बुलढाणा : विधानसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात घवघवीत यश मिळाले. यात बुलढाणा जिल्ह्याने खारीचा वाटा उचलला. जिल्ह्यातील सातपैकी सहा जागा महायुतीने काबीज केल्या. भाजपचे चारही उमेदवार निवडून आले, तर शिंदे गटाने तीन पैकी बुलढाण्याची एक जागा जिंकून पक्षाची इभ्रत राखली. यामुळे राज्य पातळीवरील नेते प्रारंभी आनंदी झाले, आता मात्र मंत्रिमंडळ निवडीत त्यांची डोकेदुखी वाढली असल्याचे चित्र आहे.
मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी महायुतीच्या जिल्ह्यातील पाचही आमदारांनी जोरदार हालचाली आणि पक्षश्रेष्ठींकडे ‘लॉबिंग’ सुरू केल्याचे वृत्त आहे. बहुतेक नेत्यांनी सध्या मुंबईत मुक्काम ठोकला आहे. मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती, जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे, खामगाव आकाश फुंडकर आणि चिखलीच्या आमदार श्वेता महाले हे भाजपचे चारही आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. यातील संचेती हे सहाव्यांदा निवडून आले आहे. कुटे २००४ पासून सलग पाचव्यांदा विजयी झाले आहेत. फुंडकर यंदा सलग तिसऱ्यांदा आमदार झाले. महाले या सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्याही मंत्रिदासाठी आशा पल्लवित झाल्या आहे. मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘लाडके आमदार’ असल्याने त्यांना राज्यमंत्रिपद मिळण्याची आशा आहे.
हेही वाचा : एकनाथ शिंदे यांचा भेटीगाठीस नकार; आजारी असल्याने राजकीय नेत्यांसह कार्यकर्ते, माध्यमांची भेट टाळली
संचेती यांचा अनुभव मोठा आहे. आजवर त्यांना टाळण्यात आले, मात्र आता किमान त्यांची ज्येष्ठता, निष्ठा लक्षात घेऊन त्यांना मंत्रिपद मिळावे, अशी त्यांची आणि चाहत्यांची अपेक्षा आहे. कुटे फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. फडणवीस यांच्यासोबतचे मधुर संबंध लक्षात घेत त्यांना पुन्हा संधी मिळते की संचेती यांच्या ज्येष्ठतेचा आदर करण्यात येतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. फुंडकर हेही सलग तीनदा निवडून आल्याने त्यांच्या समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुसरीकडे, मंत्रिमंडळात महिलांना स्थान देण्याचे सूतोवाच लक्षात घेता महाले यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा : आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाची सांगता
एकंदरीत, मंत्रिपद देताना भाजप श्रेष्ठींकडून ज्येष्ठता, वैयक्तिक निष्ठा, की धक्कातंत्र यापैकी कशाचा वापर होतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात शिंदे गट बळकट करण्यासाठी गायकवाड यांना संधी मिळते का, याचीही उत्सुकता आहे.