Raj Thackeray Uddhav Thackeray Maharashtra : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे कधीतरी एकत्र येतील, अशी चर्चा सतत जागती ठेवली जाते. त्यांच्या आजूबाजूचे नेते, कार्यकर्ते व नातेवाईक याबद्दल सूचक विधाने करीत असतात. मात्र, यावेळी स्वत: उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्रित येण्याबाबत वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही नेत्यांनी त्यांचे वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे हे नेते खरंच एकत्र येणार का? आले तर युती करणार की एकाच संघटनेतून लढणार? असे असंख्य प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.
मनसे-शिवसेनेची युती कोणाच्या हाती?
शिवसेनेचे खासदार व उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या विश्वासू व्यक्तींपैकी एक असलेल्या संजय राऊत यांनी रविवारी (२० एप्रिल) सांगितलं की, दोन्ही पक्ष एकत्रित येण्याबाबतचा अंतिम निर्णय दोन्ही भावांवर सोडण्यात आला आहे. सध्या सुरू असलेली चर्चा फक्त भावनिक असून शिवसेना-मनसे युतीबाबत अद्याप काहीही ठरलेलं नाही. दरम्यान, राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यानंतर दोन्ही भावांमधील दरी वाढल्याचे दिसून येत होते. राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी एकत्रित येण्याच्या चर्चा यापूर्वीही झाल्या आहेत. मात्र, यावेळी मिळालेले संकेत सर्वांत ठोस मानले जात आहेत.
राज ठाकरे युतीबाबत काय म्हणाले होते?
चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांना शनिवारी दिलेल्या मुलाखतीत मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले, “आमच्यातले वाद, भांडणं अत्यंत किरकोळ आणि लहान आहेत. महाराष्ट्र फार मोठा आहे आणि या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि वाद अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं अन् एकत्र राहणं ही फार काही कठीण गोष्ट नाही. मी महाराष्ट्राच्या कल्याणाच्या मार्गात माझा अहंकार आडवा येऊ देणार नाही. परंतु, हा विषय इच्छेचा आहे. हा माझ्या एकट्याच्या इच्छेचा विषय नाही. मला तर वाटतं सगळ्या पक्षांतल्या मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा”.
उद्धव ठाकरे यांनी काय प्रतिसाद दिला?
दरम्यान, राज ठाकरे यांनी एकत्रित येण्याबाबत वक्तव्य केल्यानंतर त्याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. “महाराष्ट्राच्या हितासाठी मी एकत्र येण्यास तयार आहे. मी किरकोळ मुद्दे बाजूला ठेवण्यास तयार आहे. माझे कधीही मतभेद नव्हते. तरीही मी सर्व वाद बाजूला ठेवले आहेत,” असं उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील पक्षकार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं.
मनसे-शिवसेना युती खरंच शक्य आहे का?
शिवसेना व मनसे हे मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढणारे दोन्ही पक्ष सध्या राजकीयदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. शिवसेनेत फूट पडून मोठा गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्षाचं नाव व चिन्हही गमावलं आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे फक्त २० आमदार निवडून आले आहेत. तर भाजपा, शिवसेना (शिंदे गट) व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं मिळून राज्यात एकहाती सत्ता स्थापन केली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) राजकीय प्रभाव गेल्या काही वर्षांत कमी होत असल्याचं दिसून येत आहे.
मनसे-शिवसेना युतीची का होतेय चर्चा?
राज ठाकरे यांचा पक्ष राज्यातील मुख्य राजकारणाच्या कडेला फेकला गेल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत. राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करीत असले तरी त्यांनी महायुती सरकारची उघडपणे बाजू घेतलेली नाही. त्याचबरोबर त्यांनी महाविकास आघाडीवर थेट टीका करणं टाळलं आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील एका ज्येष्ठ नेत्यानं सांगितलं, “उद्धव आणि राज ठाकरे सध्या दोघेही अस्थिर स्थितीत आहेत. जर त्यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या, तर त्यांना मोठं अपयश येऊ शकतं. परंतु, त्यांनी एकत्रित येऊन निवडणुका लढविल्यास दोन्ही पक्षांना बळकटी मिळू शकते.”
‘युतीसाठी राज-उद्धव यांना तडजोड करावी लागणार’
दरम्यान, मनसे व शिवसेना (ठाकरे गट) युती यशस्वी होण्यासाठी राज व उद्धव यांना तडजोड करावी लागेल, असं दोन्ही गटातील काही नेत्यांनी मान्य केलं आहे. “पहिला महत्त्वाचा टप्पा म्हणजे मनसेची सध्याची निवडणूक स्थिती दुर्लक्ष करून, शिवसेनेला त्यांना जागावाटपात समान अधिकार द्यावे लागतील. त्याचबरोबर महाराष्ट्र आणि मुंबईसाठी एक सामायिक किमान कार्यक्रम तयार करावा लागेल, ज्यासाठी सातत्याने संवाद आणि पारदर्शकता आवश्यक आहे. तसेच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते स्थानिक पातळीवर समन्वयानं काम करतील, याची खात्री करावी लागेल”, असं मनसेतील एका सूत्रानं सांगितलं.
पक्षातील सूत्रांच्या मते, शिवसेना व मनसे यांच्यातील युती तेव्हाच शक्य होईल, जेव्हा उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतून बाहेर पडतील. त्याचबरोबर राज ठाकरे यांना भाजपा व शिंदेंच्या शिवसेनेबरोबरचे सर्व छुपे संबंध तोडावे लागतील, असंही ते म्हणाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागावाटपाचा मुद्दाही दोन्ही पक्षांतील युतीसाठी निर्णायक ठरू शकतो. या जागावाटपातूनच दोन्ही पक्षांच्या प्रमुखांची एकमेकांना सामावून घेण्याची तयारी आहे की नाही हे स्पष्ट होईल, असं शिवसेनेतील एका सूत्रानं सांगितलं.
मनसे-शिवसेना युतीसाठी कोणत्या अडचणी?
त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धोरणात्मक भूमिका (आदर्श विचारसरणी). भाजपाची कास सोडली असली तरी मी अजून हिंदुत्व सोडलेलं नाही, असं उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणांमधून वारंवार सांगताना दिसून येतात. तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पार्टीबरोबरच्या युतीमुळे त्यांची प्रतिमा काहीशी मवाळ झाल्याचं दिसून येतं. मुस्लिम समुदायातील मतदारांचंही उद्धव ठाकरे यांनी काही प्रमाणात समर्थन मिळवलं आहे. त्याच्या तुलनेत राज ठाकरे अजूनही कट्टर हिंदुत्वाच्या राजकारणावर ठाम आहेत. काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुखांनी मशिदींवरील भोंगे बंद करण्याच्या मुद्दा जोरकसपणे लावून धरला होता. जर मनसे व शिवसेना एकत्र आले, तर राज व उद्धव यांच्या विचारसरणीतील तफावत कशी मिटवली जाईल, हादेखील एक मोठा प्रश्न आहे.
हेही वाचा : President Rule : ममता बॅनर्जी यांचं सरकार बरखास्त होणार? बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची का होतेय मागणी?
मनसेतील एका नेत्याने सांगितले, “वैयक्तिक संबंध आणि राजकारण वेगळं असतं. शिवसेनेतील (ठाकरे गट) जे लोक राज ठाकरे यांच्या सत्ताधारी महायुतीसोबतच्या संबंधांवर प्रश्न उपस्थित करीत आहेत, त्यांनी हे लक्षात घ्यावं की, २०१९ च्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात उघडपणे बोलत होते. त्यावेळी विरोधी पक्षांतील कोणत्याही नेत्यांनी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाविरुद्ध बोलण्याची हिंमत दाखवली नव्हती.”
महाराष्ट्रातील मराठी अस्मितेचा मुद्दा
महायुती सरकारने मंजूर केलेल्या त्रिभाषिक धोरणाचा राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी विरोध केला आहे. या धोरणानुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी ही तिसरी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. दक्षिण भारतातील राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात हिंदीविरोधी भावनांचा जोर नसला तरी विदर्भ आणि मराठवाडा भागांत मराठी भाषकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे तेथे मराठी अस्मितेचा आग्रह हा राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू असतो. विशेषतः मुंबईमध्ये पारंपरिकपणे मराठी विरुद्ध अमराठी असा सामाजिक आणि राजकीय संघर्ष पाहायला मिळतो. आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीमध्ये हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.
मनसे-शिवसेना युती झाल्यास काय होईल?
मुंबईमध्ये मराठी भाषकांची लोकसंख्या सुमारे ३०-३५ टक्के असल्याचं सांगितलं जातं. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्रित येऊन मराठी मतदारांवर लक्ष केंद्रित केल्यास त्यांना महापालिका निवडणुकीत मोठं यश मिळू शकतं, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. महाराष्ट्रात ७० टक्के लोक मराठी भाषक असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही दोन्ही पक्षांना अभूतपूर्व यश मिळण्याचा अंदाजही राजकीय विश्लेषकांनी वर्तविला आहे. मनसे व शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील युती भाजपा व त्यांच्या मित्रपक्षांसमोर मोठं राजकीय आव्हान उभी करू शकते. कारण- मराठी अस्मितेचा हाच मुद्दा दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला राज्याच्या राजकारणात बळकटी देऊन गेला होता, असं काहीचं मत आहे.