Bhagwangad Namdev Shastri : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे महायुती सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यातच भगवानगडचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण करणारी भूमिका घेतल्याने मराठा समाजामध्ये रोष निर्माण झाला आहे. दरम्यान, देहूतील भंडारा डोंगर येथे बुधवारी (५ फेब्रुवारी) शास्त्री यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, मराठा समाजाने विरोध केल्याने श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टने शास्त्री यांचे कीर्तन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण आहेत नामदेव महाराज शास्त्री?

नामदेव महाराज शास्त्री हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील भगवानगडाचे महंत आहेत. भगवानगडच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, नामदेव शास्त्री हे ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक असून कीर्तनकार व प्रवचनकार आहेत. मानसिक समस्या त्यावरील उपाय आणि अध्यात्मिकता वाढण्यास मदत करण्यासाठी ते विविध विषयांवर प्रवचन देतात. परंपरेविषयी त्यांना अधिक माहिती असून आधुनिक काळातील मानसिक समस्यांवर ते उपाययोजना सांगतात. नामदेव महाराज शास्त्री यांचे अधिकृत युट्युब अकाउंट देखील आहे.

आणखी वाचा : Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?

त्यातील एका व्हिडीओमध्ये शास्त्री यांचं सुरुवातीचं शिक्षण आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेत झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांनी संस्कृत साहित्यात सर्वात कठीण असणाऱ्या ‘न्यायशात्रा’चं शिक्षण घेतलं, त्याचप्रमाणे शास्त्री यांनी श्रीगुरू श्री १००८ स्वामी काशिकानन्दगिरीजी महाराज व्दादशदर्शनाचार्य आनंदवन आश्रम कांदीवली येथे गुरुकुल पद्धतीने ९ वर्ष शिक्षणही घेतलं आणि वाराणशी विद्यापीठाची ‘न्यायाचार्य’ ही पदवीही संपादन केली, अशी माहिती या व्हिडीओमध्ये देण्यात आली आहे. पुणे विद्यापीठातून एम.ए. ( मराठी ) करून शास्त्री यांनी ‘वारकरी संतांची कूटरचना’ या विषयावर मराठवाडा विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली.

१५ वर्षांपासून भगवानगडाच्या गादीवर

भगवानबाबांच्या निधनानंतर महंत भीमसिंह महाराज यांना भगवानगडाच्या गादीवर बसवण्यात आलं. त्यांच्यानंतर महंत नामदेव शास्त्री महाराज यांची या गादीवर नियुक्ती करण्यात आली. भगवानगड हा वंजारी समाजाचं श्रद्धास्थान मानला जातो. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी या गडावर संपूर्ण राज्यभरातून भाविकांची गर्दी होते. गेल्या १५ वर्षांपासून शास्त्री हे भगवानगडाची गादी सांभाळत आहेत. राज्यातील सर्वच राजकीय नेत्यांबरोबर शास्त्री यांचे चांगले संबंध आहेत. भारतीय जनता पार्टीतील लोकप्रिय नेते राहिलेल्या तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भगवानगडाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले होते. त्यानंतर भगवानगड राजकीदृष्ट्यादेखील सातत्याने चर्चेत राहिला.

नामदेव शास्त्री धनंजय मुंडेंबाबत काय म्हणाले होते?

संतोष देशमुख हत्याप्रकरणात अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. यापार्श्वभूमीवर मंत्री धनंजय मुंडे हे ३१ जानेवारीला भगवानगडावर गेले आणि संत भगवान बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी गडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्याशी चर्चाही केली. धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर शास्त्री यांनी पत्रकारपरिषद घेतली आणि आपली भूमिका स्पष्ट केली.

धनंजय मुंडे यांच्या पाठिशी भगवान गड भक्कमपणे उभा आहे, असं महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री म्हणाले. “धनंजय मुंडे हे खंडणी घेऊन जगणारे नाहीत, त्यांच्यावर गेल्या ५३ दिवसांपासून मीडिया ट्रायल सुरू आहे. जातीयवाद नष्ट होत असताना काही राजकीय स्वार्थी लोकांनी जातीवाद पुन्हा उफाळून आणला आहे. यात आमच्या सांप्रदायाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पक्षाचे नेते यांनादेखील याची जाणीव आहे की धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत. त्यांनी किती सोसावं?”, असा सवालही शास्त्री यांनी केला.

“बीडच्या घटनेत जे गुन्हेगार आहे त्यांचा शोध सुरू आहे. सरपंच संतोष देशमुख यांची ज्या व्यक्तींनी हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली हे माध्यमांनी का दाखवलं नाही? त्यांना आधी जी मारहाण करण्यात आली, ती देखील दखल घेण्याजोगी आहे. हा त्यांच्या गावाचा मुद्दा आहे. मात्र, त्याला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असंही नामदेव महाराज शास्त्री म्हणाले होते.

संतोष देशमुख यांचे कुटुंबीय शास्त्रींच्या भेटीला

नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय भगवानगडावर गेले होते. यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू आणि त्यांच्या कन्या वैभवी देशमुख यांनी महंत नामदेव शास्त्री यांच्यासमोर सगळी कागदपत्रे पुराव्यासहित सादर केली. तेव्हा भगवान गड कायमस्वरुपी देशमुख कुटुंबाच्या पाठीशी उभा राहील, असे आश्वासन नामदेवशास्त्रींनी देशमुख कुटुंबियांना दिलं. “आरोपींची खरी पार्श्वभूमी काय आहे, त्यांच्यावर गुन्हे किती आहे, ते मला देशमुख कुटुंबियांनी दाखवले आहेत. कुठलाही जातीयवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे माझं गादीवरून सांगणं आहे, असंही शास्त्री म्हणाले होते.

हेही वाचा : मोहन भागवत म्हणतात, ‘हिंदूंनी पारंपरिक कपडे घालावेत आणि इंग्रजी बोलू नये’

नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेंना का विरोध केला होता?

२०१६ मध्ये भाजपा नेत्या पंकजा मुंडे भगवानगडावर मेळावा घेणार होत्या. मात्र, भगवानगडावरून राजकीय भाष्य नको असं म्हणत नामदेव शास्त्रींनी त्यावेळी पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला विरोध केला. या संघर्षाची संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा रंगली होती. पंकजा मुंडेंनी भगवान गडावर यावं मात्र त्यांनी भाषण करु नये, अशी अट शास्त्री यांनी घातली होती. अखेर पंकजा मुंडे यांनी माघार घेतली आणि भगवानगडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घेतला. २०१७ मध्ये पंकजा मुंडे यांनी भगवानबाबांचं गाव असलेल्या बीडच्या सावरगावात दसरा मेळावा घेतला आणि त्याचं नामकरण भक्तीगड असं केलं.

मनोज जरांगे पाटील शास्त्रींबद्दल काय म्हणाले?

नामदेव शास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्यानंतर मराठा समाजामध्ये रोष निर्माण झाला. देहूतील भंडारा डोंगर येथे बुधवारी शास्त्री यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, मराठा समाजाने विरोध केल्याने तो रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही नामदेव महाराज शास्त्री यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. “संतोष देशमुख यांची हत्या केली म्हणून आरोपींना आनंद वाटला असेल. पण ज्यांच्याकडे मानाचा तुरा आहे तिथेही जातीयवाद होऊ शकतो, याचा नवीन अंक पाहायला मिळत आहे”, असं जरांगे म्हणाले.

“आम्ही तुमचा (नामदेव महाराज शास्त्री) सन्मान करतो, पण आपण आपलं बघावं, दुसऱ्यांकडे डोकावून पाहू नका. स्वतःची चूक झाकण्यासाठी डिवचू नका, तुमच्याकडून चूक झाली आहे. एका समाजाला एका बाजूला नेण्याचं काम झालं आहे. जातीय सलोखा बिघडवायला नको होता. पण धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे या सगळ्याचा चौथा अंक पाहायला मिळाला. आरोपींच्या बाजूने मोर्चे निघाले. जातीयवादाचा हा अंक खरंच भयंकर आहे”, अशी टीकाही जरांगे यांनी केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra politics dhananjay munde and bhagwangad namdev shastri relation santosh deshmukh case maratha community opposition sdp