मुंबई : ‘मुख्यमंत्री’ ही केवळ तांत्रिक व्यवस्था असून, मी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांनी महायुती सरकारमध्ये आतापर्यंत एकत्रितपणे निर्णय घेतले आणि पुढेही राज्याच्या प्रगतीसाठी एकत्रित निर्णय घेतले जातील, असे प्रतिपादन नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केले. शिंदे, फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीतील नेत्यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा सादर केल्यानंतर या तीनही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली.
फडणवीस म्हणाले, शिंदे व पवार यांनी मला मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याची विनंती राज्यपालांकडे केली आहे आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांच्या आमदारांच्या पाठिंब्याचे पत्रही दिले आहे. शिंदे यांनी मंत्रिमंडळात राहावे, अशी विनंती मी त्यांना केली आहे व सर्वांचीच तशी इच्छा आहे. निवडणुकीआधी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करू.
यावेळी शिंदे म्हणाले, हे सरकार खेळीमेळीच्या वातावरणात स्थापन होत आहे, याचा आनंद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल, असे मी गेल्याच आठवड्यात जाहीर केले होते. आम्ही तिघांनीही गेल्या अडीच वर्षांत जनतेसाठी बरीच महत्त्वाची कामे केली.
हेही वाचा >>> आज केवळ तिघांचाच शपथविधी? एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सहभागी; महसूल आणि नगरविकास खाती? मंत्र्यांच्या नावांवर खल
कोणीही छोटा किंवा मोठा नव्हता, तर आपण जनतेसाठी काय करणार, हे महत्त्वाचे होते. आम्ही एकत्रित व संघटितपणे काम केले. फडणवीस यांचा पुढील प्रवास राज्याचा विकास करणारा व सर्वसामान्यांना न्याय देणारा असेल.
अजितदादांना सकाळी-सायंकाळच्या शपथविधीची सवय
मुंबई : नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील होण्यावरून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुपारपर्यंत तळ्यात मळ्यात सुरू होते. मंत्रिमंडळात सामील होणार का, अशा प्रश्नांची पत्रकारांनी सरबत्ती केल्यावर ‘सायंकाळपर्यंत थांबा, सारे समजेल’, असे उत्तर शिंदे यांनी देताच ‘मी मात्र शपथ घेणार आहे’, असे अजित पवार तत्काळ म्हणाले. यावर शिंदे यांनी ‘अजितदादांना एकदम सकाळी आणि सायंकाळच्या शपथविधीची सवय आहे’, असा मार्मिक टोला लगावला आणि एकच हास्यकल्लोळ झाला.
मुख्यमंत्रीपदाची पुन्हा संधी न मिळाल्याने आणि भाजप गृहमंत्रीपद देण्यास तयार नसल्याने नाराज असलेले शिंदे हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का, याबाबत प्रश्नचिन्ह असल्याने पत्रकारांनी यासंदर्भात अनेक प्रश्नांचा भडिमार केला. तेव्हा ‘शिंदे मंत्रिमंडळात असतील किंवा नाही, हे सायंकाळी समजेल, पण मी मात्र थांबणार नसून शपथ घेणार आहे’, अशी मार्मिक टिप्पणी पवार यांनी केल्यावर एकच हशा पिकला. तेव्हा शिंदे यांनाही भाष्य करण्याचा मोह आवरला नाही. ते हसतहसत म्हणाले, ‘पवार यांना फडणवीस यांच्याबरोबर एकदम सकाळी व सायंकाळीही शपथ घेण्याचा अनुभव आहे. त्यावर पहाटेच्या शपथविधीचा अनुभव सांगताना अजित पवार म्हणाले, ‘तेव्हा आम्ही दोघांनी सकाळी शपथ घेतली होती व पुढे राहून गेले. आता पाच वर्षे एकत्र राहू’, अशी मिश्कील टिप्पणी पवार यांनी केल्यावर एकच हास्यकल्लोळ उडाला.
अडीच वर्षांनंतर…
अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझी याच राजभवनात मुख्यमंत्रीपदासाठी शिफारस केली होती. आज मी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाला पाठिंबा देत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अनुभवाचा गेली अडीच वर्षे चांगला उपयोग झाला. त्यांची मुख्यमंत्रीपदासाठी शिफारस करण्याची संधी मला मिळाल्याचा आनंद असल्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.