जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरच्या भेटीनंतर महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदासंदर्भात दिल्लीतील नेत्यांचा निर्णय आपल्याला मान्य राहील, असे जाहीरपणे सांगितले असले तरी त्यांची शरीरभाषा आणि मौनाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी “राग तुझा कसला ? महाराष्ट्राचा लाडका भाऊ का रुसला?” अशी कविता तयार करुन एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला आहे.

भाजपकडून पाच डिसेंबर ही सत्तास्थापनेची तारीख जाहीर करण्यात आली असली तरी शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) गोटात अजूनही नाराजी असल्याचे म्हटले जाते. शिंदे गटाला गृहमंत्रिपद देण्यास भाजप तयार नसल्याने सर्वकाही अडून बसल्याचे सांगितले जात असताना या परिस्थितीवर महाविकास आघाडीकडून आता टीका होऊ लागली आहे.

हेही वाचा : संसदेचे अधिवेशन दक्षिणेतील राज्यात घेणे शक्य? डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वाजपेयी यांनी दिला होता पाठिंबा

पत्रिका छापून तयार आहेत. पण नवरदेवच ठरलेला नाही, असे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे. निवडणुकीत महायुतीच्या यशानंतर अनेकांनी मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या; परंतु, सत्ता वाटपाचा तिढा सुटण्याऐवजी नव्या वादांना सुरुवात झाली आहे. खडसेंनी या स्थितीवर भाष्य करत शपथविधी तोंडावर आला तरी मुख्यमंत्री ठरत नाही. ही परिस्थिती महायुतीतील अंतर्गत विसंवाद स्पष्ट करते, असे नमूद केले आहे.

हेही वाचा : मंत्रिमंडळातील नावांवर होणारी चर्चा म्हणजे केवळ अंदाज, छगन भुजबळ यांचा दावा

रुसू बाई रुसू, कोपऱ्यात बसू,

आमच्यासंगे बोला आता ढिश्यू, ढिश्यू, ढिश्यू,

आता तुमची गट्टी फू,

बारा वर्ष बोलू नका कोणी,

चॉकलेट नका दाखवू हं…तोंडाला सुटेल पाणी,

महाराष्ट्राचा लाडका भाऊ का रुसला ?

सांगशील का माझ्या कानी, राग तुझा कसला ?

अशी कविता रोहिणी खडसे यांनी तयार करुन एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला आहे.

Story img Loader