बुलढाणा : मागासवर्गीयांसाठी राखीव असलेला मेहकर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला. १९९५ पासून २०१९ पर्यंत या मतदारसंघात शिवसेनेचाच भगवा फडकला. आता शिवसेनेची दोन शकले झाल्याने गेल्या साडेतीन दशकात प्रथमच शिवसेना विरुद्ध शिवसेना अर्थात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट, अशी लढत रंगली आहे.
विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी १९९५ ते २००४ दरम्यान आमदारकीची हॅट्ट्रिक केली. मतदारसंघ राखीव झाल्यावर संजय रायमूलकर यांची २००९ ते २०१९ अशी विजयाची हॅट्ट्रिक झाली. पहिल्या लढतीत ९१ हजार, दुसऱ्या लढतीत ८० हजारावर मते त्यांनी घेतली. तिसऱ्या (२०१९ च्या) लढतीत १ लाखावर मते आणि तब्बल ६५ हजारांनी विजय, असा त्यांचा ‘ट्रॅक रेकॉर्ड’ आहे. विदर्भातील विजयी उमेदवारांमध्ये आघाडीवर राहण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.
आघाडीची मोर्चेबांधणी अन् मतविभाजन
शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ म्हणून ठाकरे गटाने महाविकास आघाडीत ही जागा आपल्या पदरात पाडून घेतली. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे जिल्ह्यात अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या ठाकरे गटाने स्वेच्छानिवृत्त अधिकारी सिद्धार्थ खरात यांना मैदानात उतरविले. यामुळे दोन वर्षांपासून तयारीत असलेले काँग्रेसचे लक्ष्मण घुमरे आणि ठाकरे गटाचे गोपाल बछिरे यांनी बंडाचे निशाण फडकविले. त्यांनी माघार घेतली असली तरी काँग्रेस आणि ठाकरे गटातील सहा इच्छुकांची नाराजी कायमच आहे. याशिवाय धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन करण्यासाठी वंचित, नवीन पक्ष आणि अपक्ष उमेदवार तत्पर आहेतच. अशाही स्थितीत खरात यांनी बऱ्यापैकी वातावरण निर्मिती करून प्रचारातून परिवर्तनाचा नारा दिला आहे. मतदारसंघात राष्ट्रवादी नगण्य असल्याने ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि काँग्रेसच्या बळावर त्यांचा प्रचार सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांनी त्यांच्यासाठी सभा घेतल्या. प्रचाराच्या मध्यावर शिंदे गटासमोर बऱ्यापैकी आव्हान उभे करण्यात ते यशस्वी झाले.
हे ही वाचा… लक्षवेधी लढत : मुश्रीफ- घाटगेंमध्ये पुन्हा लढत फक्त पक्ष बदलून
मुख्यमंत्र्यांच्या प्रचारात ठाकरेच लक्ष्य
महायुतीत ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटली आणि शिंदेंनी रायमूलकर यांच्यावरच विश्वास टाकला. मुख्यमंत्री शिंदे यांची नुकतीच मेहकरात सभा पार पडली. त्यांनी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य केले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि काँग्रेसबद्दल शब्दही काढला नाही. उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत घरोबा करून बाळासाहेबांचे विचार आणि राज्यातील १२ कोटी जनतेशी विश्वासघात केला. घुसमट वाढली आणि आम्ही उठाव केला, असा पुनरुच्चार शिंदे यांनी सभेत केला. ठाकरे गटाचे मतदान विचलित करणे आणि हिंदुत्ववादी मतांचे ध्रुवीकरण करणे, हा त्यांचा उद्देश होता. येथे भाजप आणि अजितदादा गट नगण्य असल्याने शिंदे गटाचा फौजफाटा रायमूलकर यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहे. विकासकामे, लोकसंपर्क, सुनियोजित प्रचार आणि हिंदू-दलित मतांचे पाठबळ, यांमुळे निर्माण झालेल्या भगव्या वादळावर स्वार होऊन विजयी चौकार लगावण्याचा रायमूलकर यांचा निर्धार आहे.
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे-ठाकरे गटांत रंगणाऱ्या या सामन्यात रायमूलकर विजयी चौकार लगावतात, की सिद्धार्थ खरात त्यांना रोखण्यात यशस्वी होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.