Maharashtra Elections 2024 : राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच नेत्यांकडून बैठकांचा धडाका सुरु आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा सुरु आहे. दुसरीकडे महायुतीमधील भारतीय जनता पक्षाने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचीही यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीने उमेदवार निवडणुकीत उतरवले आहेत. समाजवादी पक्षाचे (एसपी) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान पाच जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीकडे १२ जागा मागितल्या आहेत. मात्र, महाविकास आघाडीने त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अबू आझमी यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत निवडणुकीत उमेदवार उभे करण्यासासह राजकीय परिस्थितीवर चर्चा केल्याची माहिती सांगितली जाते. पण यावर स्पष्टीकरण देताना आझमी यांनी म्हटलं होतं की, शरद पवारांनी त्यांना महाविकास आघाडीच्या जागावाटप बैठकीसाठी आमंत्रित केले होते. दरम्यान, समाजवादी पक्षाने पाच जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामध्ये धुळे शहर, मानखुर्द शिवाजी नगर, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम आणि मालेगावचा समावेश आहे. तर समाजवादी पक्ष आणखी सात जागांची मागणी करत आहे. त्यामुळे अखिलेश यादव हे आघाडीत दबावाचं राजकारण करत असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा : हरियाणा इम्पॅक्ट, आरक्षण की लोकप्रिय घोषणा; महाराष्ट्र विधानसभेत कोणते मुद्दे प्रभावी ठरणार?

विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष १२ जागांवर दावा करत आहे. पण असं असलं तरी २०१९ मध्ये पक्षाने फक्त चार जागा लढवल्या होत्या आणि त्यातील दोन जागा जिंकल्या होत्या. २०१४ मध्ये एका जागेवर विजय मिळाला होता, तर २००९ मध्ये नवापूरची राखीव जागाही सपाने जिंकली होती. आता सपाने मागितलेल्या १२ जागांपैकी मानखुर्द शिवाजी नगर आणि भिवंडी पूर्व या दोन्ही जागांवर पक्षाचे विद्यमान आमदार आहेत. अबू आझमी हे मानखुर्द शिवाजी नगरमधून तीन वेळा आमदार आहेत, तर सपाच्या रईस शेख यांनी २०१९ मध्ये भिवंडी पूर्वमधून १,३१४ मतांनी शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता.

आता विधानसभेच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाला मुस्लिमबहुल मालेगाव मध्य आणि धुळे शहर मतदारसंघही हवे आहेत. जिथे विद्यमान आमदार एआयएमआयएमचे आहेत. असं असलं तरी सपा या ठिकाणी आपल्या उमेदवार विजयी होईल, असा दावा करत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी (एसपी) आणि शिवसेना (यूबीटी) यांच्या पाठिंब्याने त्या जागा जिंकू शकतात असा विश्वास सपाला असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, सपाच्या यादीत १२ जागांमध्ये भायखळ्याचाही समावेश असल्याचं सांगितलं जातं. त्या ठिकाणी सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आमदार आहे. या मतदारसंघात सपाने या जागेची मागणी केली आहे. २००९ मध्ये सपाने ही जागा लढवली होती. तेव्हा पक्ष ३.१९ टक्के मतांसह सहाव्या स्थानावर होता. त्याप्रमाणे २०१९ मध्ये राष्ट्रवादीने जिंकलेल्या अणुशक्ती नगरमध्येही सपाचा दावा आहे की, लोकांमध्ये त्यांच्याविषयी चांगलं वातावरण आहे. तसेच सत्ताविरोधी लाट असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक मतदार आपल्या पक्षाला साथ देईल. तसेच पक्षाच्या बालेकिल्ल्याजवळ मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघ आहे. मात्र, गेल्या तीन निवडणुकांमध्ये सपाने अणुशक्ती नगरमधून निवडणूक लढवली नाही. तसेच सपाने २०१९ मध्ये वर्सोवा लढवलेले नाही, तर २०१४ मध्ये सातव्या स्थानावर आणि २००९ मध्ये तिसरे स्थान मिळवले होते. पण असं असलं तरी सपाने मुस्लिम आणि ख्रिश्चन या दोघांसह अल्पसंख्याक मतदार आपल्याला साथ देतील, अशी अपेक्षा करत ही जागा मागितली आहे.

हेही वाचा : विदर्भातील भाजपचा माजी मंत्री राष्ट्रवादीकडून लढणार, विद्यमान आमदाराची अडचण

तसेच छत्रपती संभाजी नगर पूर्वची (औरंगाबाद) मागणी करताना पक्षाने कोणतेही कारण दिले नाही. जिथे सपा फक्त २.८४ टक्के मतदान मिळाले होते. २०१९ मध्ये, सपाने आता मागणी करत असलेल्या १२ जागांपैकी फक्त चार जागा लढवल्या होत्या आणि दोन जिंकल्या होत्या. तसेच २०१४ मध्ये सपाने पाच जागा लढवल्या होत्या. २००९ मध्ये सपाने राज्यात लढलेल्या ३१ पैकी चार जागा जिंकून चांगली कामगिरी केली होती.

दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होण्याच्या आधीच सपाने मोठी राजकीय चाल खेळत महाआघाडीत वाटा मिळवण्यासाठी दबावाची खेळी खेळल्याचं बोललं जात आहे. समाजवादी पक्षाच्या एका नेत्याने सांगितलं की, “काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील आघाडीने शेवटच्या क्षणी सपाबरोबर चर्चा सुरू केली होती. मात्र, नंतर त्यांनी माघार घेतली. दरम्यान, उदाहरणार्थ सांगायचं झाल्यास २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादीने सात जागा मागितल्या होत्या. मात्र, तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने फक्त तीन जागा देऊ केल्या होत्या. नामांकन दाखल करण्याच्या ३० मिनिटांपूर्वी काँग्रेसने भिवंडी पूर्व (सपाने मागितलेल्या जागांपैकी एक) उमेदवार उभा केला. काँग्रेसने या उमेदवारामागे भरपूर ऊर्जा आणि संसाधने लावली असूनही सपा उमेदवार विजयी झाला होता”, असं समाजवादी पक्षाच्या एका नेत्याने म्हटलं.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra elections 2024 the samajwadi party announced the list of seven candidates in maharashtra akhilesh yadav gkt