यवतमाळ – यवतमाळसह वणी, उमरखेड, पुसद, आर्णी या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी बंड केले. पक्षातील पदाधिकाऱ्यांनीच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरांना थोपविण्यासाठी भेटीगाठी, चर्चा आणि भविष्यातील पदांचे आमीष दाखविणे सुरू आहे.

महायुतीत उमरखेडमध्ये बंडखोरी झाली. येथे भाजपने किसन वानखेडे यांना भाजपचे माजी आमदार राजेंद्र नजरधने यांनी मनसेकडून उमेदवारी अर्ज दाखल करून आव्हान दिले. भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी प्रयत्न करून २०१४ राजेंद्र नजरधने यांना उमेदवारी मिळवून दिली होती. नजरधने आमदार झाल्यानंतर काही वर्षांत भूतडांसोबत वितुष्ट निर्माण झाल्याने २०१९ मध्ये नजरधने यांना उमेदवारी मिळाली नव्हती. आताही नजरधने यांच्या उमेदवारीसाठी भूतडा यांचा विरोध असल्याची चर्चा होती. त्यामुळे भाजपने येथे नवखे असलेले किसन वानखेडे यांना उमेदवारी दिली.  मनसे आणि भाजपची जवळीक असताना मनसेने राजेंद्र नजरधने यांना उमेदवारी दिल्याने भाजपच्या गोटात नाराजी आहे. नागपूरहून नजरधने यांची समजूत घातली जात आहे. मात्र नजरधने अर्ज मागे घेणार नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे भाजपसाठी येथील लढत प्रतिष्ठेची झाली आहे.

उमरखेडमध्ये महाविकास आघाडीत काँग्रेसचे माजी आमदार वियज खडसे यांनीच दंड थोपटल्याने चिंता वाढली आहे. साहेबराव कांबळे यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांना खुश करून तिकीट आणल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. काँग्रेसमध्ये येथे दोन गट आहेत. मतदारसंघात प्रभावी असलेले मराठा, कुणबी समाजाचे देवसरकर, देशमुख आदी नेते साहेबराव कांबळे यांच्याबाजूने असल्याने खडसे यांचा संघर्ष वाढला आहे. विजय खडसे यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी प्रयत्न सुरू असले तरी त्यात यश येण्याची शक्यता नसल्याची चर्चा आहे.

हेही वाचा >>> बंडखोरांची मनधरणी! अपक्ष कुणाला घाम फोडणार?

वणी विधानसभेत महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठाचे संजय देरकर यांच्या विरोधात काँग्रेसचे संजय खाडे अपक्ष लढणार आहेत. संजय खाडे यांना मुंबई, दिल्लीतून काँग्रेसची उमेदवारी मिळेल, असा शब्द देवूनही वरिष्ठांनी ही जागा शिवसेना उबाठाला सोडल्याचा राग काँग्रेसच्या मनात आहे. शिवाय शिवसेना उबाठातही येथे दोन गट आहेत. संजय खाडे यांनी उमेदवारी दाखल केल्याने काँग्रेस आणि शिवसेना उबाठाच्याही एका गोटात आनंद व्यक्त होत आहे. वणीतील जातीय समीकरणेही महत्वाची ठरणार आहेत. दोन्ही संजय निवडणूक रिंगणात कायम राहिल्यास कुणबी समाजाच्या मतांचे होणारे विभाजन भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे संजय खाडे यांनी उमेदवारी मागे घ्यावी, त्यांचे योग्य पुनर्वसन केले जाईल, असा शब्द देण्यात आल्याची माहिती आहे.

हेही वाचा >>> काँग्रेसकडून सामान्य कार्यकर्त्याला न्याय, भाजपकडून अन्याय; चंद्रपुरात चर्चा

यवतमाळ येथेही महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे संदीप बाजोरीया यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत काँग्रेस उमेदवार बाळासाहेब मांगुळकर यांच्याविरूद्ध दंड थोपटले आहे. काँग्रेसने षडयंत्र रचून आपली उमेदवारी कापल्याने आता माघार घेणार नसल्याची भूमिका बाजोरीया यांनी घेतली. काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याचे म्हणणे मानण्यास बाजोरीया तयार नसल्याने आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या भूमिकेकडे महाविकास आघाडीचे लक्ष लागले आहे. पुसदमध्ये महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे इंद्रनील नाईक यांच्यासमोर त्यांचे सख्खे भाऊ ययाती नाईक यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून आव्हान निर्माण केले. मात्र हा कौटुंबिक विषय असून वडील मनोहरराव नाईक हे ययाती नाईक यांची समजूत काढत आहेत.  त्यामुळे ययाती नाईक पुसदमधील उमेदवारी मागे घेवून कारंजामधील उमेदवारी कायम ठेवतील, अशी चर्चा महायुतीत आहे.

चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीतील बंडखोरांशी चर्चा सुरू आहे. या उमेदवारांनी अर्ज मागे घेवून पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारात सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उमरखेड, वणी येथील नाराजांशी बोलणे सुरू आहे. यवतमाळमध्ये संदीप बाजोरीया यांच्याशी आपण स्वत: बोललो. राष्टवादीचे नेतेही त्यांच्याशी बोलून तोडगा काढतील. काँग्रेसमध्ये अर्ज मागे घेतले नाही तर पक्षाच्या नियमांप्रमाणे कारवाई होईल, पण अशी वेळ येणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर यांनी दिली.