मुंबई : लोकसभेच्या तुलनेत राज्यात विधानसभा निवडणुकीत ६९ लाख मतदान जास्त झाले आहे. विधानसभेला ३ कोटी ३४ लाख पुरुष तर ३ कोटी ०६ लाख महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीत ६१.४४ टक्के मतदान झाले होते. विधानसभेला ६६.०५ टक्के मतदान झाले. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला जवळपास पाच टक्क्यांनी मतदानात वाढ झाली आहे.
लोकसभेला राज्यात ५ कोटी ७१ लाख मतदारांनी मतदान केले होते. विधानसभेला ६ कोटी ४० लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. राज्यात कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघात सर्वाधिक ८४.९६ टक्के मतदान झाले. तर सर्वांत कमी मतदान मुंबईतील कुलाबा मतदारसंघात (४४.४४ टक्के) झाले. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या शहरांमधील मतदारसंघात ६० टक्क्यांच्या आसपासच मतदान झाले आहे. याउलट ग्रामीण भागातील मतदारांमध्ये मतदानाचा अधिक उत्साह दिसला.
हेही वाचा :जरांगे प्रभाव की ‘लाडकी बहीण’? मराठवाड्यात निकालाची उत्सुकता
लोकसभा निवडणुकीत ३ कोटी ०६ लाख पुरुष तर २ कोटी ६४ लाख महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. दरम्यान, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेमुळे महिला मतदारांच्या मतदानाचा टक्का वाढला, असा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जात आहे.