अमरावती : अमरावती जिल्हा सुरूवातीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला होता. विधानसभा असो की लोकसभा, प्रत्येक निवडणुकीत विदर्भाच्या जनतेने काँग्रेसला साथ दिली. पण या काँग्रेसच्या गडात भाजप-शिवसेना युतीने ९० च्या दशकात शिरकाव करायला सुरुवात केली. मध्यंतरीच्या काळात भाजप-सेनेला यश मिळाले, पण गेल्या निवडणुकीत भाजपला केवळ एकच जागा मिळू शकली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसचे बळवंत वानखडे निवडून आले. त्यांच्या विजयात ‘डीएमके’ (दलित, मुस्लीम आणि कुणबी मराठा) हा घटक निर्णायक ठरला. विधानसभा निवडणुकीतही हे समाजघटक जय-पराजयाचे गणित ठरविण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदासंघांपैकी दोन राखीव मतदारसंघ वगळता इतर ठिकाणी प्रमुख लढत ही कुणबी-मराठा समुदायातील उमेदवारांमध्येच आहे. दलित आणि मुस्लीम समाजातील मतदार कुणाच्या पारड्यात मते टाकतात, यावर निकाल ठरणार आहे.
हेही वाचा : पंतप्रधानांचे राजकारण विकासाभिमुख; भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे प्रतिपादन
अमरावती जिल्ह्यातील जातीय समीकरणे आणि बहुजनवादी राजकारण निकालावर परिणाम करणारे ठरत आले आहे. जिल्ह्यातील राजकारणाची दिशा दलित आणि कुणबी मतदार ठरवतात. लोकसभा निवडणुकीत दलित, मुस्लीम आणि कुणबी (डीएमक) फॅक्टर चालला. दलित आणि मुस्लीम ही काँग्रेसची मतपेढी समजली जाते. त्यावेळी संविधान बचावाचे वारे होते. ते काँग्रेसने मतदारांपर्यंत पोहोचवले होते, त्यामुळे या मतांचा भाजपला फटका बसला होता. दुसरीकडे, भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी स्वीकारलेल्या कडव्या हिंदुत्वाच्या भूमिकेविषयी नकारात्मक प्रतिक्रिया उमटली होती. दुसरीकडे, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत. गेल्या दशकभरात शेतमालाला भाव मिळत नसल्याची ओरड आहे. शेतकऱ्यांची सरकारवर नाराजी होती. त्याचाही फटका भाजपला बसला.
शेतमालाला हमीभावापेक्षा कमी भाव हा मुद्दा अजूनही जिवंत आहे. दुसरीकडे, भाजपने ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा देत पुन्हा हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाचा डाव खेळला आहे. त्यामुळे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची कोंडी झाली आहे. महायुतीतील बंडखोरी आणि ‘डीएमके’ हा घटक निवडणुकीवर काय परिणाम करू शकतो, याचे आडाखे बांधले जात आहेत.
हेही वाचा : हिंगणघाटमध्ये बंडखोर उमेदवार निर्णायक ठरणार ?
मेळघाट वगळता जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांमध्ये ‘डीएमके’ घटक प्रभावी ठरू शकतो. बडनेरात युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा यांच्यासमोर कुणबी समुदायाची एकजूट रोखण्याचे आव्हान आहे. दलित आणि मुस्लीम मतदान निर्णायक ठरू शकते. दर्यापुरात बहुसंख्य कुणबी मतदारांचा कल निकाल ठरवू शकतो. तिवसा, धामणगाव, अचलपूरमध्ये ‘डीएमके’ घटक महायुतीच्या अडचणी वाढवू शकतो. अमरावतीत तिरंगी लढतीत मुस्लीम मतदारांकडे लक्ष राहणार आहे. मोर्शीत चौरंगी लढतीत कुणबी आणि माळी मतदारांचा कल महत्वाचा ठरणार आहे. याशिवाय कुणबी-मराठा समाजातील उपजातींचा प्रभाव देखील काही मतदारसंघांमध्ये बेरीज, वजाबाकी करणारा ठरू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.