महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात मोठा बेबनाव झाला होता, त्यामुळे आघाडीच्या घटक पक्षांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार दिल्याने मतांची फाटाफूट झाल्याने तीन जागा गमवाव्या लागल्या आहेत. त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला एक, शिवसेना (उद्धव ठाकरे) एक आणि काँग्रेसला एका जागेचा फटका बसला आहे.
आघाडीतील जागावाटपात शेतकरी कामगार पक्षाला (शेकाप) अलिबागची जागा सोडली होती. मात्र १५ मतदारसंघांत ‘शेकाप’ने उमेदवार दिले होते, त्यातील बहुतांश मतदारसंघ शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) वाट्याचे होते. रायगड जिल्ह्यातील उरण मतदारसंघात ‘शेकाप’चे प्रितम म्हात्रे यांचा भाजपचे महेश बालदी यांच्याकडून पराभव झाला. या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मनोहर भोईर यांनी ६९,८९३ मते घेतली आहेत.
हेही वाचा >>> समाजात फूट पाडणारी वक्तव्ये केल्याने मतांचे ध्रुवीकरण; शरद पवार यांची टीका
नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्यास गेला होता. येथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे एकनाथदादा पवार १०,९७३ मतांनी पराभूत झाले. या मतदारसंघात ‘शेकाप’ उमेदवार आशाबाई शिंदे यांनी १९,७८६ मते घेतली. धुळे जिल्ह्यातील साक्री मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्यास गेला होता. काँग्रेस उमेदवार प्रवीण चोरगे यांचा ५ हजार मतांनी पराभव झाला. येथे ‘शेकाप’च्या एबी फॉर्मवर सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाने उमेदवारी दिलेल्या यशवंत मलचे यांनी ५,४६८ मते घेतली आहेत.