चंद्रपूर : बल्लारपूर मतदारसंघात डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या बंडखोरीने काँग्रेस उमेदवार संतोष सिंह रावत अडचणीत आले आहेत. येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, रावत व डॉ. गावतुरे, अशी तिरंगी लढत आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेले रावत हे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गटाचे असल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा डॉ. गावतुरे यांच्या बंडखोरीला आशीर्वाद असल्याची चर्चा काँग्रेस वर्तुळात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसमध्ये प्रदेश व स्थानिक पातळीवर विविध गट सक्रिय आहेत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली तर आपणच मुख्यमंत्री होणार, अशी स्पर्धा काँग्रेसमध्ये आतापासूनच सुरू झाली आहे. मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न उराशी बाळगून विरोधी पक्षनेते वडेट्टीवार व प्रदेशाध्यक्ष पटोले सक्रिय झाले आहेत. त्याच सक्रियतेतून वडेट्टीवार यांनी बल्लारपूर मतदारसंघात कट्टर समर्थक संतोष सिंह रावत यांना काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली. प्रत्यक्षात बल्लारपूरमधून भूमिपुत्र ब्रिगेडच्या डॉ. गावतुरे या उमेदवारीच्या स्पर्धेत आघाडीवर होत्या. प्रदेशाध्यक्ष पटोले यांचा आशीर्वाददेखील त्यांना होता व आहे. यातूनच डॉ. गावतुरे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. तेव्हापासून डॉ. गावतुरे यांना बल्लारपूरमधून उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, येथे वडेट्टीवार समर्थक रावत हे बऱ्याच दिवसापासून सक्रिय होते.

हेही वाचा – पलूसमध्ये विश्वजित कदम, संग्रामसिंह देशमुखांमध्ये चुरशीची लढत

२५ वर्षांपासून स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या रावत यांच्यासाठी वडेट्टीवार यांनी दिल्लीत आग्रह धरला. सहा महिन्यांपूर्वी पक्षात प्रवेश करणाऱ्या डॉ. गावतुरे यांच्याऐवजी वर्षानुवर्षे सक्रिय असलेले रावत सर्वदृष्टीने योग्य उमेदवार आहेत, तसेच वनमंत्री मुनगंटीवार यांना तेच लढत देऊ शकतात, ही बाब वडेट्टीवार यांनी काँग्रेस नेत्यांना पटवून दिली. मात्र, पटोले काही केल्या डॉ. गावतुरे यांच्या नावाचा आग्रह सोडायला तयार नव्हते. यामुळे बल्लारपूर मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा काँग्रेसने प्रलंबित ठेवली व उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या दोन दिवसांआधी रावत यांचे नाव जाहीर केले. वडेट्टीवार यांच्या आग्रहामुळेच रावत यांना उमेदवारी मिळाली. त्यांची निवडून येण्याची शक्यता आहे, ही बाब प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या लक्षात आली. त्याचवेळी डॉ. गावतुरे यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला व उमेदवारी दाखल केली.

विशेष म्हणजे, डॉ. गावतुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माघारीसाठी पाच दिवसांचा अवधी होता. मात्र, या पाच दिवसांत पटोले अथवा काँग्रेसच्या कोणत्याही बड्या नेत्याने, पदाधिकाऱ्याने त्यांच्याशी संपर्क साधून माघार घेण्याबाबत मनधरणी केली नाही. एकीकडे, याच मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोन येताच उमेदवारी अर्ज मागे घेतला व महाविकास आघाडीत बंडखोरी होऊ दिली नाही. दुसरीकडे मात्र, डॉ. गावतुरे काँग्रेस नेत्यांच्या फोनची शेवटपर्यंत प्रतीक्षाच करत राहिल्या. पटोले यांनी फोन करण्याचे टाळल्यामुळेच डॉ. गावतुरे यांनी बंड पुकारले. या बंडाला पटोलेच कारणीभूत आहेत. त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही, अशी चर्चा आता काँग्रेस वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.

हेही वाचा – महायुतीच्या प्रचारात गुजरातमधील निरीक्षकांची देखरेख

तिरंगी लढत भाजपसाठी लाभदायी!

डॉ. गावतुरे यांच्या बंडखोरीने येथे तिरंगी लढत होणार आहे. बल्लारपूर मतदारसंघाचा आजवरचा इतिहास पाहता येथे झालेल्या तिरंगी लढती भाजपसाठी फायद्याच्या आणि काँग्रेससाठी अडचणीच्या ठरल्या आहेत. यामुळे काँग्रेस आणि रावत यांच्या डोकेदुखीत चांगलीच भर पडली आहे. काँग्रेसच्या मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा भाजप उमेदवार मुनगंटीवार यांना होण्याची दाट शक्यता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 ballarpur assembly constituency triangular fight sudhir mungantiwar vs santosh singh ravat vs rebel abhilasha gavture print politics news ssb