चंद्रपूर : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांत विविध पक्षांत प्रवेश, समर्थन, मांसाहारी आणि शाकाहारी जेवणावळी तथा दिवाळी फराळ, चहा, नास्त्यांच्या कार्यक्रमांना जोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, वरोरा, चिमूर व ब्रम्हपुरी या सहाही मतदारसंघांत भाजप व काँग्रेस या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत होत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये प्रवेश वाढले आहेत. चिमूर येथे भाजप उमेदवार बंटी भांगडिया यांना समर्थन देत माजी मंत्री डॉ. रमेश गजबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर ब्रम्हपुरीत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष तथा भाजप नेते यशवंत दिघोरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वंचितचे सावली शहराध्यक्ष रोशन बोरकर, नितीन दुधे व भाजपचे संतोष कोटरंगे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. रणमोचन, बरड किन्ही येथील असंख्य भाजप कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल झालेत.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भाजपमधील प्रवेशाला वेग आला आहे. मूल तालुक्यातील राजगडचे सरपंच व सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. बल्लारपूर येथील वंचितचे उपाध्यक्ष रमेश लिंगमपल्लीवार भाजपत दाखल झाले, तर राष्ट्रीय लोकनायक जनशक्ती पक्षाने मुनगंटीवार व भाजप यांना समर्थन जाहीर केले. याशिवाय, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संघटना व महिला बचत गटाकडूनही विविध पक्षांना समर्थन दिले जात आहे.

मतदारसंघांतील वॉर्डा-वॉर्डात ‘वेज-नॉनवेज’ जेवणावळी, पार्टी, चहा-नास्ता व दिवाळी फराळाचे कार्यक्रम सुरू आहेत. काही संघटनांच्यावतीने तर खास निवडणुकीसाठी दिवाळी पाडवा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे, या सर्वांचा खर्च उमेदवार स्वत:च्या खिशातून करीत आहेत. यासाठी शहरी व ग्रामीण भागांतील प्रत्येक वॉर्ड आणि प्रभागांत उमेदवाराने प्रतिनिधी नियुक्त केले आहेत. त्यांच्याच माध्यमातून या सर्व जेवणावळीचे कार्यक्रम आखले जात आहेत.

हे ही वाचा… मलकापूरमध्ये छुपी बंडखोरी, मतविभाजन कळीचा मुद्दा

हे ही वाचा… आर्थिकदृष्ट्या मागास भंडारा जिल्ह्याचे आमदार कोट्यधीश…

अपेक्षित गर्दी न झाल्याने उमेदवाराची स्नेहभेट कार्यक्रमाकडे पाठ

शहरातील एका प्रभागात एका राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराने अशाच छोटेखाणी स्नेहभेट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात येणाऱ्यांसाठी शाकाहारी व मांसाहारी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, गर्दी जमल्यानंतरही तिथे उमेदवार आलाच नाही. संबंधित आयोजक प्रतिनिधीला फोन करून किती लोक जमले, याची माहिती हा उमेदवार घेत होता. अखेर अपेक्षित गर्दी न जमल्याने उमेदवाराने स्नेहभेट कार्यक्रमाला जाणे टाळले. यामुळे उपस्थित लोक नाराज होवून निघून गेले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 chandrapur district new candidate party entry support and feast for nivadnuk print politics news asj