विधान परिषदेसाठी प्रत्यक्ष मतदान झाल्यास मतांची फाटाफूट होऊन काँग्रेस व शिवसेनेला फटका बसल्याचा गेल्या २५ वर्षांतील इतिहास आहे. यामुळेच यंदा निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाला फटका बसू शकतो याची उत्सुकता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधान परिषदेच्या येत्या शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीत ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. यामुळेच निवडून कोण येणार यापेक्षा पराभूत कोण होणार याचीच जास्त उत्सुकता सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आहे. विधान परिषदेसाठी जेव्हा जेव्हा मतदान झाले तेव्हा मोठ्या प्रमाणावर मतांची फाटाफूट झाल्याचा इतिहास आहे. गुप्त मतदान पद्धतीने मतदान असल्याने घोडेबाजार मोठ्या प्रमाणावर होतो, असा आरोप केला जातो.

हेही वाचा : काँग्रेसचे आमदार फोडून सत्तेवर आलेल्या भाजपामध्ये धुसफूस; पुडुचेरीमध्ये काय घडतंय?

दोन वर्षांपूर्वी विधान परिषद निवडणुकीच्या दिवशीच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले होते. तेव्हा शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आले पण काँग्रेसमधील मतांमध्ये फाटाफूट होऊन पक्षाचे पहिल्या क्रमांकाचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले होते. दोन वर्षांपूर्वी राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेची मते फुटल्याने पक्षाचे दुसरे उमेदवार संजय पवार हे पराभूत झाले होते.

१९९६ मध्ये विधान परिषद निवडणुकीत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे शिवसेनेच्या अतिरिक्त मतांच्या पाठिंब्यावर रिंगणात होते. १९९५ मध्ये लातूरमधून विधानसभा निवडणुकीत विलासराव पराङभूत झाले होते. विधान परिषदेसाठी काँग्रेसने छगन भुजबळ आणि शिवाजीराव देशमुख यांना उमेदवारी दिली होती. यामुळे विलासराव देशमुख यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. त्यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. देशमुख काँग्रेसची मते फोडतील अशी अपेक्षा होती. पण विलासराव देशमुख यांचे एकेकाळचे निकटवर्तीय लालसिंह राठोड यांनी अर्धा मत जास्त घेतले. त्या निवडणुकीत राठोड यांना २४६८ तर विलासराव देशमुख यांना २४०९ मते मिळाली होती. यात विलासरावांचा पराभव झाला.

हेही वाचा : काँग्रेसने मणिपूरमध्ये १० वेळा राष्ट्रपती राजवट लागू केल्याचे मोदींचे वक्तव्य; काय आहे इतिहास?

२००८ मध्ये काँग्रेसची मते फुटल्याने तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय सुधाकर गणगणे यांचा पराभव झाला होता. २०१० मध्ये काँग्रेसकडे पुरेशी मते नसतानाही तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या ‘चमत्कारा’मुळे पक्षाचे चौथे उमेदवार विजय सावंत हे विजयी झाले होते. तेव्हा विरोधकांची मते फुटली होती. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांवर सावंत यांचा विजय झाला. तेव्हा शिवसेनेचे अनिल परब हे पराभूत झाले होते.

राज्यसभा निवडणुकीत १९९८ मध्ये काँग्रेसची मते फुटल्याने निवृत्त सनदी अधिकारी व काँग्रेसच्या तत्कालीन पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय राम प्रधान यांचा अर्ध्या मताने पराभव झाला होता. काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी हा पराभव फारच गांभीर्याने घेतला होता. या पराभवाबद्दल शरद पवार यांच्या गटाच्या आमदारांवर खापर फोडण्यात आले होते. राम प्रधान यांच्या पराभवातूनच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेचे बिजे रोवली गेली होती.

हेही वाचा : हिंदू धर्म ते मणिपूर! विरोधकांच्या आरोपांना पंतप्रधान मोदींनी काय उत्तरे दिली?

यंदा कोणाला फटका ?

भाजपचे पाच, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना ठाकरे गट व शेकापचा प्रत्येकी एक उमेदवार लढत आहे. महायुती ९ तर महाविकास आघाडीचे तीन उमेदवार रिंगणात आहेत. १२व्या उमेदवारामुळे मोठ्या प्रमाणावर ‘लक्ष्मीदर्शन’ होण्याची चिन्हे आहेत. आमदारांनाही निवडणूक झाल्यास पर्वणी ठरते. यामुळे कोणत्या पक्षाची किती मते फुटतात यावरच सारी गणिते अवलंबून आहेत.

हेही वाचा : “हिंसाचारावरुन राजकारण करणाऱ्यांना मणिपूरची जनता नाकारेल”; अखेर मणिपूरबाबत मोदींनी केले भाष्य

विधान परिषद निवडणुकीचा इतिहास

१९९६ : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख शिवसेनेच्या पाठिंब्यावर रिंगणात. अर्ध्या मताने पराभूत

२००८ : काँग्रेसमधील मतांच्या फाटाफुटीत पक्षाचे उमेदवार सुधाकर गणगणे यांचा पराभव

२०१० : विरोधकांच्या मतांमध्ये फाटाफूट, शिवसेनेचे अनिल परब पराभूत

२०२२ : काँग्रेसमधील मतांच्या फाटाफुटीत पक्षाचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे पराभूत

राज्यसभा निवडणुकीतही मतांची फाटाफूट

१९९८ : काँग्रेसची मते फुटल्याने राम प्रधान अर्ध्या मताने पराभूत

२०२२ : शिवसेनेची मते फुटल्याने पक्षाचे संजय पवार पराभूत

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra legislative council election 2024 congress shivsena uddhav thackeray votes split print politics news css