मुंबई : जागावाटपाच्या बैठकीनंतरही महाविकास आघाडीतील जागांवर अद्यापही एकमत झालेले नाही. राज्यात सहा ते सात जागांवर अद्याप आघाडीच्या घटक पक्षांतील उमेदवार समोरासमोर उभे ठाकले आहेत. या पार्श्वभूमीवर मैत्रीपूर्ण लढती टाळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जागावाटपात कोणताही वाद नसून दोन दिवसांत चर्चा करून विषय सोडवला जाईल, अशी माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार चार ठिकाणी समोरासमोर उभे ठाकले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार दोन ठिकाणी तर एका ठिकाणी शिवसेनेचा (ठाकरे) उमेदवार शेकापच्या उमेदवारासमोर उभा ठाकला आहे. या सर्व ठिकाणी शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार समोर आल्याने मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापैकी दिग्रस येथून काँग्रेससमोरील उमेदवार असलेले पवन जयस्वाल हे उमेदवारी अर्ज मागे घेतील, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. मात्र मिरजमध्ये काँग्रेसचे मोहन वनखंडे यांच्याविरोधात शिवसेनेचे (ठाकरे) तानाजी सातपुते समोर उभे ठाकले आहेत.
हेही वाचा : राजकारणातील बड्या चेहऱ्यांची यंदा वंचितकडे पाठ
महाविकास आघाडीत जागावाटपावरून कोणताही वाद राहिलेला नाही. ज्या मतदारसंघात मित्रपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत ते दोन दिवसांत चर्चा करून मागे घेतले जातील. समाजवादी पक्षाशीसुद्धा चर्चा सुरू असून त्यावरही लवकरच निर्णय होईल.
-रमेश चेन्निथला, काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी
मविआला निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यामुळे दोन-चार जागा मित्र पक्षाने जास्त लढल्या आणि जिंकल्या तर इतर घटक पक्षांना वाईट वाटण्याचे कारण नाही. ९० टक्के जागांवर तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची समजूत काढलेली आहे. उर्वरित जागांवर तिन्ही पक्ष एकत्र बसून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू.
संजय राऊत, शिवसेना (ठाकरे) नेते