BJP chief Chandrashekhar Bawankule: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला सर्वाधिक फटका बसला. ४८ पैकी २८ मतदारसंघात भाजपाचे उमेदवार निवडणूक लढवत होते, मात्र त्यापैकी फक्त नऊ जागांवर त्यांना विजय मिळवता आला. पण, भाजपासाठी यातही दिलासादायक बाब अशी की, त्यांना २६.२ टक्के मतदान मिळाले होते, जे सर्व राजकीय पक्षांच्या तुलनेत अधिक होते. आता विधानसभा निवडणुकीला अवघे दोन आठवडे उरले आहेत. या दोन आठवड्यात महायुतीमधील घटक पक्षांची रणनीती काय? जर सत्ता आलीच तर मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतची भूमिका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये मांडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आल्यास आणि एकनाथ शिंदे यांनी ४० हून अधिक जागा जिंकल्यास त्यांचे मुख्यमंत्रिपद कायम राहणार आहे, असा शब्द भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना दिला आहे का? याबाबत प्रश्न विचारला असता बावनकुळे म्हणाले की, आज तरी आमच्या अजेंड्यावर मुख्यमंत्री कोण होणार हा विषय नाही. इतरही अनेक प्रश्नांवर बावनकुळे यांनी रोखठोक भूमिका मांडली. त्यांची सविस्तर मुलाखत प्रश्नोत्तराच्या स्वरूपात खालीलप्रमाणे.

प्र. महायुतीच्या जागावाटपात भाजपाला केवळ १५२ जागा मिळाल्या आहेत. या आकड्यावर तुम्ही खूश आहात का?

बावनकुळे : तीन पक्ष आघाडीत असताना आम्हाला पुरेशा जागा मिळालेल्या आहेत. २०१९ साली आम्ही २८८ पैकी १६३ जागा लढविल्या होत्या. तेव्हा महायुतीत दोनच पक्ष होते. आता तीन पक्ष आहेत, त्यामुळे १५२ हा काही फार वाईट आकडा नाही. आम्हालाच सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. शिवसेना ८०, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष ५२ जागांवर निवडणूक लढवत आहे. त्यातही भाजपाचे १७ उमेदवार मित्रपक्षातून लढत आहेत. १२ जण शिवसेना, चार जण राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक आरपीआय (आठवले) पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे.

आम्ही महाविकास आघाडीच्या तुलनेत समन्वय आणि एकमताने जागावाटपाचा निर्णय घेतला आहे.

हे वाचा >> अर्ज मागे घेतले नाही तर पक्षाचे दरवाजे बंद; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा बंडखोरांना इशारा

प्र. मोठ्या संख्येने बंडखोरी झाली, त्याचे काय?

बावनकुळे : बंडखोरी दोन्हीकडे झाली आहे. भाजपामधून शिवसेना किंवा राष्ट्रवादीला आव्हान देणारे २७ बंडखोर आहेत, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून भाजपाच्या विरोधात २५ बंडखोर आहेत. आम्ही अनेक उमेदवारांशी चर्चा करून त्यांचा अर्ज मागे घेण्याचा प्रयत्न केला आहे.

प्र. लोकसभेत हाराकिरी झाल्यानंतर तुम्ही काय खबरदारी घेतली?

आम्ही लोकसभेला राष्ट्रीय मुद्दे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लक्ष्य केंद्रित केले होते. मात्र, महाविकास आघाडीने स्थानिक मुद्द्यांना हात घालून लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतीच्या पातळीवर नेऊन ठेवली. दलित आणि आदिवासी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी अपप्रचाराचा वापर केला गेला. मात्र, विधानसभा निवडणूक ही वेगळी असते. संविधानाबाबत विरोधकांनी केलेला अपप्रचार आता उघडा पडला आहे. आता लोकांची सहानुभूती आमच्या बाजूने आहे. ज्या मतदारांनी आम्हाला लोकसभेला मतदान केले नव्हते, तेही आता पश्चाताप व्यक्त करत आहेत. तसेच आमच्या लाडकी बहीण योजनेला अतिप्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे.

पण, निवडणुकीच्या आधी लोकप्रिय योजना जाहीर केल्यामुळे राज्याच्या वित्तीय परिस्थितीवर ताण येत असल्याची चर्चा आहे?

बावनकुळे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे सांगितले आहे. ही योजना महिला सबलीकरणासाठी असून त्याचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. पण, तुम्ही महाविकास आघाडीचा दुटप्पीपणा बघा, ते एका बाजूला योजना मागे घेण्याची भाषा वापरत आहेत, तर दुसऱ्या बाजूला प्रचारात सत्तेत आल्यानंतर योजनेचा हप्ता वाढविणार असल्याचे सांगत आहेत.

प्र. मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचा परिणाम होणार?

बावनकुळे : मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न उचलला, तेव्हा त्यांना मोठा पाठिंबा मिळाला. मात्र, नंतर हे आंदोलन राजकारणात परावर्तित झाले. जेव्हा एखाद्या सामाजिक चळवळीचा ताबा राजकारणाकडे जातो, तेव्हा त्या चळवळीची समाजमान्यता कमी होते. या आंदोलनामागचा उद्देश आता लोकांच्या लक्षात येऊ लागला आहे. जरांगे पाटील हे फक्त भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य करत आहेत.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पहिल्यांदाच (२०१४-१९) मराठा आरक्षण दिले गेले होते. पण, सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकविण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आले. फेब्रुवारी २०२४ मध्ये शिंदे सरकारने मराठा समाजासाठी १० टक्के राखीव जागा ठेवल्या. मराठा आरक्षणाबाबत आम्ही आजही कटिबद्ध आहोत. लोकसभा निवडणुकीत हे समजावून सांगण्यात आम्ही निश्चितच कमी पडलो. सरकार आणि मराठा समाजात सुरू असलेली चर्चा ओबीसी समाजात वेगळ्या पद्धतीने गेली.

आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूनेच आहोत, तरीही ओबीसींच्या राखीव जागांना धक्का लागणार नाही, हेही आम्ही वारंवार स्पष्ट करत आलो आहोत. महायुतीनेच मराठा आणि ओबीसी समाजाला अनेक सुविधा दिल्या असल्याचे आता दोन्ही समाजाला कळून चुकले आहे.

प्र. शरद पवारांच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पश्चिम महाराष्ट्रात चांगली कामगिरी करू शकेल?

बावनकुळे : का नाही? जेव्हा पक्षात फूट पडली तेव्हा ५४ पैकी ४० आमदार अजित पवार यांच्याबरोबर आले. लोकसभा निवडणुकीत आमचा आणि राष्ट्रवादीचा खालच्या पातळीपर्यंत समन्वय होऊ शकला नाही. आता आम्ही घटक पक्षात योग्य तो समन्वय राखला आहे, त्यामुळे राष्ट्रवादीची कामगिरी यावेळी नक्कीच चांगली राहील.

प्र. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेबद्दल काय?

बावनकुळे : महाविकास आघाडीतच शिवसेना (उद्धव ठाकरे) यांना नमते घ्यावे लागले आहे. काँग्रेस आणि शिवसेनेत जागावाटपावरून बराच संघर्ष झाला. १०० हून अधिक जागा किंवा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करणे या त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमुळे शिवसेनेला लाभ झाला होता.

प्र. महायुतीकडून मुख्यमंत्रिपदाचा दावेदार कोण?

बावनकुळे : आम्ही एकसंघ होऊन काम करत आहोत, सध्या आमचे लक्ष्य अधिकाधिक जागा मिळवणे हेच आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra bjp president chandrashekhar bawankule on maharashtra assembly election 2024 manoj jarange patil loses appeal kvg