Suresh Dhas Targeting Dhananjay Munde : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे घनिष्ठ संबंध आहेत, असा आरोप भाजपा आमदार सुरेश धस यांनी केला आहे. मुंबई तक या वृत्तवाहिनीला सुरेश धस यांनी नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी स्वत:ची तुलना ‘गजनी’ चित्रपटातील संजय सिंघानियाशी केली. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अभिनेता आमिर खानने संजय सिंघानियाची भूमिका साकारली होती.
काय म्हणाले आमदार सुरेश धस?
मुलाखतीत आमदार सुरेश धस म्हणाले की, “‘शॉर्ट-टर्म मेमरी लॉस’ या आजाराने ग्रस्त असूनही गजनी चित्रपटातील पात्राने (संजय सिंघानिया) न्याय मिळविण्यासाठी क्रूर हत्येला जबाबदार असलेल्या आरोपींच्या शोधासाठी एक मोहिम सुरू केली होती. सध्या माझाही तसाच दृष्टिकोन असून वास्तविक जीवनात मी स्वत:कडे संजय सिंघानिया म्हणून बघतो.”
बीड हत्याप्रकरणामुळे महायुती अडचणीत
बीड येथील हत्या प्रकरणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये राजकीय वादळ निर्माण झाले आहे. या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात भाजपा आमदार सुरेश धस आघाडीवर आहेत. नुकतीच महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी करण्यात आली. यामध्येही आमदार सुरेश धस आघाडीवर होते.
सुरेश धस यांच्याकडून राजीनाम्याची मागणी
भाजपा आमदाराकडूनच सरकारमधील मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याने महायुतीत मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. आमदार सुरेश धस सातत्याने मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य करत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपा नेतृत्वाने सुरेश धस यांना इतकी मोकळीस का दिली? असा प्रश्न अनेकजण उपस्थित करत आहेत. काहींच्या मते, बीडमधील मुंडे कुटुंबाचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजपाच्या एका गटाने आखलेला रणनीतीचा हा एक भाग आहे.
सुरेश धस यांची राजकीय कारकीर्द
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील जामगाव येथे एका छोट्याशा कुटुंबात सुरेश धस यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांच्या मनात राजकारणाची आवड निर्माण झाली. सुरुवातीच्या काळात सुरेश धस यांनी डाव्या विचारसरणीचे नेते साहेबराव दरेकर यांच्याबरोबर काम केलं. १९९५ मध्ये दरेकर अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. भाजपाचे दिवंगत नेते आणि धनंजय मुंडे यांचे काका गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात असलेल्या गटात सुरेश धस सहभागी होते.
१९९७ मध्ये सुरेश धस यांनी पक्षांतर करून गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर संपर्क वाढवला. १९९९ च्या निवडणुकीत ते आष्टी विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडून आले. २००४ मध्ये सुरेश धस यांनी पुन्हा विधानसभेची निवडणूक जिंकली आणि बीडच्या राजकारणात लोकप्रियता मिळवली. १९९९ मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्तास्थापन झाल्यानंतर भाजपाची स्थिती कमकुवत झाली होती. दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे यांचा देखील प्रभाव कमी झाला होता.
गोपीनाथ मुंडेंविरोधात लढवली होती निवडणूक
२००९ च्या विधानसभा निवडणुकीआधी आमदार सुरेश धस यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आष्टी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकल्यानंतर त्यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागली. याच काळात सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकमेकांच्या संपर्कात आले. २०१३ मध्ये धनंजय मुंडेही भाजपामधून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
२०१४ मध्ये सुरेश धस यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, अटीतटीच्या लढाईत त्यांचा पराभव झाला होता. विशेष बाब म्हणजे, या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात प्रचार केला होता. त्यांनी सुरेश धस यांना निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र, लोकसभेची जागा जिंकून बीडवर आपलेच प्रभुत्व असल्याचं गोपीनाथ मुंडे यांनी दाखवून दिलं.
धनंजय मुंडे यांच्याशी राजकीय दुरावा
सुरुवातीच्या काळात आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते. डिसेंबर २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय मुंडे यांची विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदी निवड केली. त्यामुळे बीडमधील अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. निवडणुकीतील पराभवानंतर सुरेश धस यांनी स्वत:ला राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर ठेवले आणि पुन्हा एकदा भाजपाबरोबर जवळीक वाढण्यास सुरुवात केली. त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाच्या विजयात सुरेश धस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे २०१७ मध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून काढून टाकण्यात आले.
हेही वाचा : आलिशान गाड्या आणि बंदुकी बाळगण्याचा छंद; गोळीनेच जीव गमावलेले आमदार गुरप्रीत सिंग गोगी कोण होते?
त्यावेळी सुरेश धस म्हणाले होते की, “धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये काम करताना मला गुदमरल्यासारखं वाटत होतं.” राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर सुरेश धस यांनी गोपीनाथ यांच्या कन्या आणि भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याशी जवळीक वाढवली. यामुळे धनंजय मुंडे यांच्याबरोबर त्यांचे राजकीय वैर निर्माण झाले. २०१८ मध्ये पुन्हा भाजपात सहभागी झाल्यानंतर सुरेश धस यांची विधान परिषदेवर निवड करण्यात आली. दरम्यान, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात समेट झाल्यानंतर सुरेश धस एकाकी पडले.
सुरेश धस एकाकी का पडले?
आपल्या राजकीय भविष्याबद्दल चिंतेत असलेल्या सुरेश धस यांनी बीडच्या राजकारणातून मुंडे कुटुंबाचे वर्चस्व कमी करण्याचा निर्धार केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपा उमेदवार पंकजा मुंडे यांना पाठिंबा देण्यास जाहीरपणे नकार दिला. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या निवडणुकीतील पराभवामागचे हे एक प्रमुख कारण होतं, असं राजकीय विश्लेषक सांगतात.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने आष्टी मतदारसंघातून सुरेश धस यांना उमेदवारी दिली. मुंडे कुटुंबियांनी त्यांचा पराभव करण्यासाठी अपक्ष उमेदवाराला बळ दिलं. मात्र, तरीही या निवडणुकीत सुरेश धस तब्बल ७७ हजार मताधिक्याने विजयी झाले. महाराष्ट्रात सलग दुसऱ्यांदा सत्तास्थापन झाल्यानंतर महायुतीने धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं. त्यामुळे बीडच्या राजकारणात पुन्हा एकदा बहीण-भावांचा प्रभाव दिसून आला.
धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे सुरेश धस यांना बीडमध्ये आपला प्रभाव दाखवण्याची संधी मिळाली. या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. राज्यसभेच्या हिवाळी अधिवेशनातही त्यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. तसेच धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही आमदार धस यांनी जोरकसपणे लावून धरली आहे.
मंत्री धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. वंजारी समाजाचे नेते असल्यामुळे धनंजय मुंडे हे जिल्ह्यामध्ये आपल्याच समाजातील अधिकाऱ्यांना प्राधान्य देत आहेत, असंही धस यांनी म्हटलं आहे. संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबरोबर मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध असून दोघांची आर्थिक भागीदारी असल्याचा आरोपही सुरेश धस यांनी केला आहे.
दरम्यान, माध्यमांबरोबर संवाद साधताना सुरेश धस म्हणाले की, “माझे आंदोलन राजकीयदृष्टा प्रेरित नसून न्यायासाठी आहे. याप्रकरणात मी त्यांच्याशी (धनंजय मुंडे) बोललो असतो, पण ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, ती मानवतेला कलंकित करणारी आहे. आमची लढाई देशमुख कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आहे. यात कुठलेही राजकारण नाही”, असंही आमदार सुरेश धस यांनी म्हटलं आहे.