Maharashtra Political News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत फेरफार झाला, असा आरोप काँग्रेसकडून वारंवार केला जात आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी संसदेतील भाषणात या आरोपांचा पुनरुच्चार केला आहे. “गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्यांच्या कालावधीत शिर्डी विधानसभा मतदारसंघात एकाच इमारतीत सात हजार मतदार वाढले”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या आरोपांचं खंडण केलं आहे.
अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?
“शिर्डी विधानसभा मतदारसंघात वाढलेल्या मतदारांची संख्या तीन हजारांच्या आसपास आहे. त्यामध्ये लोणी शहरातील एका शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. सदरील विद्यार्थी वसतिगृहात राहत असल्याने त्यांचा नोंदणीकृत पत्ता शैक्षणिक संस्थेचा असतो. त्यामुळे एकाच पत्त्यावरून अनेक मतदारांची नोंदणी दिसून आली”, असं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
आणखी वाचा : UCC in Gujarat : कोण आहेत न्यायमूर्ती रंजना देसाई? गुजरातमध्ये यूसीसीचा मसुदा कोण तयार करणार?
अहिल्यानगरचे (अहमदनगर) जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ म्हणाले, “मतदार यादीत फेरफार झाल्याची तक्रार आम्हाला एका राजकीय पक्षाकडून तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर आम्ही निवडणूक आयोगाला या संदर्भातील माहिती दिली. संबंधित केंद्रात मतदारांची संख्या सुमारे तीन हजारने वाढली आहे. लोणी परिसरात अनेक शैक्षणिक संस्था आहेत आणि नवीन मतदार त्यापैकी एका संस्थेच्या वसतिगृहातील विद्यार्थी आहेत. या मतदारांची सत्यापन प्रक्रिया सखोलपणे केली गेली होती.”
‘मतदार याद्यांमध्ये कुठलीही तफावत नाही’
पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, “जर एखाद्या व्यक्तीचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असेल आणि त्याच्याकडे आवश्यक ती कागदपत्रं असतील, तर त्याला मतदान करण्याचा अधिकार आहे. विद्यार्थी वसतिगृहात राहत असल्याने त्यांचे महाविद्यालयीन प्रवेशपत्र रहिवासी पुरावा म्हणून घेण्यात येतं. निवडणुकीआधी प्रशासनानं राजकीय पक्षांच्या मतदार यादीबद्दलच्या तक्रार आणि हरकती मागवल्या होत्या. आम्हीदेखील यादीतील मतदारांची नोंदणी तपासली आणि त्यात कुठलीही तफावत आढळून आली नाही.”
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांचा पराभव केला होता. शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा विखे-पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे सिंचन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते?
सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ४० मिनिटांच्या भाषणात सत्ताधाऱ्यांसह निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं. “लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आधी या राज्यात जादू घडावी, असे ७० लाख मतदार वाढले. राज्यात पाच वर्षांत जेवढ्या मतदारांची नोंद झाली नाही तेवढी लोकसभेनंतर अवघ्या पाच महिन्यांत झाली आणि भाजपाचे उमेदवार विजयी झाले”, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
यावेळी राहुल गांधी यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे उदाहरण दिले. “लोकसभा निवडणुकीनंतर शिर्डीतील एका इमारतीच्या पत्त्यावर सुमारे सात हजार मतदारांची नोंदणी झाली, असा आरोप त्यांनी केला. यापूर्वी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सहा दिवसांनी काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून राज्यातील मतदारांच्या संख्येत १३ टक्क्यांनी वाढ कशी झाली, असा प्रश्न पत्रात उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयुक्तांची भेटही घेतली होती.
काँग्रेसच्या आरोपांना निवडणूक आयोगाचं उत्तर
काँग्रेसने निवडणूक आयोगाकडून मतदार यादीत समाविष्ट केलेल्या ३९ लाख मतदारांचा कच्चा डेटाही मागितला होता. दरम्यान, काँग्रेसच्या आरोपांना केंद्रीय निवडणूक आयोगानं २४ डिसेंबर रोजी उत्तर दिलं होतं. महाराष्ट्रात ४८ लाख ८१ हजार ६२० नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे; तर आठ लाख ३९१ मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. त्यामुळे दोन्ही निवडणुकांमधील एकूण मतदारांची संख्या ४० लाख ८१ हजार २२९ झाली आहे, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं होतं.
हेही वाचा : Ayodhya Election : अयोध्येत ‘सायकल’ चालणार की ‘कमळ’ फुलणार? पोटनिवडणुकीत कुणाचे पारडे जड?
निवडणूक आयोगानं दावा केला होता की, १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै व १ ऑक्टोबर रोजी १८ वर्षं आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांची मतदार यादीत नोंदणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये १८ ते १९ वर्षं वयोगटातील आठ लाख ७२ हजार ९४ मतदार आणि २० ते २९ वयोगटातील १७ लाख ७४ हजार ५१४ मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात या कालावधीत झालेल्या मतदारांची नोंदणी साधारणपणे सामान्य आहे.
दरम्यान, शिर्डीत एकाच इमारतीच्या पत्त्यावरून सात हजार मतदारांची नोंदणी झाल्याचा राहुल गांधींचा आरोप काँग्रेसच्या स्थानिक समितीच्या तक्रारीशी जुळतो. यापूर्वी २०२४ मध्ये राहता काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पंकज लोंढे यांनी शिर्डीच्या विशिष्ट भागात बनावट मतदार नोदणी केली जात असल्याचा आरोप केला होता. विशेष बाब म्हणजे एकाच इमारतीच्या पत्त्यावरून ही नोंदणी होत असल्याचा उल्लेख तक्रारीत नव्हता.
राहुल गांधींच्या आरोपाला मंत्री विखेंचं उत्तर
राहुल गांधी यांच्या आरोपाला मंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, “लोकसभेतील भाषणात राहुल गांधी यांनी शिर्डीतील एका इमारतीत सात हजार मतदारांची नोंद झाल्याचा उल्लेख केला आहे. हा शोध कुठून लावला, त्याचा मी शोध घेणार आहे. कोणतंही विधान करण्यापूर्वी काँग्रेस नेत्यांनी भान ठेवायला हवं. भाजपाला मिळालेल्या जनादेशाचं विरोधी पक्षाला दु:ख झालं आहे”, असा टोला मंत्री विखेंनी लगावला. “ज्यांनी जनाधार गमावला आहे, ते खोटे आरोप करून जनतेसमोर येण्याचा प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यातील अनेक प्रस्थापितांनाही लोकांनी घरी बसवलं आहे”, असे म्हणत नाव न घेता विखेंनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना चिमटा काढला.