महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यापासून भगतसिंह कोश्यारी यांची वादग्रस्त वक्तव्यं राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत. यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या रोषाचा सामनादेखील राज्यपालांना करावा लागत आहे. राज्यपालांची वादग्रस्त वक्तव्य निस्तरत राहिल्यास आगामी निवडणुकांकडे लक्ष कधी केंद्रित करणार, असा प्रश्न महाराष्ट्र भाजपामधील अनेक नेत्यांना पडला आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजीमहाराजांविषयी केलेल्या वक्तव्यापासून भाजपा नेत्यांनी दूर राहणे पसंत केले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शनिवारी (१९ नोव्हेंबर) मराठवाडा विद्यापीठाकडून मानद डि. लिट पदवी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कुलपती म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी आणि शरद पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजीमहाराजांशी केली. इतकंच नव्हे, तर शिवाजीमहाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचं विधान राज्यपालांनी केलं. या विधानावरुन राज्यात घमासान पाहायला मिळत आहे. या विधानानंतर कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन हटवण्याची मागणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.
केंद्राने राज्यपालांच्या वर्तवणुकीकडे लक्ष दिलं पाहिजे, अशी भावना राज्यातील भाजपा नेत्यांची असल्याचे वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिले आहे. “जेव्हा एखादी व्यक्ती घटनात्मक पदावर असते, तेव्हा वादग्रस्त भाष्य टाळायला पाहिजे. कोश्यारी यांच्या हेतूबद्दल कोणालाही शंका नाही. आम्हाला खात्री आहे की ते शिवाजीमहाराजांना सर्वोच्च मानतात. त्यांचं वक्तव्य मुंबई किंवा मराठी माणसाविरोधात नव्हतं. पण असं वक्तव्य करण्याची गरजच काय होती”, असा सवाल भाजपामधील ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने केल्याचं वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिले आहे.
उद्धव ठाकरेंकडून महाराष्ट्र बंदचे संकेत; म्हणाले, “सॅम्पल घरी पाठवा अन्यथा…”
भगतसिंह कोश्यारी आणि वाद…
भगतसिंह कोश्यारी यांनी आजवर अनेक वादग्रस्त वक्तव्य करत वाद ओढवून घेतला आहे. “गुजराती आणि राजस्थानी लोक मुंबई सोडून गेले असते, तर मुंबईत पैसेच राहिले नसते”, या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. या वक्तव्यामुळे भाजपाला विरोधी पक्षांनी कोंडीत पकडले होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा अनावरण सोहळ्यामध्ये बोलताना सावित्रीबाईंचा विवाह वयाच्या १० व्या वर्षी झाला, असं हसत हातवारे करत सांगताना राज्यपाल दिसले होते. “त्यांचे पती १३ वर्षांचे होते. आता कल्पना करा या वयामध्ये लग्न केलेले मुलं-मुली काय विचार करत असतील,” असं यावेळी राज्यपाल म्हणाले होते. गेल्याच महिन्यात शिवाजी महाराजांवरील आणखी एका वक्तव्यामुळे राज्यपालांवर राज्यातील नेत्यांकडून घणाघाती टीका करण्यात आली होती. “तत्त्वज्ञ-कवी समर्थ रामदास नसते तर शिवाजी कोणालाही माहीत नसते”, असं वक्तव्य कोश्यारी यांनी केलं होतं.