Maharashtra Political News : शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत हे महाराष्ट्रातील राजकारणात एक प्रमुख नेते म्हणून वेगाने उदयास आले. मात्र, एका हवाई प्रवासामुळे माजी मृद व जलसंधारण मंत्र्यांची कठीण लँडिंग होण्याची शक्यता आहे. यासाठी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांची बँकॉकवारी कारणीभूत ठरत आहे. सोमवारी (११ फेब्रुवारी) माजी मंत्र्यांनी आपल्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांपासून ते हवाई दल आणि थायलंडच्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्व यंत्रणा कामाला लागली. परंतु, प्रत्यक्षात हे अपहरण नव्हते, तर ऋषिराज हा आपल्या मित्रांसोबत बँकॉकच्या वारीला गेल्याचं उघडकीस आलं.

यानंतर पुणे पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये ऋषिराज यांचा माग काढून त्यांचे बँकॉकला जाणारे विमान हवेतूनच माघारी फिरवलं. मात्र, मुलाला परत आणण्यासाठी सावंत यांनी शासकीय यंत्रणांचा गैरवापर केला, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. माजी मंत्र्यांनी प्रशासनाचा जो वेळ वाया घालवला त्याबाबत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी देखील विरोधक करीत आहेत.

ऋषीराज कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला न कळवता अचानक घरातून निघून गेल्याने आम्हाला चिंता वाटत होती, असं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. तर दुबईनंतर लगेच बँकॉकला जाण्याचा प्लान केल्याने कुटुंबीय नाराज होईल म्हणून मी त्यांना अंधारात ठेवलं, असं ३२ वर्षीय ऋषिराज यांनी सांगितलं आहे. दुसरीकडे विरोधकांनी याला कौटुंबिक कलह म्हणत शिवसेना नेते सरकारी तिजोरीतील पैशांवर डल्ला मारत असल्याचा आरोप केला आहे.

आणखी वाचा : Who is Tulsi Gabbard : कोण आहेत तुलसी गॅबार्ड? अमेरिकेत दाखल होताच मोदींनी त्यांची भेट का घेतली?

कोण आहेत तानाजी सावंत?

तानाजी सावंत हे धाराशिव (पूर्वीचे उस्मानाबाद) जिल्ह्यातील भूम परांडा वाशी मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांचा जन्म १ जून १९६४ साली सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव येथे झाला. सावंत यांचे मूळ गाव हे सोलापूर आहे. २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात सावंत यांनी म्हटले आहे की, ते इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर आहेत. त्यांनी या विषयात पीएचडीदेखील केली आहे. राजकारणात येण्यापूर्वी सावंत यांनी एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केलं आहे.

तानाजी सावंत यांच्या अनेक शिक्षणसंस्था

सावंत यांनी १९९८ मध्ये जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ या नावाने स्वतःचा धर्मादाय ट्रस्ट नोंदवला. त्यानंतर २००१ मध्ये त्यांनी पुण्यात राजर्षी शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाची सुरुवात केली. २००१ ते २०१४ या काळात सावंत पुणे शहरात आणि आसपास सहा कॅम्पस उघडले. इंजिनिअरींग, मेडिकल, फार्मसी, मॅनेजमेंट अशा सर्वच क्षेत्रातले एकूण ५८ अभ्यासक्रम त्यांच्या संस्थांमध्ये शिकवले जातात. त्यांचे पुत्र ऋषिराज हे संस्थेचे पदाधिकारी म्हणून जोडलेले आहेत. कौटुंबिक व्यवसायातही त्यांनी वडिलांना हातभार लावला आहे.

राज्यातील बहुतेक यशस्वी राजकारण्यांप्रमाणेच सावंत यांचेही मूळ साखर उद्योगात आहे. त्यांची संस्था सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातीत अनेक साखर कारखाने चालवते. एकेकाळी सावंत यांनी मराठवाड्यातील सर्वात मोठ्या तेरणा सहकारी साखर कारखान्याचे पुनरुज्जीकरण केले होते. मात्र, नंतर हा कारखाना बंद पडल्याने मोठा वादंग उठला होता. या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांनी घाम आणि अश्रूंव्यक्तिरिक्त रक्तरंजित संघर्षही बघितला.

तेरणा साखर कारखान्याच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे माजी मंत्री पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यातील वितुष्ट टोकाला पोहोचलं होतं. या वादाचा शेवट निंबाळकर यांच्या हत्येने झाला. यानंतर पद्मसिंह पाटील यांच्यावर खूनाचे आरोप झाले आणि २००९ मध्ये ते काही महिन्यांसाठी तुरुंगातही गेले. त्यानंतर जामीनावर सुटका करण्यात आल्यानंतर पद्मसिंह पाटील तुरुंगातून बाहेर आले. या प्रकरणाची सुनावणी अजूनही सुरू आहे.

२०१५ मध्ये शिवसेनेत प्रवेश

माजी मंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केली होती. मात्र, तिथे आमदारकीची संधी न मिळाल्याने त्यांनी २०१५ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. अल्प काळातच सावंत यांनी ठाकरेंचा विश्वास संपादित केला आणि संघटनेत संपर्कप्रमुख, उपनेते अशी पदे भूषविली.२०१६ मध्ये सावंत हे यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले.

महायुती सरकारमध्ये भूषवले मंत्रिपद

महायुती सरकारच्या २०१९ साली विधानपरिषदेची तीन वर्षं शिल्लक असताना त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम परांडा येथून विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन टर्म आमदार राहिलेले राहुल मोटे यांचा पराभव केला. २०१९ मध्ये राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली. शिवसेना-भाजपा युती सरकारमध्ये त्यांच्याकडे जल आणि मृदा संवर्धन खात्याची जबाबदारी देण्यात आली.

खेकड्यांमुळे धरण फुटल्याचा दावा

यादरम्यान कोकणातील तुफान पावसामुळे जुलै महिन्यात चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले आणि या दुर्घटनेत १९ हून अधिक जणांचा मृत्यू झाला. त्यावेळी माध्यमांनी तानाजी सावंत यांना खात्याचे प्रमुख म्हणून दुर्घटनेबाबत प्रश्न विचारले. तेव्हा खेकड्यांच्या पोखरण्यामुळे धरण फुटले असावे, असा अजब दावा सावंत यांनी केला. या दाव्यानंतर विरोधकांनी त्यांच्याविरोधात जोरदार निर्देशने केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सावंत यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन करत खेकड्यांनी भरलेला बॉक्स सोडला होता.

शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्याबरोबर वाद

सावंत यांच्या एका साखर कारखान्याने ऊसाची थकबाकी न भरल्यामुळे माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी त्यांच्यावर विखारी टीका केली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत, शिवसेनेने सावंत यांना धाराशिवमधील भूम परांडा मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल मोटे यांचा पराभव करून विजय मिळवला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सावंत यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं.

शिंदेंसाठी ठाकरेंना नडले

२०२२ मध्ये सावंत यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाणं पसंत केलं. शिवसेनेतील आमदार फोडण्यासाठी आम्ही बैठकांचा सपाटा लावला होता, असा दावाही तानाजी सावंत यांनी केला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये सावंत यांच्याकडे आरोग्य खात्याची जबाबदारी देण्यात आली. भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीने अजित पवार यांच्या पक्षाला सरकारमध्ये स्थान दिल्यानंतर तानाजी सावंत यांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली होती.

हेही वाचा : Story of Savarkar : सावरकरांच्या सागरीउडीने उडवली होती ब्रिटिशांची झोप; त्यावेळी नेमकं काय घडलं होतं?

राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर वाद

मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबरोबर बसावे लागत असल्याने आम्हाला मळमळ होते, असं विधानही सावंत यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले होते, काहींनी महायुतीतून बाहेर पडण्याचा इशाराही दिला होता. दरम्यान, गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने सावंत यांना परांडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांनी १५०० मताधिक्याने विजय मिळवला.

ओमराजे निंबाळकर यांना दिलं आव्हान

तानाजी सावंत यांच्याकडे सध्या मंत्रिपद नसले तरी, साखर कारखाने आणि शिक्षण साम्राज्याद्वारे त्यांचा बराच प्रभाव आहे. अनेकदा सावंत यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना आव्हान दिलं आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत, महायुतीच्या उमेदवार अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव झाला आणि निंबाळकर दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. यामुळे सावंत यांच्या राजकीय प्रतिमेला काहीसा धक्का बसला आहे.

तानाजी सावंतांच्या मुलासाठी यंत्रणा धावली

दरम्यान, तानाजी सावंत यांच्यामुळे पुण्याचे भाजपाचे खासदार आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनाही टीकेचा धनी व्हावे लागले आहे. कारण, सावंत यांचे पुत्र ऋषिराज यांना परत आणण्यासाठी मोहोळ यांनी सर्व यंत्रणा कामाला लावली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून त्याचे विमान हवेतूनच माघारी वळवले. जेव्हा विमानाची लँडिग झाली, तेव्हा ऋषिराज यांना वाटले की ते बँकॉकला पोहोचले आहेत. बाहेर घडत असलेल्या नाट्यमय घडामोडींची त्यांना तिळमात्रही माहिती नव्हती.

Story img Loader