विशाल पाटील लोकसभा निवडणुकीची तयारी गेली दोन वर्षे करीत होते. काँग्रेसची उमेदवारी मिळेल ही त्यांना अपेक्षा होती. पण महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना ठाकरे गटाने ही जागा स्वत:कडे घेतली. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी सागंली सोडू नका, असा दिल्लीतील नेत्यांकडे आग्रह धरला. पण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यापुढे दिल्लीतील काँग्रेस नेते नमले. शेवटी विशाल पाटील अपक्ष लढले आणि निवडून आले. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील घराण्याचा वारसा पुढे सुरू ठेवला. विशाल पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळू नये म्हणून जिल्ह्यातील एका बड्या नेत्याने पडद्याआडून प्रयत्न केले होते. पण शिवसेना आणि या नेत्याची खेळी त्यांच्यावरच उलटली.

विशाल प्रकाशबापू पाटील या वेळी प्रथमच लोकसभेत निवडून आले आहेत. स्वातंत्र्यसैनिक, पद्मभूषण वसंतदादा पाटील यांचे नातू म्हणून गेली काही वर्षे ते राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. आजोबा (स्व.) वसंतदादा पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविले, तसेच राजस्थानचे राज्यपाल, काँग्रेस समितीचे सरचिटणीस आदी पदे भूषवली. दादा राज्यस्तरावर कार्यरत असताना त्यांचे पुत्र प्रकाशबापू पाटील यांनी लोकसभेत प्रतिनिधित्व केले. त्याचबरोबर थोरले बंधू प्रतीक पाटील यांनीही लोकसभेत प्रतिनिधित्व करत असताना मनमोहनसिंग सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम केले. आता वसंतदादा घराण्यातील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी विशाल पाटील सांगलीमधून अपक्ष निवडून आले आहेत. मात्र, काँग्रेसच्या विचारावर भूमिका घेणार असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्वही स्वीकारले.

हेही वाचा…केरळमधील भाजपाचा ख्रिश्चन चेहरा मोदींच्या मंत्रिमंडळात; कोण आहेत जॉर्ज कुरियन?

वाणिज्य विभागातील मुंबई विद्यापीठाची पदवी मिळवणारे विशाल पाटील यांचे मराठीसह हिंदी, इंग्रजीवर प्रभुत्व आहे. आशिया खंडातील सर्वांत मोठा साखर कारखाना सांगलीत वसंतदादांनी उभारला. या कारखान्याचे अध्यक्षपद सध्या ते सांभाळत असले, तरी आर्थिक संकटात सापडलेला साखर कारखाना भाडेकरारावर चालविण्यास देऊन एक धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतला.