Maharashtra-Karnataka border row : कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातला सीमावाद आजचा नाही. शुक्रवारी घडलेल्या घटनेने हा वाद पुन्हा उफाळून आला आहे. २१ फेब्रुवारीच्या रात्री बेळगाव या ठिकाणी कंडक्टरला मारहाण करण्यात आली. ज्यानंतर दोन्ही राज्यांमधल्या बस सेवांना स्थगिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने कर्नाटकात जाणाऱ्या बसेसवर बंदी घातली. ज्यानंतर कर्नाटकनेही हाच निर्णय घेतला. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातला वाद आजचा नाही बराच जुना आहे. त्या वादाबाबत आपण जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र कर्नाटकचा सीमावाद काय?

महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातला सीमा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. राज्य पुनर्रचना कायदा, १९५६ नुसार, पूर्वी मुंबई राज्याचा भाग असलेले बेळगाव हे तत्कालीन म्हैसूर (कर्नाटक) राज्यात समाविष्ट करण्यात आले. भाषावार प्रांतरचनेत बेळगावसह अन्य गावांमध्ये मराठी भाषकांचे प्रमाण अधिक असतानाही त्यांचा समावेश कर्नाटक राज्यात करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने कडाडून विरोध केल्यावर केंद्र सरकारने भारताचे माजी सरन्यायाधीश मेहेरचंद महाजन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली. त्यात महाराष्ट्र व कर्नाटक सरकारच्या प्रत्येकी दोन सदस्यांचा समावेश होता. महाजन आयोगाने ऑगस्ट १९६७मध्ये अहवाल सादर केला. त्यात हलियाल, कारवारसह २६४ गावे महाराष्ट्रात तर बेळगावसह २४७ गावे कर्नाटकमध्ये समाविष्ट करावीत, असा अहवाल दिला होता. राज्य सरकारने बेळगाव शहरासह ८६५ गावांचा समावेश महाराष्ट्रात करण्यासाठी गेली अनेक वर्षे लढाई सुरू ठेवली आहे. सीमाभागातील मराठी भाषकांनी कर्नाटक सरकारकडून करण्यात आलेले अत्याचार प्रदीर्घ काळ सहन करीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून आंदोलन सुरू ठेवले आहे. महाराष्ट्र सरकारने डिसेंबर २००५मध्ये सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करून बेळगावसह अन्य गावांचा समावेश महाराष्ट्रात करण्यासाठी कायदेशीर लढाई सुरू केली आहे.

सीमा प्रश्नाचं राजकारण

कर्नाटक सीमाप्रश्न हा दोन्ही राज्यांमध्ये राजकीय व प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा झाला असून दोन्हीकडे सर्वच राजकीय पक्षांनी एकजूट दाखवून आग्रही भूमिका घेतली आहे. कर्नाटक सरकारने पोलिसांच्या माध्यमातून आंदोलने चिरडण्याचे प्रयत्न केले व आंदोलकांवर अनेक अत्याचार झाले. कर्नाटक सरकारने बेळगावला उपराजधानीचा दर्जा देऊन तेथे विधिमंडळ सभागृह उभारुन अधिवेशन घेण्यासही सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयातील दावा अनेक वर्षे प्रलंबित असून चर्चेद्वारे तोडगा काढण्याची सूचना न्यायालयाने केली होती. पण गेल्या अनेक वर्षात बऱ्याच चर्चा होऊनही त्या निष्फळ ठरल्या.

बेळगावी येथे नेमकं काय घडलं?

बेळगावी या ठिकाणी कंडक्टरवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली आणखी एका प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे, असं पोलिसांनी सांगितले. कंडक्टरवर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. शुक्रवारी ५१ वर्षीय कंडक्टर महादेवप्पा मल्लप्पा हुक्केरी यांनी डोळ्यात अश्रू आणत पत्रकारांना सांगितले की, सुलेभावी गावात एक मुलगी तिच्या मित्राबरोबर बसमध्ये चढली. ती मराठीत बोलत होती. त्यामुळे मी तिला सांगितलं की मला मराठी येत नाही, कन्नडमध्ये बोल. मी जेव्हा मराठी येत नाही असे सांगितले तेव्हा त्या मुलीने मला शिवीगाळ केली आणि म्हटले की मला मराठी शिकावे लागेल. अचानक मोठ्या संख्येने लोक जमले आणि त्यांनी माझ्या डोक्यावर आणि संपूर्ण शरीरावर हल्ला केला”, असे कंडक्टरने सांगितलं. दरम्यान कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.