Ajit Pawar and Sharad Pawar Relation : अजित पवार यांनी जवळपास दोन वर्षांपूर्वी शरद पवार यांची साथ सोडत महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडून दोन गट निर्माण झाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरोधात आक्रमक प्रचार केला. बारामतीतून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करत सुप्रिया सुळे लोकसभेत निवडून आल्या. तर विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा पराभव केला. दरम्यान, निवडणुकांचा काळ संपल्यानंतर पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार, अशा चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगल्या आहेत.
हेही वाचा : अजित पवार निवडणूक निकालांसह शरद पवारांच्या छायेतून कसे बाहेर पडले?
“विठुराया, पवार कुटुंबातील वाद संपू दे…”
त्यामागचे कारण म्हणजे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांनी विठुरायाच्या चरणी केलेली प्रार्थना. आशाताई पवार बुधवारी (१ जानेवारी) पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांबरोबर संवाद साधला. आशाताई पवार म्हणाल्या की, “पवार कुटुंबांमध्ये जो काही वाद आहे, तो वाद संपू दे आणि पुन्हा सर्व पवार एकत्र येऊ दे, अशी प्रार्थना मी विठुरायाच्या चरणी केली आहे. अजित पवार यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात, असं साकडं देखील विठुरायाला घातलं आहे.”
एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार आणि त्यांचे काका शरद पवार यांच्यातील संबंध ताणले गेलेले आहेत. त्यामुळे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता कमी आहे, असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत. लोकसभा निवडणुकीत शरद पवार हे अजित पवार यांच्यावर वरचढ ठरले होते. मात्र, महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी जोरदार पुनरागमन केलं. शरद पवार यांच्या पक्षाने जेवढ्या जागा जिंकल्या, त्यापेक्षा दुप्पट जागांवर अजित पवारांनी विजय मिळवला.
शरद पवार अजित पवार पुन्हा एकत्र येणार?
निवडणुकांचा काळ संपल्यानंतर पवार कुटुंब पुन्हा एकत्र यावे अशी प्रार्थना आशाताई पवार यांनी केली. इतकंच नाही तर, शरद पवार आणि अजित पवार यांचे मनोमिलन व्हावे, अशी इच्छा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी बोलून दाखवली. एकेकाळी शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले अजित पवार यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की, “शरद पवार हे आमचे दैवत आहेत. आम्हाला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. पवार कुटुंबीय एकत्र आले तर आनंद होईल. मी स्वतःला पवार कुटुंबातील सदस्य समजतो.”
हेही वाचा : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
नरहरी झिरवाळ काय म्हणाले?
राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे आमदार आणि महायुती सरकारमधील मंत्री नरहरी झिरवाळ यांनी देखील अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे. “शरद पवार यांची साथ सोडताना मला विचित्र वाटले होते. अनेकांनाही तसंच वाटतं आहे. आता मी शरद पवारांना भेटून लोटांगण घालून त्यांच्या पाया पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रत्येकाला हेच वाटतं की, दोन्ही पवार हे एकत्र आले पाहिजेत. शरद पवार हे सर्वसामान्यांचे नेते आहेत. त्यामुळे ते नक्कीच याबाबत विचार करतील. जर माझी छाती फाडली तर शरद पवार दिसतील”, असंही झिरवाळ म्हणाले.
काही नेते अडथळे आणतील : अमोल मिटकरी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनीही प्रफुल पटेल आणि नरहरी झिरवाळ यांच्या विधानाचा पुनरुच्चार केला. मिटकरी म्हणाले की, “दोघांनी प्रयत्न केल्यास काका-पुतणे एकत्र येऊ शकतात. परंतु, जितेंद्र आव्हाड (शरद पवार यांचे प्रमुख सहकारी) आणि रोहित पवार (शरद पवार यांचे नातू) यांसारखे काही नेते यात अडथळे असू शकतात. दोघांनी एकत्र येणे त्यांना कधीच आवडणार नाही. मात्र आशा ताईंची प्रार्थना ही राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील प्रत्येक कार्यकर्त्याची प्रार्थना आहे. आपण सर्वांनी एकत्र यावे असे वाटते.”
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
दरम्यान, मिटकरी यांच्या विधानाबाबत माध्यमांनी जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. यावेळी आव्हाड म्हणाले की, “याबाबत कोणताही निर्णय घेणे आपल्या अधिकारक्षेत्रात येत नसून पवार कुटुंबियांना स्वत:हून निर्णय घ्यावा लागणार आहे. जर पवार कुटुंब एकत्र यावे अशी प्रार्थना आशाताई पवार करत असतील, तर याबाबत मी काय बोलू? हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. त्यांनीच याबाबत निर्णय घ्यायचा आहे. परंतु, मला काय वाटते की, याने काही फरक पडत नाही.”
पवार कुटुंब एकत्र येण्यावर भाजपाची प्रतिक्रिया काय?
दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार का? अशी चर्चा महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सुरू झाल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “जर दोन्ही पवार एकत्र येत असतील भाजपाला कोणतीही अडचण नाही. आमचा त्यावर कुठलाही आक्षेप नाही. शरद पवार आणि अजित पवार यांच्याबद्दलचा निर्णय त्या दोघांनीच घ्यायचा आहे.”, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा : डॉ. मनमोहन सिंग यांना भारतरत्न देण्यास काँग्रेसचा विरोध होता? भाजपाने काय आरोप केले?
लोकसभा निवडणुकीत शरद पवारांची सरशी
जून २०२३ मध्ये अजित पवार यांच्यासह ४० आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडून महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट तयार झाले आहेत. शरद पवार यांनी नव्याने पक्षाची मोर्चबांधणी करून लोकसभा निवडणुकीत १० पैकी ८ जागांवर विजय मिळवला. तर अजित पवार यांच्या पक्षाला ४ पैकी केवळ एकच जागा जिंकता आली. परंतु, नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी जोरदार पुनरागमन ४१ जागांवर विजय मिळवला.
विधानसभा निवडणुकीत अजित पवारांचे पुनरागमन
दुसरीकडे, शरद पवार यांच्या पक्षाला ८६ पैकी फक्त ९ जागांवरच विजय मिळवता आला. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांचा पक्ष सहाव्या क्रमांकावर राहिला. तर अजित पवार यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. विशेष बाब म्हणजे दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात ३६ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघासह एकूण २९ जागांवर विजय मिळवला. शरद पवार यांना केवळ ७ जागाच जिंकता आल्या.