शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्ही गटांकडून आमचाच गट हा खरा पक्ष सुरू असलेला दावा, राज्यात आम्हीच श्रेष्ठ हा भाजपकडून सुरू असलेला प्रचार या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जनाधार आहे हे फुटीनंतर जनतेच्या न्यायालयात लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत चुरशीची लढत होण्याची चिन्हे असून, वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढल्यास महाविकास आघाडीचे किती नुकसान करते यावरही निकाल अवलंबून असेल.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडल्यापासून उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून आमचीच शिवसेना खरी हा दावा सुरू आहे. निवडणूक आयोगाने लोकसभा व विधानसभेच्या संख्याबळाच्या आधारे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाकडे सोपविले आहे. दुसरीकडे ठाकरे गट आमचीच शिवसेना हा खरी हा दावा करीत आहे. शिवसेनेत फूट पडून पावणे दोन वर्षे तर राष्ट्रवादीत फूट पडून जवळपास नऊ महिने उलटले तरी उभय पक्षांच्या दोन्ही गटांना आपल्या मागे जनतेची किती ताकद आहे याचा अंदाज आलेला नाही. महानगरपालिका, नगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने स्थानिक पातळीवर कोणाला किती पाठिंबा आहे हे निवडणूक निकालातून स्पष्ट झालेले नाही. लोकसभा निवडणूक निकालात शिवसेनेत ठाकरे की शिंदे गट वा राष्ट्रवादीत शरद पवार की अजित पवार गट कोणाला अधिक जनाधार हे समोर येणार आहे. यामुळेच शिवसेना व राष्ट्रवादीतील फुटीनंतर कोण किती पाण्यात आहे याचा पहिल्यांदाच अंदाज येऊ शकेल.
हेही वाचा : मोदी ‘चारसो पार’ की, सत्तेपार?
निवडणूुका जाहीर झाल्या तरी महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटप सुरळीत झालेले नाही. महायुतीत भाजपला अधिक जागा हव्या आहेत पण शिंदे आणि अजित पवार गट आडून बसले आहेत. अजित पवार यांच्यापुढे भाजप देईल तेवढे मान्य करण्याशिवाय पर्यायच नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या पावणे दोन वर्षात भाजपच्या कलानेच स्वत:चा पक्ष आणि सरकार चालविल्याने ते भाजप जेवढ्या जागा देईल तेवढ्या पदरात पाडून घेतील, असेच चित्र आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात काही जागांवर अद्यापही सहमती झालेली नाही. त्यातच प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे लक्ष आहे. वंचितच्या अटी वा नेत्यांची विधाने बघता आंबेडकर महाविकास आघाडीबरोबर येण्याबाबत साशंकता व्यक्त केली जाते.
गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे बऱ्यापैकी नुकसान झाले होते. यंदा वंचितचा तेवढा प्रभाव राहिल का ? वंचितला चांगला पाठिंबा मिळाल्यास महाविकास आघाडीच्या जागा अडचणीत येऊ शकतात. मनसेबाबत संभ्रम कायम आहे. लोकसभा निवडणुकीतील पक्षाची भूमिका लवकरच जाहीर करणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. पण पक्षाच्या वर्धापनदिन समारंभातील भाषणात राज ठाकरे यांनी भाजपच्या विरोधात मतप्रदर्शन वा टीकाटिप्पणी न केल्याने मनसे भाजपला अनुकूल अशीच भूमिका घेण्याची शक्यता अधिक आहे. ठाकरे यांच्या भाषणानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले भाषणाचे स्वागत हे त्याचेच द्योकत मानले जाते.
हेही वाचा : ही तर खंडणी वसुलीच! निवडणूक रोखे प्रकरणावरून राहुल गांधींचं भाजपावर टीकास्त्र; म्हणाले…
शिवसेनेचे उद्धव ठाकरे प्रथमच काँग्रेस आणि शरद पवार यांच्या पक्षाबरोबर आघाडीत निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. ठाकरे गटाचा उमेदवार नसेल तेथे ठाकरे गटाची मते काँग्रेस वा राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडे हस्तांतरित होतील की शिंदे गटाकडे जातील हे सुद्धा महत्त्वाचे आहे. तसेच राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार गटात पारंपारिक मतांसाठी चुरस असेल. भाजपची पारंपारिक मते ही अजित पवार गटाकडे हस्तांतरित होतील का, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण भाजपच्या पारंपारिक मतदारांनी नेहमीच पवार कुटुंबियांचा तिरस्कार केला आहे. राष्ट्रवादीत शरद पवार की अजित पवार या काका-पुतण्यांमध्ये सरस कोण याचा फैसला होणार आहे. अजितदादांना काहीही करून बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना दणका देऊन स्वत:चे वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. पण शरद पवार यांच्या राजकीय डावपेचांचा त्यांना सामना करावा लागेल. पवार काका-पुतण्यांमधील लढाईही निर्णायक असेल.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने राज्यात मराठा आरक्षणाच्या मूद्दायावर राळ उठली. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन झाले. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेत त्यांच्या मागणीनुसार सगेसोयऱ्यांना कुणबी दाखले देण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला.तसेच मराठा समाजाला १० टक्के आरणक्ष देण्याचा कायदा महायुती सरकारने केला. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून झालेल्या आंदोलनात राज्यातील सामाजिक वातावरण पार गढूळ झाले. नेत्यांचा एकेरी उल्लेख झाला. जाळपोळ, दगडफेक, लाठीमार झाला. जरांगे पाटील यांना झुकते माप देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:ची प्रतीमा मराठा समाजाचा नेता करण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून ओबीसी समाजात प्रतिक्रिया उमटली. भाजपला ओबीसी समाजाची नाराजी परवडणारी नाही. त्यातून भाजप व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाच्या नेत्यांचे लक्ष्य ठरले. पुरोगामी महाराष्ट्र अशी प्रतिमा असलेल्या राज्यात सामाजिक वातावरण मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून बिघडले. त्याचे परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीत उमटण्याची चिन्हे आहेत. मराठा समाजातील नाराजीचा फटका भाजप वा महायुतीला बसू शकतो, असा अंदाज वर्तविला जातो.
हेही वाचा : मुलाला उमेदवारी मिळताच कमलनाथ यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम? भाजपाचे नेते म्हणतात…
मुंबईचा कौल हा साधारणपणे केंद्रात सत्तेत येणाऱ्या पक्षाच्या बाजूने असतो. विदर्भात भाजपला आव्हान देण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असेल. मराठावाड्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा महायुतीला त्रासदायक ठरू शकतो. उत्तर महाराष्ट्राचा गड कायम राखण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. कोकणात शिवसेना ठाकरे गट आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी प्रयत्नशील आहे.
मतदार आणि कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची
शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेनेचे पारंपारिक मतदार ठाकरे की शिंदे गटाला पाठिंबा देतात हे स्पष्ट होईल. राष्ट्रवादीत पवार काका-पुतण्यात कोण श्रेष्ठ याचा कौल समजेल. महायुतीत भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तर महाविकास आघाडीत काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय कसा राहतो किंवा पस्परांची मते कशी हस्तांतरित होतात यावरही निकाल बराचसा अवलंबून असेल.
२०१९चे चित्र
एकूण जागा : ४८
भाजप : २३
शिवसेना : १८
राष्ट्रवादी : ४
काँग्रेस : १
एमआयएएम : १
अपक्ष : १ (नवनीत राणा )