गडचिरोली : विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आल्याने जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत राजकीय वातावरण तापले आहे. गडचिरोली विधानसभेत काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी नव्या उमेदवारांना मैदानात उतरवल्याने यंदा निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. याठिकाणी भाजपकडून डॉ. मिलिंद नरोटे तर काँग्रेसकडून मनोहर पोरेटी आमनेसामने आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यामुळे सावध झालेल्या भाजपने गडचिरोलीत विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांना उमेदवारी नाकारली आणि त्यांच्याऐवजी डॉ. मिलिंद नरोटे या तरुण उमेदवाराला संधी दिली. काँग्रेसने इच्छुक तरुण उमेदवार विश्वजित कोवासे आणि सोनल कोवे यांना डावलून पक्षाचे जुने नेते मनोहर पोरेटी यांच्यावर विश्वास दाखविला. त्यामुळे तब्बल दोन दशकानंतर गडचिरोली विधानसभेत दोन नवे चेहरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याठिकाणी लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगलाच फटका बसला होता.

आणखी वाचा-शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे-ठाकरे गटांत सामना, संजय रायमूलकर यांची घोडदौड सिद्धार्थ खरात रोखणार?

तसेच विद्यमान आमदाराविरोधात असलेल्या रोषामुळे पक्षाने नवा उमेदवार दिला. जिल्ह्यात भाजपचा तरुण चेहरा असलेले नरोटे यांनी गेल्या काही वर्षांपासून सामाजिक उपराक्रमाच्या माध्यमातून जनसामान्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच पक्षाने अनेकांना डावलून नरोटे यांना संधी दिली. त्यांच्यासाठी भाजपनेते आणि संघपरिवार मैदानात उतरले आहे. त्याच्यापुढे शहरासह धानोरा आणि चामोर्शी भागातील ग्रामीण पट्ट्यात आव्हान राहणार आहे. दुसरीकडे, काँग्रेसच्या पोरेटीसाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार शड्डू ठोकून आहेत. पोरेटी यांचे वडील काँग्रेसचे जुने नेते होते. धानोरा भागात त्यांचे वर्चस्व आहे. शहरी भागातील मते वळवण्याचे त्यांच्यापुढे आव्हान आहे. एकंदरीत चित्र बघता ही लढत तुल्यबळ असल्याने कुणाचे पारडे जड आहे, याचा अंदाज लावणे जाणकारांना कठीण जात आहे.

आणखी वाचा-BJP : ‘लव्ह जिहाद’ ते ‘व्होट जिहाद’, ‘रझाकार’ ते ‘हिंदुत्व’ भाजपाने विधानसभा निवडणुकीत कुठले मुद्दे आणले?

मतविभाजनाचा फटका कुणाला बसणार?

गडचिरोलीत काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार डॉ. कोवे संपूर्ण ताकदीने अपक्ष म्हणून मैदानात उतरल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी विधानसभा क्षेत्र पिंजून काढले होते. परंतु पक्षाकडून संधी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली. महाविकास आघाडीत मित्र पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षानेही जयश्री वेळदा यांना संधी दिली आहे. त्यांच्या समर्थनार्थ काही आंबेडकरी संघटना देखील मैदानात उतरल्या आहे. या दोन महिला उमेदवारांमुळे मत विभाजन होऊ शकते, त्यामुळे याच फटका कुणाला बसणार, हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 candidate change in gadchiroli assembly constituency tough fight between bjp milind narote vs congress manohar poreti print politics news mrj