Maharashtra Political News : विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमतानं विजयी झालेल्या महायुती सरकारनं कामाला सुरुवात केली. मात्र, भाजपा आणि शिवसेना शिंदे गटातील नेत्यांमध्ये मतभेद होत असल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी राजकीय नेत्यांची वर्णी लावण्याची प्रथा मोडीत काढून शिवसेना शिंदे गटावर कुरघोडी केली आहे. हा निर्णय शिवसेना आणि भाजपा युतीचे सर्वांत मोठे समर्थक असलेले मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रभावामुळे घेण्यात आला, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
महायुती सरकारने परिवहन खात्याची जबाबदारी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे दिली आहे. सध्या प्रताप सरनाईक या खात्याचे मंत्री असून, ते कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे सरनाईक हे विवादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. शासकीय महामंडळावरील नेमणुकीच्या वेळी शिवसेना शिंदे गटाने एसटी महामंडळावर दावा सांगितला होता.
आणखी वाचा : Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा निकाली काढून, महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा प्रशासनातील ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याकडे सोपवली. विशेष बाब म्हणजे १९६० पासून एसटी महामंडळाचे प्रमुखपद सरकारमधील परिवहन मंत्री किंवा निवडलेल्या प्रतिनिधीकडून सांभाळते जात होते. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कामकाजाबद्दलच्या असंतोषामुळे मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला, असं सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.
प्रताप सरनाईक कोण आहेत?
प्रताप सरनाईक हे ठाणे जिल्ह्यातील ओवळा-माजिवाडा मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. हा मतदारसंघ शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात येतो. आपल्या चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत सरनाईक यांनी मोठ्या राजकीय उलथापालथी घडवून आणल्या आहेत. १९८४ ते १९८९ पर्यंत सरनाईक यांनी ठाण्यात रिक्षाचालक म्हणून काम केले. त्यानंतर गेल्या दोन दशकांत या प्रदेशातील भरभराटीच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठी संपत्ती जमा केली.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून राजकीय कारकीर्दीला सुरुवात
प्रताप सरनाईक यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केली होती. सुरुवातीला ते ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक झाले. २००८ मध्ये महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीवरून राष्ट्रवादी काँग्रेसशी मतभेद झाल्यानंतर ते शिवसेनेत सामील झाले. सरनाईक यांना राजकारणातील त्यांच्या व्यावहारिक दृष्टिकोनासाठी ओळखलं जातं. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना हिऱ्यांनी जडवलेला मोबाईल भेट दिला होता.
शिवसेनेकडून तिकीटावर पहिल्यांदा आमदार
दरम्यान, शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सरनाईक यांचे राजकीय भाग्य उजळले आणि ते ओवळा-माजिवाडा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. ठाणे आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरातील सरनाईक यांनी अनेक उद्योग सुरू केले. त्यांनी विहंग ग्रुपद्वारे रिअल इस्टेट क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सरनाईक यांचे बॉलीवूडमधील कलाकारांबरोबरही चांगले संबंध आहेत. दिमाखदार व्यक्तिमत्त्वामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सरनाईक यांनी वेगळीच छाप पाडली आहे. ठाण्यात दरवर्षी सरनाईक यांच्या वतीने दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आणि या कार्यक्रमाला मोठी गर्दी होते.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात ईडीचा ससेमीरा
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना प्रताप सरनाईक अडचणीत सापडले होते. नोव्हेंबर २०२० मध्ये ते अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर आले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाबरोबर (MMRDA) सुरक्षा कराराशी संबंधित एका समूहाकडून सात कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप सरनाईक यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर जून २०२१ मध्ये त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपाबरोबर जाण्याची विनंती केली होती. राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबरची युती तोडून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींशी समेट करावा, असं सरनाईक यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं.
प्रताप सरनाईक हे एकनाथ शिंदेंचे प्रमुख समर्थक
महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकसंध शिवसेनेतील अनेक मंत्री आणि नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा लागला होता. शिवसेना आणि भाजपा यांच्यात पुन्हा युती झाल्यास केंद्रीय यंत्रणा राजकीय नेत्यांना लक्ष्य करणार नाही, असंही सरनाईक म्हणाले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी त्यांचं पत्र गांभीर्यानं घेतलं नाही. परिणामी सरनाईक हे एकनाथ शिंदे गटाचे प्रमुख समर्थक म्हणून उदयास आले. शिवसेनेच्या आमदारांच्या मोठ्या गटाला एकनाथ शिंदेंना साथ देण्यास राजी करण्यामागे सरनाईक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
महायुती सरकारमध्ये परिवहन खात्याची जबाबदारी
राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला मंत्रिपद मिळेल, अशी आशा सरनाईक यांना होती. मात्र, त्यावेळी त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. डिसेंबर २०२४ मध्ये राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि प्रताप सरनाईक यांना परिवहन खात्याची जबाबदारी मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर काही महिन्यांतच सरनाईक माध्यमांमध्ये अधिक प्रसिद्ध झाले. त्यांनी नवीन वाहतूक धोरण आणि बाईक टॅक्सी कायदेशीर करण्याच्या उपक्रमांची घोषणा केली.
हेही वाचा : Namdev Shastri Kirtan : कोण आहेत भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री? त्यांच्या कीर्तनास विरोध का होत आहे?
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे सरनाईक नाराज?
गेल्या आठवड्याच्या शेवटी सरनाईक यांनी कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी कर्नाटकला भेट दिली आणि त्यांच्या कार्यक्षमतेची प्रशंसा केली. त्यानंतर अवघ्या चार दिवसांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सनदी अधिकारी संजय सेठी यांच्याकडे सोपवली. मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय शिवसेना शिंदे गटासह प्रताप सरनाईक यांना धक्का देणारा ठरला. कारण- या निर्णयामुळे सरनाईक यांचे परिवहन खात्यातील अधिकार कमी झाल्याची चर्चा आहे.
‘परिवहन विभागाचा मंत्री असल्यामुळे अंतिम निर्णय माझाच’
मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानंतरही प्रताप सरनाईक यांनी आत्मविश्वासपूर्ण भूमिका कायम ठेवली आहे. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी करण्यात आलेली सेठी यांची नियुक्ती तात्पुरती असल्याचा दावा सरनाईक यांनी केला आहे. महामंडळातील हे पद पुन्हा राजकीयदृष्ट्या शिवसेनेकडे येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. मी परिवहन विभागाचा मंत्री असल्यानं माझ्यामार्फतच निर्णय घेतले जातील, असं सरनाईक यांनी शुक्रवारी माध्यमांना सांगितलं आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटावर कुरघोडी केल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीत आणखी मतभेद होऊ शकतात, असं मत राजकीय विश्लेषकांनी मांडलं आहे.