Maharashtra Political News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (१० फेब्रुवारी) सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे तीन नेते त्याचदिवशी सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळूनही महायुतीत धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे. पालकमंत्रिपदावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यात मतभेद होत असल्याचं सांगितलं जात आहे. महायुतीत सुरू असलेल्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दोन बैठका घेतल्या आहेत.
भाजपाचं मिशन मुंबई महापालिका
महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष म्हणून स्वतःला स्थापित करण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई महानगरपालिका भाजपासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीच्या संदर्भातही देवेंद्र फडणवीस यांच्या हालचालींकडे पाहिले जात आहे. गेल्या अनेक दशकांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, एकसंध शिवसेनेत फूट पडल्यानंतर यंदाच्या निवडणुकीत बीएमसीवरही आपल्याच पक्षाचा झेंडा फडकणार, अशी भाजपा नेत्यांना आशा आहे.
शिंदे गटाला भाजपाचा सूचक इशारा?
आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही स्वतंत्रपणे लढवणार आहोत, असं महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आधीच सूचित केलं आहे. दरम्यान, फडणवीस यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना मित्रपक्ष म्हणून मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढवण्याचा संदेश दिला आहे. शिवसेनेने नकार दिला, तर भाजपासमोर पर्याय उपलब्ध असल्याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
आणखी वाचा : Political News : ‘आप’च्या विजयी उमेदवारांचा मताधिक्यातील फरक भाजपापेक्षाही जास्त; तरीही पराभव का?
देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना का भेटले?
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं भाजपा नेत्याने सांगितले. विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाल्यानंतर मनसे प्रमुखांनी फडणवीसांचे फोनवरून अभिनंदन केले होते. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटीचे आश्वासन दिले होते, असंही भाजपा नेत्याने स्पष्ट केलं आहे. मात्र, असं असलं तरी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी एका जाहीर सभेत भाजपाच्या प्रचंड विजयाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. “विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर लोकांचा विश्वास बसला नाही. माझ्या ओळखीच्या एका आरएसएस नेत्यालाही यावर विश्वास नव्हता, त्यांनी ती गोष्ट माझ्याकडे बोलून दाखवली”, असं राज ठाकरे म्हणाले होते.
मुंबई महापालिकेसाठी भाजपा-मनसे युती होणार?
एकसंध शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी २००५ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे १३ आमदार निवडून आले. मात्र, त्यानंतर पक्षाला कोणत्याही निवडणुकीत फारसं यश मिळालं नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मनसेने आपले उमेदवार रिंगणात उतरवले. परंतु, पक्षाला एकाही जागेवर यश मिळालं नाही. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचादेखील माहीम विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला.
राज ठाकरे शिंदे गटावर नाराज?
गेल्या काही वर्षांपासून मनसेला निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळालं नसलं तरी राज ठाकरे यांची मुंबईत मोठी लोकप्रियता आहे, ज्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ते भाजपासाठी महत्त्वाचे नेते ठरू शकतात. काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना शिंदे गटाचे संबंधदेखील ताणले गेले आहेत. कारण विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी माहीममधून उमेदवारी अर्ज माघार घेण्यास नकार दिल्याने अमित ठाकरे यांचा पराभव झाला, असं मनसे नेत्यांना वाटत आहे.
माहीम मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत विजयी झाले होते. सूत्रांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात माहीम विधानसभा निवडणुकीवरही चर्चा झाली. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा आणि मनसेची युती झाल्यास अमित ठाकरे यांना राज्यपाल नामनियुक्त आमदार म्हणून विधानपरिषदेवर पाठवण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांना का भेटले?
दरम्यान, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर त्याचदिवशी सायंकाळी शिवसेना ठाकरे गटाचे तीन प्रमुख नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले होते. यामध्ये मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा समावेश होता. दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी ही भेट होती, असं शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं. दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत हे गेल्या काही दिवसांपासून उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांवर नाराज असल्याची चर्चा होती. त्यांचे एक पत्र सार्वजनिक झाल्यानंतर काही तासांतच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली, ज्यामध्ये त्यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सामंत यांच्या माहितीशिवाय निर्णय घेऊ नका, असे निर्देश देण्यात आले होते.
हेही वाचा : Delhi Election Results 2025 : भाजपाने ओबीसी आणि उच्चवर्णीयांच्या बळावर दिल्लीचं तख्त कसं काबीज केलं?
नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
राज्यात सलग दुसऱ्यांदा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हापासून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थदर्शन योजना सुरू केली होती, परंतु ती बंद पडल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली ‘आनंदाचा शिधा’ ही योजनाही बंद करण्याचा विचार सरकारी दरबारी सुरू आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी या मुद्द्यांवरून उघडपणे भाष्य केलेलं नाही. मात्र, गेल्या पंधरवड्यात त्यांनी दोनदा मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. सोमवारी झालेल्या अर्थसंकल्पपूर्व चर्चेतही माजी मुख्यमंत्री हजर नव्हते.
शिंदेंना राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीतून का वगळलं?
राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीमधूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आले होते, यामुळे शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. अखेर मंगळवारी शिंदे यांचा प्राधिकरणात समावेश करण्यात आला. राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) अध्यक्षपदी परिवहन विभागाच्या सचिवांची नियुक्ती करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्ष शिंदे गटावर कुरघोडी केल्याची चर्चा रंगली आहे. परंतु, परिवहन खात्याचा मंत्री मीच आहे, त्यामुळे माझा निर्णय हाच अंतिम असेल, असं परिवहनमंत्री आणि शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं.
महायुतीत बिनसलं आहे का?
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांबरोबर बैठक घेतल्याने महायुतीत काहीतरी बिनसलं आहे, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “फडणवीसांच्या बैठकींमुळे पक्षाला काहीही फरक पडत नाही. वैचारिकदृष्ट्या वेगवेगळ्या पक्षांचे नेते भेटले तर त्यात काय गैर आहे? ही महाराष्ट्राची परंपरा आहे”, असं सरनाईक यांनी म्हटलं आहे.