वरळी

मुंबई : विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीत वरळी विधानसभा मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळे शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी सहज विजय मिळविला होता. यंदा ठाकरे यांची राजकीय कोंडी करण्याची खेळी झाली आहे. ठाकरे सहजपणे विरोधकांवर मात करतात का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आदित्य ठाकरे, शिवसेनेचे (शिंदे) मिलिंद देवरा, मनसेचे संदीप देशपांडे हे तीन प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. ठाकरे यांना मतदारसंघात अडकवून ठेवण्याची भाजप आण शिंदे गटाची खेळी होती. पण शिवसेना (शिंदे) आणि मनसेचे उमेदवार परस्परांच्या विरोधात समोर असल्याने आदित्य ठाकरे यांचा मार्ग अधिक सोपा झाला. लोकसभा निवडणुकीत वरळीत शिवसेनेच्या ठाकरे गटाला सहा हजार मतांची आघाडी मिळाली होती. तेव्हा शिवसेना (शिंदे), भाजप आणि मनसे एकत्र होते. यंदा मनसे व शिवसेना (शिंदे) स्वतंत्रपणे लढत आहेत. त्यामुळे होणारे मतांचे विभाजन व स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये असलेला संभ्रम या बाबी आदित्य ठाकरे यांच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत.

वरळी परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मुंबई महानरपालिका निवडणुकीत वरळी विभागातील सर्व प्रभागांमधून शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते. तसेच पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेतृत्त्व अशी ओळख असलेले सचिन अहिर हेही शिवसेनेत दाखल झाल्यामुळे वरळी शिवसेनेचा अभेद्या गड बनला.

हेही वाचा >>> मतदारांशी प्रेमाने संवाद साधा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील बूथप्रमुखांना अनेक सूचना

वरळी विभागात शिवसेनेची (उद्धव ठाकरे) स्थानिक नेत्यांची व कार्यकर्त्यांची फळी, ठाकरे घराण्याचा ब्रँड, स्थानिक पातळीवरील सक्रिय शिवसेना शाखा या सर्व बाबी आदित्य ठाकरे यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासह विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे व सचिन अहिर हेही वरळीतील स्थानिक आहेत. सुनील शिंदे व सचिन अहिर यांची स्वत:ची हक्काची मतपेढी आहे. याशिवाय स्थानिक पातळीवरही शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) अनेक मातब्बर नेते आहेत. मनसेने संदीप देशपांडे यांना उमेदवारी देऊन आदित्य ठाकरे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.

निर्णायक मुद्दे

● वरळी कोळीवाडा, बीबीडी चाळींचा विकास

● सागरी किनारा मार्ग प्रकल्पावरून स्थानिक मच्छीमारांचे प्रश्न

● प्रेमनगर, जीजामाता नगर येथील झोपडपट्टी पुनर्विकास

● मराठी मतदारांचे विभाजन

लोकसभेतील राजकीय चित्र

● महायुती – ५८,४२९ 

● महाविकास आघाडी – ६४,८३२

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 aditya thackeray milind deora sandeep deshpande worli assembly constituency print politics news zws70