Uddhav Thackeray vs BJP Maharashtra Politics : वादग्रस्त वक्फ दुरुस्ती विधेयक आज (तारीख २ एप्रिल) लोकसभेत मांडण्यात आलं. दुपारी १२ वाजेनंतर या विधेयकावरून संसदेत चर्चा सुरू झाली. इंडिया आघाडीतील घटकपक्षांनी वक्फ विधेयकाला तीव्र विरोध केला. तर भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्ष विधेयकाच्या बाजूने उभे राहिले. वक्फ विधेयकात दुरुस्तीची गरज का भासली, याचं स्पष्टीकरणही सत्ताधाऱ्यांनी सभागृहात दिलं. दरम्यान, शिवसेना ठाकरे गट विधेयकाबाबत काय भूमिका मांडणार याकडं सर्वांचं असेल. मात्र, त्याआधीच भाजपानं ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ठाकरे गटानेही सत्ताधाऱ्यांना आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तर दिलं. वक्फ विधेयकावरून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांना कसं लक्ष्य केलं? याबाबत जाणून घेऊ…
ठाकरेंना खिंडीत गाठण्याचा भाजपाचा प्रयत्न
वक्फ बोर्ड विधेयकाच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (तारीख १ एप्रिल) आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. “वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत! बघुया, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की, राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार?” असा प्रश्न विचारून मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला.
ठाकरे गटाकडून सडेतोड उत्तर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिलं. “देवेंद्रजी, वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा काडीमात्र संबध नाही, ही तुमच्या पक्षाची एक खाज आहे गोंधळ निर्माण करण्याची! विषय राहुल गांधींचा, त्यांच्या आजीने अमेरिकेला दम भरला होता; आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून फाळणीचा बदला घेतला होता! तुमच्यात हा दम आहे? बोला,” असं राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.
आणखी वाचा : Amit Shah Strategy : बिहार निवडणुकीतही भाजपाचा महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी कोणती रणनीती आखली?
‘वक्फ विधेयकला संघाचा पाठिंबा नाही’
मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, “भाजपाच्या नेत्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. वक्फ बील आणि हिंदुत्वाचा काहीही संबंध नाही. हे एक सामान्य विधेयक आहे, त्यात काही सुधारणा करायच्या आहेत. या सुधारणा फक्त मुस्लिमांच्या विरोधात नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सुद्धा विधेयकाला पूर्ण पाठिंबा नाही. भाजपाने औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची भूमिका घेतली. पण त्यांच्या या भूमिकेला संघाने विरोध केला. उगाचच राज्याचं वातावरण खराब करू नका, असं त्यांनी सांगितलं. माझ्या माहितीप्रमाणे या बिलासंदर्भात संघाची त्याच पद्धतीची भूमिका आहे. हिंदुत्वाचा विषय आणि या बिलाचा कोणी मेळ घालत असेल, तर तो मूर्खपणा आहे.”
‘हिंदुंना जागा नाकारणाऱ्यांवर कारवाई होणार का?’
मुंबईत विशिष्ट धर्माचे लोक हिंदूंना जागा नाकारतात. मग त्यासाठी असं एखादं विधेयक आणून जागा नाकारणाऱ्यांवर कारवाई होणार का? असा प्रश्नही संजय राऊतांनी उपस्थित केला. मी मराठी माणूस म्हणून नाही तर हिंदू म्हणून बोलतो आहे. मांसाहार करतात म्हणून हिंदूंना मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर येथे जागा नाकारल्या जात आहेत. हे सर्व भाजपाचे लोक आहेत, जे मंत्रिमंडळात ठाण मांडून बसले आहेत. हिंदूंसाठी केंद्रात आणि राज्यात एखादं बिल आणार असतील तर आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे, असंही राऊत म्हणाले.
भाजपा-ठाकरे गटात काय बिनसलंय?
भाजपा आणि एकसंध शिवसेना यांच्यातील युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून होती. मात्र, २०१९ मध्ये मुख्यमंत्रीपदावरून मतभेद झाल्यानंतर शिवसेनेनं भाजपाशी फारकत घेतली. तेव्हापासून भाजपा आणि ठाकरे गटाचे नेते हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकमेकांना डिवचत असतात. गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात मोठं यश मिळालं. शिवसेना फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नऊ खासदार निवडून आले. मात्र, ठाकरेंच्या पाठीमागे हिंदू मतदार नव्हे तर मुस्लीम उभे होते अशी टीका भाजपा नेत्यांनी केली होती. तर भारतीय जनता पार्टीने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन करून राज्यात सलग दुसऱ्यांदा सत्तास्थापन केली. आता वक्फ सुधारणा विधेयकावरील भूमिकेवरून भाजपाने पुन्हा एकदा ठाकरेंना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे.
वक्फ विधेयकावर ठाकरेंची भूमिका काय?
१४ ऑगस्ट २०२४ रोजीही केंद्र सरकारने ‘वक्फ बोर्ड अधिनियम – १९९५’ या कायद्यात सुधारणा करणारं विधेयक लोकसभेत सादर केलं होतं. त्यावेळीही इंडिया आघाडीतील घटकपक्षांनी या विधेयकाला विरोध केला होता. विशेष बाब म्हणजे, यावेळी ठाकरे गटाच्या खासदारांनीही संसदेच्या पायऱ्यावर घोषणाबाजी केली होती. जेव्हा या विधेयकावर संसदेत चर्चा सुरू झाली, तेव्हा ठाकरे गटाच्या खासदारांनी सभात्याग केला होता. त्यानंतर मुस्लीम समुदायाने मातोश्रीबाहेर आंदोलनही केलं होतं. ठाकरेंनी विधेयकाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं. यावरून भाजपा नेत्यांनीही ठाकरेंना डिवचलं होतं.
उद्धव ठाकरे त्यावेळी काय म्हणाले होते?
त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मौन बाळगलं होतं. मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात त्यांनी भाजपावर निशाणा साधला होता. “तुमच्याकडे (केंद्र सरकार) बहुमत असताना वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडण्याचं नाटक तुम्ही का केलं? शिवसेनेचे खासदार तिथे (सभागृहात) उपस्थित नव्हते, कारण मी स्वत: त्यावेळी दिल्लीत असल्याने ते माझ्याबरोबर होते. विधेयकावर चर्चा करायचं ठरवलं असतं तर माझे खासदार त्यावर काय बोलायचं ते बोलले असते”, असं ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं.
हेही वाचा : Waqf Amendment Bill : वक्फ विधेयक बहुमताने होणार मंजूर? संसदेतील आकडेवारीचं गणित काय सांगतं?
केंद्र सरकारला दिला होता इशारा
“तुम्ही वक्फ बोर्डची जमीन ढापून तुमच्या उद्योगपतींच्या घशात घालणार असाल, जसं तुम्ही आमच्या हिंदू संस्थानांच्या मंदिरांच्या जमिनी लुटताय आणि तुमच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला देत आहात. महाराष्ट्रामध्येही मंदिरांची जमीन किती राजकारण्यांनी ढापली त्याची यादी काढा. वक्फ बोर्ड बाजूला ठेवा, माझ्या मंदिराची जमीन चोरली जात असेल आणि तिथे तुमचे मित्र येऊन बांधकाम करणार असतील तर वक्फ असो, हिंदू संस्थान असो वा कुठल्याही धर्माच्या जागा असतील आम्ही वेडवाकडे त्यावर काही होऊ देणार नाही”, असा इशारा ठाकरेंनी दिला होता.
संजय राऊतांनी केली भूमिका स्पष्ट
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी वक्फ विधेयकाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. “वक्फ बोर्डाच्या संपत्तीवर कब्जा मिळवणं काही उद्योगपतींना सोप जावं, त्यासाठी या विधेयकाचं प्रायोजन दिसत आहे”, असा आरोप राऊतांनी केला आहे. “शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने हिंदुत्व आणि विज्ञानवाद यांना पाठिंबा दिला आहे. फडणवीस किंवा त्यांचे बगल बच्चे हे वक्फ बिलाच्या निमित्ताने बांग देतात हा मूर्खपणा आहे”, असंही राऊतांनी म्हटलं आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभेत नऊ खासदार आहेत. वक्फ विधेयकावरून त्यांनी केंद्र सरकारला पाठिंबा द्यावा असं भाजपा नेत्यांचं मत आहे. यावरून भाजपानं ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
उद्धव ठाकरेंसमोर दुहेरी पेच
आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीतही भाजपाचा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न असेल. मुंबई महापालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या अनेक दशकांपासून इथे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे एकहाती वर्चस्व आहे. विधानसभेची निवडणूक गमावल्यानंतर मुंबई महापालिकेची निवडणूक कुठल्याही परिस्थिती जिंकायची असा निश्चयच ठाकरे गटाने केला आहे. यासाठी मुंबईतील मराठी आणि मुस्लीम मतदारांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे वक्फ विधेयकाला पाठिंबा द्यावा की, त्याला विरोध करावा अशा दुहेरी पेचात ठाकरेंची शिवसेना असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार यावर संसदेत नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.