मुंबई : राज्यातील महायुती सरकारचे शेवटचे दिवस उरले असल्याने सरकार धडाधड निर्णय घेत आहे. पण, सध्या सरकारकडे पैसा नाही आणि निवडणूक होणार असल्याने त्याची अंमलबजावणी होणे कठीण आहे. त्यामुळे केवळ मते मिळवण्यासाठी महायुती सरकारची शेवटची धडपड सुरू आहे, अशी टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी बुधवारी येथे केली.
हेही वाचा >>> मंत्रालयासमोर ‘राष्ट्रवादी’ची शांतता पदयात्रा
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने काँग्रेसच्या नेत्यांनी आज मणिभवनला भेट देऊन महात्मा गांधीजींना अभिवादन केले. तसेच चरख्यावर सूत कातून भजन गायनही केले. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना चेन्नीथला यांनी महायुती सरकारवर टीका केली. गांधी विचारच जगाला तारणारा असून धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी गांधी विचार अवलंबावा, असे आवाहन त्यांनी केले.
धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या लोकांनी गांधी विचार आणि गांधीजींनी घालून दिलेल्या अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करावा. सर्वांनी आपापसात न भांडता भाईचारा जपावा. इराण आणि इस्रायलमध्ये आज जे सुरू आहे त्याची जगभर चर्चा होत आहे. अशावेळी गांधींजींनी घालून दिलेला आदर्श आणि अहिंसेचा मार्गच महत्त्वाचा ठरतो, असे चेन्नीथला यांनी सांगितले.