामपंचायतीने मंजूर केलेल्या ठरावाला तुम्ही स्थगिती दिली असली तरी मी हा ठराव पुन्हा मंजूर करण्याची विनंती गावांना करतो. सर्व गावकऱ्यांनी ठरावावर स्वाक्षरी केली तर गट विकास अधिकारी तो कसा नाकारतील?”, असे यावेळी राणे म्हणाले होते.
गेल्याच आठवड्यात झटका मटण विकणाऱ्या दुकानांना मल्हार प्रमाणपत्र देण्याची घोषणा केल्यानंतर राणे यांना पुन्हा विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागला होता. हे प्रमाणपत्र दिल्याने हिंदूंना आपल्याच समुदायातील लोकांच्या मालकीची मटण विक्रीची दुकानं ओळखण्यात मदत होईल. एका झटक्यात प्राण्याची मान त्याच्या धडावेगळी करण्याची पद्धत म्हणजे झटका मटण पद्धत. या पद्धतीत प्राण्याला बेशुद्धही केलं जातं. या पद्धतीने तयार केलेलं मटण म्हणजे झटका मटण. शीख समुदाय आणि हिंदू समुदाय प्राणी कापण्यासाठी ही पद्धत वापरतात.