मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी राज्यभरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. निवडणुकीदरम्यान १५९ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात अदखलपात्र गुन्ह्यांचाही समावेश असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. निवडणुकीशी संबंधित मुंबईत दोन, ठाण्यात चार गुन्हे, नवी मुंबईत तीन गुन्ह्यांचा समावेश आहे. परळी येथे ईव्हीएम मशीन मोडतोडीप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात ११ जणांना अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणुकीच्या काळात मुंबईत दोन गुन्हे व दोन अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी पहिला गुन्हा आग्रीपाडा पोलिसांनी दाखल केला होता. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाचे बनावट पत्र प्रसारित केल्याप्रकरणी शिंदे गटाच्या माजी शाखाप्रमुखाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याशिवाय मुंबईत मुंबादेवी व मलबार हिल येथील मतदारयादीसह गुजरातमधील दोन व्यक्ती सापडल्या. त्यांच्याविरोधात व्ही. पी. रोड पोलिसांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा :तीनच उमेदवार असलेल्या शहाद्यात वाढीव मतटक्क्यामुळे चुरस

आरोपी हरेशभाई गुकिया (५२) व मनसुख ठासीभाई मवानी (५०) हे दोघेही गुजरातमधील सुरत येथील रहिवासी असून त्यांच्याकडे मलबार हिल मतदारसंघाची व मुंबादेवी मतदारसंघातील मतदारांची यादी सापडली. दोघेही मुंबईतील मतदारसंघातील नसून विनाकारण मुंबईतील मतदारांची यादी त्यांच्याकडे सापडल्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी व्ही.पी. रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दोघांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. याशिवाय निवडणुकीच्या कालावधीत ठाण्यात चार गुन्हे व नऊ अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तसेच नवी मुंबईत तीन गुन्ह्यांची नोंद करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय नाशिक, पुणे, नागपूर, सोलापूर नगर, रायगड, चंद्रपूर, पालघर, हिंगोली येथे गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक गुन्हे नाशिक जिल्ह्यात दाखल झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा : मराठवाड्यात सिल्लोड मतदानात अग्रेसर, महिला मतदारांचे प्रमाणही ७९.४१ टक्के

बीडमध्ये मतदान यंत्र फोडण्याचा प्रयत्न

बीड जिल्ह्यातील घाटनांदूर येथे मतदान यंत्र फोडण्याचा प्रयत्न झाला. तसेच दोन गट एकमेकांसमोर आले. याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात ११ जणांना अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी जवळपास ४० जणांवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मतदान केंद्राची मोडतोड करण्यात आली असून कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. तसेच यानुसार चाळीस जणांविरोधात गंभीर आरोप करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 159 cases registered related to polls print politics news css