Kunal Kamra on Eknath Shinde : प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं एका विडंबनात्मक गाण्यातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. या गाण्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाला. त्यानंतर शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी खारच्या (मुंबई) युनिकाँटिनेंटल हॉटेलमध्ये जाऊन कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली. या तोडफोडीनंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून १२ शिवसैनिकांना अटक केली. अटक करण्यात आलेले सर्व जण मुंबईतील वांद्रे आणि खार भागातील शिंदे गटाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. अटकेनंतर त्याच दिवशी (तारीख २३ मार्च) सर्वांची जामिनावर सुटका करण्यात आली. दरम्यान, कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड करणाऱ्यांमध्ये कोणाकोणाचा समावेश होता? याबाबत जाणून घेऊ…
राहुल कनाल कोण आहेत?
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, या तोडफोडीचं नेतृत्व शिंदे गटाच्या युवा सेनेचे सरचिटणीस राहुल कनाल यांनी केलं. ३९ वर्षीय राहुल कनाल हे मुंबईतील वांद्रे परिसरात राहतात. २०१० पासून त्यांनी एकसंध शिवसेनेत प्रवेश करून, आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. अत्यंत कमी कालावधीत ते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय झाले. या काळात त्यांची मुंबईतील युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर कनाल यांनी आदित्य ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला. तेव्हापासून ते शिंदे गटाच्या युवा सेनेचे सरचिटणीस म्हणून काम करीत आहेत.
तोडफोडीनंतर कनाल नेमके काय म्हणाले?
राहुल कनाल यांचे वांद्रे परिसरात एक हॉटेल आहे. बॉलीवूड सेलिब्रिटी आणि खेळाडूंबरोबरही त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. कनाल हे अभिनेता सलमान खानबरोबर अनेकदा मुंबईत अन्नवाटप करतानाही दिसले आहेत. दरम्यान, कनाल यांनी गुरुवारी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं, “शिवसेना कार्यकर्त्यांचा स्टुडिओची तोडफोड करण्याचा कोणताही हेतू नव्हता. स्टुडिओचे मालक बलराज यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केलं. त्यानंतर संतापलेल्या शिवसैनिकांनी तिथे तोडफोड केली. मी कुणाल कामरा आणि मुन्नवर फारुकी यांच्यासह सर्व कलाकारांना ओळखतो. त्यांना नेहमीच पाठिंबा देत आलो आहे. परंतु, जेव्हा कुणालचा व्हिडीओ पाहिला, तेव्हा आम्ही सुरुवातीला बलराजशी संपर्क साधला आणि शोबद्दल विचारपूस केली.”
आणखी वाचा : Maharashtra Politics : कुणाल कामराचा ‘तो’ शब्द शिंदे गटाच्या जिव्हारी का लागला?
“मात्र, बलराज आमच्याबरोबर नीट बोलला नाही. माझं काम स्टुडिओ भाड्यानं देणं आहे. तिथे कोण काय करतो याच्याशी मला काही घेणं-देणं नाही, असं त्यानं मला सांगितलं. आमचा तोडफोड करण्याचा कोणताही हेतू नव्हता. आम्ही तिथे फक्त बोलण्यासाठी गेलो होतो; पण त्याच्या वागणुकीमुळे शिवसैनिक संतापले आणि त्यांनी स्टुडिओची तोडफोड केली”, असंही राहुल कनाल यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. दरम्यान, कनाल यांनीही पोलिसांत तक्रार दाखल केली असून, कुणाल कामराचे यूट्यूब व्हिडीओ आणि त्याच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी व्हावी, असं त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
कुणाल सरमलकर
४२ वर्षीय कुणाल सरमलकर हे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत. त्यांच्याकडे कामगार सेनेचं अध्यक्षपद आणि विमानतळ विमान वाहतूक रोजगार संघटनेचे सरचिटणीस या पदांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याशिवाय ते मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत. राहुल कनाल यांचे निकटवर्तीय म्हणूनही ते ओळखले जातात.
अक्षय पनवेलकर
अक्षय पनवेलकर यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला आदित्य ठाकरे यांच्याबरोबर काम केलं. मात्र, एकसंध शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी शिंदे गटाची कास धरली. त्यानंतर त्यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा जागेसाठी पक्षाचे प्रभारी करण्यात आले. पनवेलकर हे या भागातील पक्षाचे कामकाज पाहतात. पनवेलकर यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, “ते शिंदे सेनेशी एकनिष्ठ असून, एकनाथ शिंदे यांना ते आपले आदर्श मानतात.
विलास चावरी
विलास चावरी हे २००७ ते २०१२ या कालावधीत एकसंध शिवसेनेचे नगरसेवक होते. २०१४ मध्ये त्यांनी वांद्रे-पूर्व येथून विधानसभा निवडणूक लढवली. परंतु, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर चावरी यांनी अविभाजित शिवसेनेत मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. काही काळासाठी त्यांनी शिवसेनेच्या रायगड जिल्ह्याचे मुख्य समन्वयक म्हणूनही काम केले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर २०२३ मध्ये ते शिंदे गटात सामील झाले.
राहुल तुरबाडकर
राहुल कनाल यांचे अत्यंत विश्वासू म्हणून राहुल तुरबाडकर यांची ओळख आहे. सध्या ते खार पश्चिमेचे शिवसेना वॉर्ड अध्यक्ष आहेत. यापूर्वी ते शिवसेना स्थानिक कामगार संघटनेचे सचिव होते. कुणाल कामरा याच्या स्टुडिओची तोडफोड करण्यात राहुल आघाडीवर होते.
गोविंद ऊर्फ पॅडी
गोविंद ऊर्फ पॅडी हे राहुल कनाल यांचे वैयक्तिक सहायक आहेत. शिंदे गटाच्या नेत्यांबरोबर त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. शिवसैनिक कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड करताना गोविंदही तिथे हजर होते.
हेही वाचा : Dara Shikoh : औरंगजेबाचा मोठा भाऊ दारा शिकोह कोण होता? आरएसएसकडून त्याची प्रशंसा कशासाठी?
अमीन शेख
अमीन शेख हे शिंदे गटाचे पदाधिकारी असून, वॉर्ड क्रमांक ९८ चे शाखाप्रमुखही आहेत. कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केल्यानंतर त्यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, मला जे करायचं होतं ते मी केलं. याबाबत मला कोणताही पश्चात्ताप नाही. शिंदेसाहेबांवर टीका करणाऱ्यांना आम्ही अशाच शब्दांत उत्तर देऊ.
समीर महापदी
समीर महापदी हे शिंदे गटाच्या युवा सेनेचे सदस्य आहेत. राहुल कनाल यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी समीर यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.
शोभा पालवे
शोभा पालवे या शिंदे गटाच्या वांद्रे येथील शाखाप्रमुख आहेत. एकसंध शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात प्रवेश केला होता. कुणाल कामरा याच्या स्टुडिओची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी शोभा पालवे यांच्यावरही गुन्हा दाखल केलेला आहे.
शशांक कोंदे
एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून शशांक कोदे यांची ओळख आहे. त्यांच्या पत्नी वांद्रे-खार परिसरातील शिवसेनेच्या शाखाप्रमुख आहेत. कुणाल कामरा याच्या स्टुडिओची तोडफोड करणाऱ्यांमध्ये शशांक यांचाही समावेश होता. पोलिसांनी त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.
संदीप मालाप
संदीप मालाप हे आधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होते. मात्र, २०२३ मध्ये त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. कुणाल कामराने एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका केल्यानंतर संदीप मालाप यांनीही आक्रमक पवित्रा घेतला. कामराच्या स्टुडिओची तोडफोड करण्यात संदीप मालापही आघाडीवर होते.
गणेश राणे
गणेश राणे हे खार येथील रहिवासी असून, शिंदे गटाच्या युवा सेनेचे कार्यकर्ते आहेत. राहुल कनाल यांचे सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केल्याप्रकरणी त्यांच्यावरही गुन्हा दाखल झालेला आहे. सध्या त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.