Harshvardhan Sapkal Latest News : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला मोठं यश मिळालं. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. आता दोन महिन्यांनी काँग्रेस नेतृत्वाने महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यपद काढून घेण्यात आलं आहे. त्यांच्याजागी काँग्रेसची धुरा तळागाळातून आलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नाना पटोले हे २०२१ पासून काँग्रेसचे प्रदेशाध्यपदाची जबाबदारी सांभाळत होते.

कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ?

२८८ सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ १६ पर्यंत कमी झाले आहे, त्यामुळे काँग्रेस संघटनेचे नूतनीकरण करण्यापासून ते पक्ष कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि राज्य युनिटमधील अंतर्गत कलह रोखणे, अशी अनेक आव्हानं हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर असणार आहेत. सपकाळ हे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. काँग्रेसच्या वर्तुळात त्यांना संघटनात्मक कामात रस असलेले साधे नेते म्हणून ओळखलं जातं.

सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात

एकेकाळी राज्यस्तरीय कबड्डीपटू असलेले सपकाळ नंतर काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघात (NSUI) सामील झाले. बुलढाण्यात सरपंच म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९९९ मध्ये सपकाळ यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. या कालावधीत महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. २०१४ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर बुलढाणा विधानसभा मतदारसंघ निवडणूक जिंकली आणि विधानसभेत प्रवेश केला.

आणखी वाचा : Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचे विश्वासू ते शिवसेनेचे माजी मंत्री; कोण आहेत तानाजी सावंत

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव

२०१७ मध्ये अर्थसंकल्पाच्या प्रति जाळल्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय गायकवाड यांनी सपकाळ यांचा पराभव केला. मात्र, तरीही त्यांनी पक्षासाठी काम करणे सुरूच ठेवलं. सपकाळ यांनी गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांचेसुद्धा सहप्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकीत उमेदवार निवडीसाठी पक्षाने स्थापित केलेल्या कमिटीचेसुद्धा ते सदस्य राहिलेले आहेत.

पंचायत राज संघटनेचे अध्यक्ष

हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गाडगे महाराज, तुकडोजी महाराज व गांधीवादी विचारांचा प्रभाव आहे. ते सध्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी संबंधित राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे अध्यक्ष आहेत. आमदार म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव, राजीव गांधी पंचायत राज संगठनाची जबाबदारीही त्यांनी पेलली आहे. महाराष्ट्रात आगामी काळात काँग्रेसला बळकटी मिळावी यासाठी पक्षनेतृत्वाने वैचारिक दृष्टिकोनातून सपकाळ यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा दिल्याचं सांगितलं जातं.

काँग्रेसने सपकाळ यांचीच निवड का केली?

काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, “पक्षासाठी हा एक नवीन प्रयोग आहे. संघटनात्मक बदलांची आवश्यकता असल्याने सपकाळ यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. सध्या पक्षाचे बहुतेक राज्य आणि जिल्हास्तरीय युनिट निष्क्रिय झाले आहेत.” काँग्रेसच्या एका गटालाही असा विश्वास आहे की, सपकाळ यांचा मनमिळावू स्वभाव आणि काम करण्याच्या शैलीमुळे पक्षाच्या कमकुवत झालेल्या युनिटचे मनोबल वाढण्यास मदत होईल.

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या एका नेत्याने सांगितले की, “गांधीवादी विचारसरणीबद्दलची वचनबद्धता, संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करणे आणि व्यावसायिक हितसंबंध जोपासणे हे हर्षवर्धन सपकाळ यांची निवड करण्याचे मुख्य मुद्दे होते.” काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, राज्यातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यास नकार दिला होता.

कठीण काळात स्वीकारलं प्रदेशाध्यक्षपद

“महाराष्ट्रात पुढील पाच वर्षे महायुतीचे सरकार असेल यात काही शंका नाही. हा काळ विरोधी पक्षांसाठी आव्हानात्मक असणार आहे, त्यामुळे अनेक प्रभावशाली नेत्यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदाची जबाबदारी स्वीकारली नाही. मात्र, सपकाळ यांनी कठीण काळात पक्षाला साथ देऊन प्रदेशाध्यपद स्वीकारले आहे,” असे काँग्रेसमधील एका अंतर्गत सूत्राने सांगितले.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विजय वडेट्टीवार यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती केली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या महाविकास आघाडीला अभूतपूर्व यश मिळालं होतं. शिवसेना नेते उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणुकीत आक्रमक प्रचार केला होता.

हेही वाचा : Maharashtra Politics : मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे आणि शिवसेना नेत्यांची भेट का घेतली?

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठं अपयश

लोकसभा निवडणुकीत १३ जागा जिंकून काँग्रेस हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यातच एका अपक्ष खासदाराचा पक्षाला पाठिंबा मिळाल्याने राज्यातील काँग्रेस खासदारांची एकूण संख्या १४ झाली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही पक्षाला मोठं यश मिळणार, अशी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना आशा होती. मात्र, महायुतीने दमदार पुनरागमन करत २८८ पैकी तब्बल २३० जागा जिंकल्या; तर महाविकास आघाडीला केवळ ४६ जागांवरच समाधान मानावं लागलं. काँग्रेसला केवळ १६ जागांवर विजय मिळवता आहे.

प्रदेशाध्यपदाच्या शर्यतीत कोणकोणते नेते होते?

सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, विश्वजित कदम आणि अमित देशमुख या नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र, त्यांच्याऐवजी काँग्रेस हायकमांडने राज्यात नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. दिग्गजांना मागे टाकत प्रदेशाध्यक्षपद पटकवणारे हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसची धुरा सांभाळून पक्षाला पुन्हा यश मिळवून देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader