दिगंबर शिंदे
सांगली : लोकसभा निवडणुकीला आठ महिन्याचा अवधी असताना भाजप-काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरू झाली असून काँग्रेस आणि भाजप अशी सरळ लढत होण्याची चिन्हे दिसत असतानाच विट्याचे महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनीही लोकसभेच्या मैदानात शड्डू ठोकला आहे. यामुळे गतवेळीप्रमाणेच सांगलीची लढत दुरंगी न होता, तिरंगी होण्याची शययता बळावली आहे. पैलवान चंद्रहार पाटील यांनी मात्र कोणत्याही पक्षाचा टीळा न लावता स्वतंत्रपणे मेदानात उतरण्याची तयारी चालविली आहे. यामुळे सांगलीची निवडणूक ही तीन पाटलांच्यातच होणार असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनी २०१४ मध्ये काँग्रेसचा गड उध्वस्त करीत मोदी लाटेचा फायदा उठवत विजय संपादन केला. मात्र, २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी उमेदवारी मिळवत असतानाच पक्षांतर्गत विरोध मोडून काढण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे सहकार्य घ्यावे लागले. यावेळीही त्यांना जिल्ह्यात पक्षातील काही नेत्यांकडून होत असलेल्या विरोधावर मात करण्याची वेळ आली आहे. पक्षाचे माजी जिल्हा अध्यक्ष आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनीही खासदारकीच्या उमेदवारीवर दावा केला असून त्यांनीही जिल्हा पातळीवर संपर्क वाढविला आहे. भाजपमध्ये उमेदवारीसाठीचाच संघर्ष आता तीव्र स्वरूपात समोर येत आहे. गत निवडणुकीमध्ये वंचित विकास आघाडीकडून मैदानात उतरलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांची उमेदवारी भाजपला लाभदायी ठरली. दुसर्या बाजूला पाहायला गेले तर भाजपच्या विजयासाठी भाजपनेच विरोधातील मतदान प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या पारड्यात जाउ नये यासाठी केलेली खेळी होती, हे पडळकर यांना विधानपरिषदेचे सदस्यत्व दिल्याने स्पष्ट होत आहे.
काँग्रेसने गत निवडणुकीत सांगलीची जागा मित्र पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली. जागा देण्याबरोबरच उसनवारीने विशाल पाटील यांनाही स्वाभिमानीच्या पदरात टाकले. मात्र, निवडणुकीनंतर पाटील यांनी स्वाभिमानीशी असलेले संबंध फार काळ न वागवता पुन्हा काँग्रेसशी आपली नाळ घट्ट करत प्रदेश उपाध्यक्ष पदही स्वीकारले. यामुळे त्यांनीही आता काँग्रेसच्या उमेदवारीवर दावाच केवळ सांगितला नाही तर माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचे नेतृत्व आपण स्वीकारून लोकसभेच्या मैदानात उतरण्याची मानसिकता दाखवली आहे. विधानसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी होणारी हातघाईही संपवून टाकली आहे असे सध्या तरी वाटत आहे. मात्र, याबाबतच येणारा काळच कोण कोणाच्या पारड्यात मताचे दान टाकतो यावर अवलंबून आले.
हेही वाचा >>> ‘गुलाम नबी आझाद भाजपा-संघाच्या इशाऱ्यावर काम करतात’, काँग्रेस-पीडीपीची टीका
महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुका लढविल्या जाणार असल्या तरी सांगलीच्या जागेवर राष्ट्रवादीही हक्क सांगण्याच्या तयारीत आहे. यामुळे पक्षांतर्गत लढा संपला तर काँग्रेसला मित्र पक्षाबरोबरच दुसरा संघर्षही करावा लागणार आहे. नेमक्या याच स्थितीचा लाभ उठविण्याचा प्रयत्न पैलवान पाटील यांचा दिसत आहे. चंद्रहार पाटील यांनी तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न चालविला असला तरी त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारत राष्ट्र समिती, वंचित बहुजन आघाडी हे पर्याय असताना ते स्वीकारतील असे वाटत नाही. कारण त्यांचा डोळा भाजपमध्ये असलेली नाराजी, काँग्रेस-राष्ट्रवादीमधील धुसफूस याचा नेमका लाभ उठविण्यासाठी स्वतंत्रपणे निवडणुकीच्या फडात उतरून डाव साधण्यााचा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी त्यांनी ग्रामीण भागात लोकप्रिय असलेल्या बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताने लक्ष वेधण्याचा प्रयत्न तर केलाच, पण सध्या एक लाख बाटल्या रक्तसंकलनाची सामाजिक जबाबदारी अंगावर घेतली असून या निमित्ताने गाव पातळीवर रयतदान चळवळ सुरू केली आहे. यापुर्वी २००७ मध्ये त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केले आहे. त्याचवेळी त्यांना राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी विधानसभेसाठी उमेदवारी दाखल करण्यास अनुकूलता दर्शवली. मात्र, ऐनवेळी आमदार अनिल बाबर यांच्यासाठी उमेदवारी मागे घ्यायला लावली. यामुळे हा धोका न स्वीकारता गावपातळीवर प्रस्थापितांच्या विरोधात असलेल्या तरूणांना घेउन एकला चलोचा नारा दिला आहे. सांगली, तासगाव आणि विट्याच्या तीन पाटलांमध्ये लोकसभेसाठी होणारी लढत लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत.