ठाणे : लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीला २४ तासांचा कालावधी शिल्लक असताना भारतीय जनता पक्षाने मुंबई पदवीधर मतदारसंघातून किरण शेलार यांची उमेदवारी जाहीर केल्याने अस्वस्थ झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघातून माजी महापौर संजय मोरे यांना रिंगणात उतरविण्याची तयारी पक्की केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या मतदारसंघातून यापुर्वीच अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे मुंबई, ठाण्यातील पदवीधर मतदारसंघात महायुतीतील दुभंग स्पष्टपणे दिसू लागला असून मुंबईतील विलास पोतनीस यांची जागा आम्हालाच हवी अशी भूमीका मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांपुढे मांडल्याचे वृत्त आहे.

लोकसभा निवडणुकीची धामधूम संपताच मुंबई, कोकणातील पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा जाहीर केला होता. निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात स्वत: राज यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या होत्या. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे हे आमदार असून अनेक वर्षांपासून हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. असे असताना डावखरे यांची उमेदवारी जाहीर होण्यापुर्वीच राज ठाकरे यांनी येथून अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर करत भाजपला पहिला धक्का दिला. पानसे हे मुळचे ठाणेकर असून गेल्या काही काळापासून पदवीधर मतदारांची नोंदणी करण्यात ते आघाडीवर होते. त्यामुळे या जागेवर भाजपशी समझोता करु नये असा मनसेच्या स्थानिक नेत्यांचा राज यांच्याकडे आग्रह आहे.

हेही वाचा : भाजपाला एकहाती सत्ता मिळवून देणारे पेमा खांडू आहेत तरी कोण?

भाजप आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली ?

मुंबईतील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सहा वर्षांपुर्वी एकसंघ शिवसेनेचे विलास पोतनीस ११ हजार ५६२ मतांनी विजय झाला होता. त्यावेळी पोतनीस यांनी भाजपचे अमितकुमार मेहता यांचा पराभव केला होता. मुंबई पदवीधर मतदारसंघावर शिवसेनेची चांगली पकड असून पदवीधरांच्या नोंदणीत हा पक्ष नेहमीच आघाडीवर राहीला आहे. असे असले तरी गेल्या काही वर्षापासून या मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रीत केले होते. शिवसेनेतील दुभंगानंतर मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघाची जागा भाजपकडे मागितली होती. या जागेवर शिवसेनेचा विद्यमान आमदार आहे असा या मुख्यमंत्र्यांचा दावा होता. असे असताना सोमवारी सकाळी भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत मुंबई पदवीधर मतदारसंघातून किरण शेलार यांची उमेदवारी जाहीर झाल्याने मुख्यमंत्र्यांनी लागलिच ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना कोकण पदवीधर मतदारसंघाचा अर्ज घेण्याचे आदेश दिले. सहा वर्षापुर्वी डावखरे यांच्या विरोधात मोरे यांनी निवडणुक लढवली होती. त्यावेळी पाच हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता मात्र कमी कालावधीत फारशी तयारी नसतानाही मोरे यांनी डावखरे यांना झुंजविले होते. मुंबईत भाजप ऐकत नाही हे पाहून मुख्यमंत्र्यांमार्फत संजय मोरे यांनी सोमवारी कोकण पदवीधर मतदारसंघाचा अर्ज घेतला. येत्या सात तारखेला आपण अर्ज दाखल करणार असल्याचे मोरे यांनी लोकसत्ताला सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन मुंबई, ठाण्यातील पदावीधर मतदारसंघाच्या जागेवर योग्य तोडगा काढला जाईल, अशी माहिती भाजपच्या एका नेत्याने लोकसत्ताला सांगितले.

हेही वाचा : एक्झिट पोल्सवर विश्वास नाही; आम्ही २९५ च्या पार जाऊ – इंडिया आघाडीचा दावा

मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास पोतनीस हे आमदार होते. त्यामुळे ही जागा शिवसेनेची होती. जागा वाटप धोरणानुसार ती जागा आम्हाला मिळायला हवी होती. मात्र भाजपने येथून उमेदवार जाहीर केला. त्यामुळे आम्हालाही कोकणातून उमेदवारी अर्ज दाखल करणे भाग पडणार आहे.

संजय मोरे, इच्छुक उमेदवार शिवसेना (शिंदे गट)