बुलढाणा : उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत, सोमवारी जिल्ह्यातील सात मतदारसंघातील प्रमुख आणि विविध पक्षीय बंडखोर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामुळे रिंगणातील अधिकृत उमेदवारांनी सुटकेचा श्वास घेतला. जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत थेट, तर दोन जागी ‘बहुरंगी’ लढत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
मागील अनेक दिवसांपासून बुलढाणा जिल्हाच नव्हे राज्यात गाजत असलेल्या सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी घडल्या. इथे महायुतीत आता मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे निश्चित झाले असून ही जिल्ह्यातील पहिली मैत्रीपूर्ण लढत ठरली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून डॉ. शशिकांत खेडेकर व अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मनोज कायंदे रिंगणात आहेत. महाविकास आघाडीकडून डॉ. राजेंद्र शिंगणे रिंगणात आहेत. यामुळे आता मातृतीर्थात तिरंगी रणसंग्राम अटळ आहे.
हेही वाचा : बेलापूरमध्ये अन्य पक्षातील नेत्यांना गळाला लावण्यावर भाजपचा भर
माघारी नाट्यानंतर सात मतदारसंघातील लढतीचे प्राथमिक चित्र स्पष्ट झाले आहे. सातही ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, अशी मुख्य लढत असली तरी दोन ठिकाणी बहुरंगी लढतीची चिन्हे आहेत .पाच मतदारसंघात मात्र दुरंगी लढत रंगणार आहे.
दोन जागांवर शिवसेना विरुद्ध असा सामना रंगणार आहे. बुलढाणा मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड विरुद्ध ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांच्यात काट्याची लढत होणार आहे. मेहकरमध्ये शिंदे गटाचे आमदार संजय रायमूलकर विरुद्ध ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात अशी लढत रंगणार आहे. चार मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी मुख्य लढत होणार आहे. मलकापूरमध्ये भाजपचे दिग्गज नेते माजी आमदार विरुद्ध काँग्रेसचे आमदार राजेश एकडे, खामगावमध्ये भाजप आमदार आकाश फुंडकर विरुद्ध माजी आमदार दिलीप सानंदा (काँग्रेस) , चिखलीमध्ये भाजपच्या आमदार श्वेता महाले विरुद्ध काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोन्द्रे, अशी लढत होऊ घातली आहे.
जळगावमध्ये बहुरंगी लढतीची प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपचे आमदार संजय कुटे विरुद्ध काँग्रेसच्या स्वाती वाकेकर अशी मुख्य लढत असली तरी वंचितचे डॉ. प्रवीण पाटील आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रशांत डीक्कर यांच्यामुळे लढत रंगतदार झाली असून बहुरंगी वळणावर आहे.
हेही वाचा : मंदा म्हात्रे यांच्या सोयीसाठी ऐरोलीचे बंड ?
‘राजेंद्र शिंगणें’च्या माघारीने खळबळ!
सिंदखेड राजातून राजेंद्र शिंगणे यांनी माघार घेतल्याच्या वृत्ताने काही काळ खळबळ उडाली. हे असे झालेच कसे ? असा गंभीर प्रश्न अनेकांना पडला. मात्र हे राजेंद्र मधुकर शिंगणे असल्याचा उलगडा झाल्यावर आणि आमदार राजेंद्र भास्करराव शिंगणे कायम असल्याचे माहीत झाल्यावर वातावरण शांत झाले.
‘मनसे’ ची माघार!
मनसेचे जळगाव जामोद मतदारसंघातील उमेदवार अमित देशमुख यांनी धक्कादायकरित्या माघार घेतली. खामगावमधूनही मनसेचे अधिकृत उमेदवार शिवशंकर लगर यांनी अर्ज मागे घेतला आहे. या दोघांना माघार घ्यायचे ‘वरून’ आदेश आल्याने त्यांनी अर्ज मागे घेतल्याचे समजते. मात्र याची पुष्टी होऊ शकली नाही.