अकोला : विधानसभा निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांनाच साथ दिली असून नवख्या उमेदवारांना नाकारले आहे. अकोला, वाशीम जिल्ह्यातील आठपैकी पाच जागांवर आमदारांना पुन्हा संधी मिळाली. दोन जागा आमदारांच्या निधनामुळे रिक्त, तर एका जागेवर विद्यमान आमदारांचे तिकीट कापल्याने तीन नव्या आमदारांना विधानसभेची पायरी चढण्याचे भाग्य लाभले आहे. बदल स्वीकारण्यापेक्षा मतदारांनी प्रस्थापितांवरच अधिक विश्वास दाखवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीमध्ये अकोला, वाशीम जिल्ह्यात महायुती व मविआमध्ये चुरशीची लढत झाली. या दोन्ही जिल्ह्यात वंचित फॅक्टर देखील महत्त्वपूर्ण ठरला. आठपैकी भाजपला पाच, काँग्रेसला दोन व शिवसेना ठाकरे गटाला एका जागेवर यश मिळाले. पाच आमदारांना मतदारांनी पुन्हा नव्याने संधी दिली. अकोला पूर्व मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट व वंचित आघाडीला मतदारांनी नाकारले. भाजपचे रणधीर सावरकर यांच्या पारड्यात भरभरून मतदान केल्याने त्यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली. ज्येष्ठ आमदार दिवंगत गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे अकोला पश्चिमची जागा रिक्तच होती. त्यामुळे या ठिकाणी नवा आमदार मिळेल हे निश्चित होते. याठिकाणी ३० वर्षांनंतर परिवर्तन होऊन काँग्रेसचे साजिद खान पठाण विजयी झाले. मूर्तिजापूर मतदारसंघात मतदारांनी बदल नाकारून हरीश पिंपळे यांना विजयाचा चौकार लगावण्यास साथ दिली. अकोटमध्ये भाजपचे प्रकाश भारसाकळे यांना देखील हॅट्ट्रिक साधण्याची संधी मतदारांनी दिली. बाळापूर मतदारसंघ शिवसेनेचे नितीन देशमुख यांनी कायम राखला. अकोला जिल्ह्यातील पाचपैकी चार आमदारांना मतदारांनी पुन्हा स्वीकारले आहे.

हेही वाचा >>> रत्नागिरी जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळण्याची आशा; योगेश कदम यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होणार ? 

वाशीम जिल्ह्यात कारंजा मतदारसंघात भाजप आमदार दिवंगत राजेंद्र पाटणी यांच्या निधनामुळे जागा रिक्त होती. भाजपने राष्ट्रवादीतून आलेल्या सई डहाके यांना उमेदवारी दिली. चौरंगी लढतीत त्यांनी बाजी मारली. त्यामुळे कारंज्याला नव्या आमदार लाभल्या आहेत. रिसोड मतदारसंघात तिरंगी लढतीमध्ये मतदारांनी पुन्हा एकदा काँग्रेसचे अमित झनक यांच्यावरच आपला विश्वास दाखवला. झनक यांनी सलग चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव वाशीम मतदारसंघात भाजपने भाकरी फिरवत लखन मलिक यांना उमेदवारी नाकारली. भाजपची ही खेळी फायद्याचीच ठरली. भाजपचे श्याम खोडे यांच्या बाजूने मतदारांनी कौल दिला. त्यामुळे वाशीमला सुद्धा नवे आमदार मिळाले. वाशीम जिल्ह्यात दोन नवीन, तर एका आमदाराला पुन्हा संधी मिळाली. ज्या मतदारसंघांमध्ये पक्षांनी विद्यमानांना उमेदवारी दिली, त्याठिकाणी मतदारांनी देखील आमदारांना निराश केले नाही. प्रस्थापितांसोबतच मतप्रवाह असल्याचे दिसून आले.

हेही वाचा >>> नाना पटोलेंविरुद्ध विदर्भातूनच मोर्चेबांधणी

बंडोबांची निराशा

विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम, रिसोड, वाशीम, बाळापूर आदी ठिकाणी बंडखोरी झाली होती. मात्र, या सर्वच ठिकाणी मतदारांनी बंडखोरांना नाकारले आहे. अकोला पश्चिम व रिसोड मतदारसंघात बंडखाोरांमुळे समीकरण बदलले. या दोन्ही मतदारसंघांमध्ये बंडखोरांचा महायुतीला जबर धक्का बसून पराभवाचा सामना करावा लागला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra election results 2024 five out of eight mla get chance again in akola and washim districts print politics news zws