kunal kamra on Eknath Shinde : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्यानं चर्चेत आहेत. गेल्या आठवड्यात माध्यमांशी संवाद साधताना शिंदेंनी त्यांच्या विरोधकांना एक सूचक इशारा दिला होता. “मी शिवसेनेचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला हलक्यात घेऊ नका”, असं शिंदे म्हणाले होते. त्यादरम्यान, प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरानं एक विडंबनात्मक गाण्यातून एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. त्यावरून शिंदे गट आक्रमक झाला असून, त्यांनी कुणाल कामराच्या मुंबईतील स्टुडिओची तोडफोड केली आहे.
शिंदे गटाची भूमिका काय?
शिवसेनेच्या (शिंदे गट) तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी कामरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परंतु, कामरा त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत; तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा असायला हव्यात, असं शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, शिंदे गटाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या आक्रमकपणाने काहींना जुन्या शिवसेनेची आठवण करून दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेकडे आक्रमक पक्ष म्हणून बघितलं जायचं. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात त्यात काहीशी नरमाई आली. परंतु, तरीही अधूनमधून शिवसैनिक आपल्या पक्षाच्या आक्रमकतेची जाणीव इतरांना करून देत होते. याच मार्गाचा अवलंब करून शिंदे गट राज्यातील आपलं आक्रमक नेतृत्व पुन्हा दाखवून देण्याचा प्रयत्न करीत असल्याचं दिसून येत आहे.
ठाकरे गटाकडून शिंदेंवर टीका
कॉमेडियन कुणाला कामरा यानं ज्या शब्दाचा वापर करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली, तो शिंदे गटासाठी काही नवीन नाही. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर एकसंध शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. परिणामी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. भाजपाबरोबर हातमिळवणी करून एकनाथ शिंदे यांनी राज्यात महायुतीचं सरकार स्थापन केलं. त्यानंतर ठाकरे गट प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्या शब्दप्रयोगाचा वारंवार वापर करून शिंदे गटाला लक्ष्य केलं.
आणखी वाचा : BJP MLAs suspended : भाजपाच्या १८ आमदारांचं निलंबन का करण्यात आलं? काय आहेत नियम? कायदा काय सांगतो?
शिंदे गट आक्रमक का झालाय?
अगदी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीचे नेते व्यासपीठावरून सर्रासपणे शिंदे गटावर टीका करीत होते. आता प्रश्न असा आहे की, यावेळी कुणाल कामरा यानं वापरलेला तो शब्द शिंदे गटाच्या इतका जिव्हारी का लागला. सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीतील सूत्रांच्या मते, या वर्षाच्या अखेरीस बृहन्मुंबई महापालिकेसह (BMC) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांपूर्वी शिंदे यांच्या नेतृत्वाला पुन्हा पुष्टी देण्याचा त्यांच्या पक्षाच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. गेल्या तीन दशकांपासून मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं एकहाती वर्चस्व आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत काय होणार?
यंदाही मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी ठाकरेंनी संपूर्ण ताकद पणाला लावून दिली आहे. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट विरुद्ध एकनाथ शिंदे गट, असा चुरशीचा सामना रंगणार आहे. या महत्त्वाच्या लढाईत एकनाथ शिंदे हे राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने एकहाती विजय मिळवून राज्यात सलग दुसऱ्यांदा सत्तेत येण्याची किमया करून दाखवली. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं ५७ जागा, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं ४१ जागा व भाजपानं तब्बल १३२ जागा जिंकल्या.
मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने शिंदे नाराज?
विशेष बाब म्हणजे महायुतीनं विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची माळ आपल्या गळ्यात पडेल, अशी आशा शिंदेंना होती. मात्र, भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वानं ऐन वेळी डाव टाकून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहणाऱ्या शिंदेंना अखेर उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं. त्यानंतर शिंदे हे नाराज असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली. पालकमंत्री पदावरून वाद झाल्यानंतर ही नाराजी अधिकच उघडपणे दिसून आली. महायुतीत नाराज असलेले एकनाथ शिंदे हे आता शिवसेनेच्या जुन्या शैलीकडे वळण्यासाठी आक्रमक राजकारणाचा प्रयोग करीत आहेत, असं सरकारमधील अंतर्गत सूत्रांनी सांगितलं.
शिंदे गटानं कुणाला कामराला काय इशारा दिला?
शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले, “जर कोणी आमच्या नेत्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली, तर शिवसैनिक फक्त बघ्याची भूमिका घेणार नाहीत. अशा व्यक्तीला आमचे कार्यकर्ते त्यांच्याच शैलीत उत्तर देण्यासाठी तयार आहेत. पक्षनेत्यावर कोणी आरोप का करावेत?” त्यानंतर म्हस्के यांनी, “ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीदेखील आहेत. आम्ही या घटनेचा नेहमीच निषेध करतो. कुणाल कामराला महाराष्ट्रात फिरू देणार नाही”, असा इशाराही दिला आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. “तुम्ही स्टॅण्डअप कॉमेडी करा; मात्र अपमानित करण्याचं काम कोणी करीत असेल, तर ते सहन केलं जाणार नाही”, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
कामराच्या गाण्यावर मुख्यमंत्री काय म्हणाले?
“स्टॅण्डअप कॉमेडी करण्याचा अधिकार कोणालाही आहे. मात्र, स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही. खरं म्हणजे कुणाल कामराला हे माहीत पाहिजे की, महाराष्ट्रातील जनतेनं २०२४ साली कोण गद्दार आणि कोण खुद्दार? हे दाखवून दिलेलं आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विरासत कोणाकडे गेली? हे जनतेनं दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे खालच्या स्तराची कॉमेडी करून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अनादर करण्याचा अधिकार कोणालाही नाही, हे चुकीचं आहे”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आक्रमक पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख
मराठी माणसांचे हित जोपासण्याची बाळासाहेब ठाकरे यांनी जून १९६६ मध्ये शिवसेनेची स्थापना केली. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण, अशी भूमिका त्यावेळी बाळासाहेबांनी घेतली. मात्र, मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसैनिकांनी अनेकदा रस्त्यावर हाणामारी केली. त्यामुळे अत्यंत कमी दिवसांतच शिवसेनेनं मराठी भाषकांच्या मनावर आपली मोहोर उमटवली. पुढे बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेतला. भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध करण्यासह शिवसैनिकांनी व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात निदर्शनेही केली. ऑक्टोबर १९९१ मध्ये भारत-पाकिस्तान सामन्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांच्या एका गटाने मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील खेळपट्टी खोदून टाकली होती, ज्यामुळे ही मालिका रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयला घ्यावा लागला.
हेही वाचा : पर्रीकर वेडे होते का? गोव्यात प्रमोद मुतालिक यांच्यावरील बंदी मागे घेतल्याने आमदार संतप्त
शिवसेनेची सूत्रे उद्धव ठाकरेंकडे
एवढ्यावरच न थांबता, शिवसैनिकांनी जानेवारी १९९९ मध्ये नवी दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियम (सध्याचे अरुण जेटली स्टेडिमय)वरची खेळपट्टी खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यांमुळे भारतीय जवान हुतात्मा होत आहेत. त्यांच्याबरोबर क्रिकेट कसलं खेळताय, असा प्रश्न त्यावेळी बाळासाहेबांनी उपस्थित केला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केल्याबद्दल अनेक हिंदी आणि मराठी टीव्ही चॅनेल्सनाही शिवसैनिकांनी लक्ष्य केलं होतं. २०१२ मध्ये त्यांच्या निधनानंतर शिवसेनेची सूत्रं उद्धव ठाकरे यांच्या हाती आली. २०१५ मध्ये शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानी गायक गुलाम अली यांचा मुंबईत होणारा एक संगीत कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.
कंगनाचा शिवसेनेबरोबर ‘पंगा’
२०२० मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात आढळून आला. या प्रकरणावरून अभिनेत्री कंगना रणौतनं शिवसेनेला लक्ष्य केलं होतं. त्यानंतर शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेनं कंगना रणौतच्या मुंबईतील घराचा काही भाग पाडला होता. कंगनानं अनाधिकृतपणे बांधकाम केल्याचा दावा त्यावेळी शिवसेनेकडून करण्यात आला. त्या कारवाईनंतर ‘सामना’चे संपादक व शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘उखाड दिया’ अशा मथळ्याखाली अग्रलेख लिहिला होता. शिवसैनिकांबरोबर “पंगा’ घेणं कंगनाला भारी पडलं”, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया त्यावेळी महाराष्ट्राभरातून आल्या होत्या. दरम्यान, बाळासाहेब ठाकरेनंतर उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची कास सोडली, असा आरोप वारंवार शिंदे गटाकडून केला जात आहे. शिवसेनेची जुनी आक्रमकता दाखवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न किती यशस्वी ठरेल ते आगामी काळातच दिसून येईल.