मुंबई : सर्वाधिक संख्याबळ असलेल्या विधिमंडळ पक्षाच्या नवनिर्वाचित नेत्याने सरकार स्थापण्याचा दावा केल्यावर राज्यपाल शपथविधीचे निमंत्रण देण्याची प्रथा असताना महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी परस्पर जाहीर केली. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महायुतीला निर्विवाद बहुमत मिळून आठवडा उलटला तरी सरकार स्थापण्याच्या हालचाली होत नसल्याने विरोधकांकडून टीका सुरू होताच शनिवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी परस्पर शपथविधीची तारीख ‘एक्स’ या समाजमाध्यमावरून जाहीर केली. ५ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता आझाद मैदानात शपथविधी पार पडेल, असे बावनकुळे यांनी जाहीर करून टाकले. वास्तविक शपथविधीची तारीख ही राजभवनकडून निश्चित केली जाते. पण सत्ताधारी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने परस्पर तारीख जाहीर करून औचित्याचा भंग केल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.

आदित्य ठाकरे यांची टीका

महायुती किंवा सर्वाधिक आमदार निवडून आले त्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची अद्याप निवड झालेली नाही. तसेच सरकार स्थापण्यासाठी अजून कोणीही दावा केलेला नाही. तरीही बावनकुळे यांनी परस्पर शपथविधीच्या तारखेची घोषणा करून औचित्याचा भंग केल्याचे सकृद्दर्शनी दिसते. बावनकुळे यांनी एकतर्फी शपथविधीची घोषणा केली, अशी टीका शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली.

हेही वाचा >>> Sharad Pawar : शरद पवार पक्षाला सावरू शकतील का? विधानसभेनंतर राष्ट्रवादीसमोर (शरद पवार) आव्हानांचा डोंगर

प्रथा काय?

● निवडणुकीत विजयी झालेल्या आमदारांची बैठक होऊन त्यात विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली जाते.

● बहुमत किंवा सर्वाधिक संख्याबळ प्राप्त करणाऱ्या विधिमंडळ पक्षाचा नेता राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा करतो. यासाठी आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र सादर केले जाते.

● एकापेक्षा अधिक पक्षांचे सरकार असल्यास तेवढ्या पक्षांकडून पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना दिले जाते. पूर्ण बहुमत किंवा पुरेसे संख्याबळ असल्याची खात्री झाल्यावर राज्यपाल त्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याला सरकार स्थापन करण्याचे लेखी निमंत्रण देतात. ● सत्ताधारी पक्ष आणि राजभवन या दोघांनाही सोयीची ठरणाऱ्या तारखेला शपथविधी समारंभ आयोजित केला जातो. राज्यपालांच्या पत्रात तारीख नमूद केली जाते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra s next chief minister oath taking ceremony set for december 5 says chandrashekhar bawankule print politics news zws