प्रश्न : लोकसभा निवडणुकीत तुम्ही ‘डबल इंजिन’ सरकारचा सातत्याने आग्रह धरताना दिसत होतात. असे असतानाही मतदारांनी लोकसभेत महायुतीला महाराष्ट्रात कौल दिला नाही. यावेळी तुम्ही याकडे कसे पहाता ?
उत्तर : गेल्या वेळी महाराष्ट्रात आघाडीला ज्या जागा मिळाल्या त्यामागे खोट्या कथानकाचा वाटा मोठा होता. संविधान बदलणार, आरक्षण संपवणार असे खोटे कथानक तयार केले गेले. त्याचा मोठा फटका महायुतीला बसला. मात्र, आरक्षणाचे खरे मारेकरी काँग्रेसच आहे हे राहुल गांधी यांच्या विधानावरून स्पष्ट झालेले आहेच. हे खोटे कथानक या निवडणुकीत मुळीत चालणार नाही. मतदारांची एकदा फसगत होऊ शकते. वारंवार होत नाही. केंद्र आणि राज्यात एकाच विचारसरणीचे सरकार असले तरच राज्याच्या विकासाला गती प्राप्त होते हे जनतेने अनुभवले आहे. आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात केंद्र सरकारसोबत अबोला धरल्याने राज्याचे मोठे नुकसान झाले. परंतु , ती अडीच वर्षे वगळता उर्वरित साडेसात वर्षात केंद्राने राज्यातील विकास कामांसाठी १० लाख कोटींचा घसघशीत निधी दिला आहे. आम्ही कोणताही विकास प्रकल्प केंद्राकडे घेऊन गेलो तर तो मंजूर होतो. मग तो मराठवाडा वॉटर ग्रीडला चालना देणारा प्रस्ताव असो किंवा साखर कारखान्यांची आयकर माफी असो… केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांचे शत्रू नसतात. राज्यात महाआघाडीचे सरकार आले तर राज्याचे अतोनात नुकसान होईल. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी ‘डबल इंजिन’ सरकारला पर्याय नाही.
हेही वाचा:लक्षवेधी लढत: जातीय ध्रुवीकरणामुळे भुजबळांसमोर कडवे आव्हान
प्रश्न : निवडणुकांच्या तोंडावर लोकानुनय करणाऱ्या अनेक घोषणा तुम्ही केल्या आहेत. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या राज्यात यामुळे आर्थिक आणीबाणी निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यातून कसा मार्ग काढणार ?
उत्तर : आमच्या योजना या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयार केलेल्या नाहीत. तात्पुरत्या स्वरूपात आणलेल्या नाहीत. तर त्यासाठी ठोस आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. नियमांच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच आम्ही नियोजन केले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही निवडणुकीला कलाटणी देणारी ठरेल असा अंदाज राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत. मात्र, ही एकमेव योजना नाही. आम्ही लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके तरुण, लाडके प्रवासी या सर्वांसाठी योजना आणल्या आहेत. या योजनांसाठी आवश्यक तरतूद आम्ही अर्थसंकल्पात केली आहे. ‘एफआरबीएम’ कायद्याच्या तरतूदीनुसारच सरकारने हे काम केले आहे. सरकारला कर्जाची जी मर्यादा घालून दिलेली आहे त्या मर्यादेतच हे नियोजन करण्यात आले आहे. राज्यातील अर्थव्यवस्थेला सध्या बळ प्राप्त झाले आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीतील आवक वाढेल आणि आम्ही निवडणुकांमध्ये जे वचन दिले आहे ते पूर्ण करण्याची आर्थिक ताकदही निर्माण होईल याची मला खात्री आहे.
प्रश्न : मुंबई तसेच आसपासच्या नगरांमधील नगर नियोजनाची आखणी ठरावीक उद्याोजकांना डोळ्यासमोर ठेवून तुमचे सरकार करत आहे असा आरोप विरोधक करत आहेत. याला उत्तर काय ?
उत्तर : विकास विरोधी माविआला कोणत्याही विकास कामांमध्ये खोडा घालण्याची खोड जडलेली आहे. धारावीची पहिली निविदा अंतिम टप्प्यात असताना ती आघाडी सरकारनेच रद्द केली. आज ते ज्या उद्याोजकाच्या नावाने खडे फोडत आहेत त्याच उद्याोजकासाठी हा घाट घातला गेला होता. त्यांचा विरोध हा वैयक्तिक स्वार्थासाठी असतो. यांनी बंगल्यावर बंगले बांधायचे आणि धारावीकरांनी तिथेच खितपत पडायचे ? त्यांच्याच भ्रष्ट कारभारामुळे मुंबईला ग्रहण लागले होते. आम्ही मुंबई खड्डेमुक्त, प्रदुषण मुक्त, अमलीपदार्थ मुक्त आणि भ्रष्टाचार मुक्तही करत आहोत. मुंबईत रेसकोर्सच्या ३५० एकर जागेवर सेंट्रल पार्क करत आहोत. अटलसेतू, कोस्टल रोड, मेट्रो असे त्यांनी खोडा घातलेले प्रकल्प आम्ही पुर्ण केले आहेत. आता मुंबईला जागतिक दर्जाचे शहर करण्यासाठी मुंबईला ग्लोबल फिंटेक कॅपिटल करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. मुंबईकरांना आमचे प्रामाणिक प्रयत्न दिसत आहेत.
हेही वाचा:लक्षवेधी लढत: मुख्यमंत्र्यांना दिघेंच्या कुटुंबातून आव्हान
प्रश्न : मनोज जरांगे यांनी आक्रमकपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणे सुरूच ठेवले आहे. तुमच्याविषयी मात्र ते मवाळ भूमिका घेतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावर तुमचे म्हणणे काय ?
उत्तर : कुणी कुणावर टीका करावी, करू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मुळात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मराठा समाजाला सर्वप्रथम आरक्षण देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनीच केले. फडणवीस यांच्या कार्यकाळात सरकारने नेटाने बाजू मांडल्याने उच्च न्यायालयात मराठा समाजाचे आरक्षण टिकले होते. परंतु त्यानंतर आलेल्या माविआ सरकारने सर्वोच्च न्यायालयात बाजू व्यवस्थित मांडली नाही, त्यामुळे आरक्षण टिकले नाही. आता आम्ही पुन्हा टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिले आहे. आज आरक्षणाच्या मुद्दयावर जे लोक आमच्या सरकारवर टीका करत आहेत त्यांच्या हाती अनेक वर्ष सत्ता होती. परंतु त्यांनी मराठा समाजाला कायम गृहीत धरले. आता आम्ही दिलेले आरक्षण रद्द करण्यासाठी कोण न्यायालयात गेले आहेत, त्यांना कुणाचा छुपा पाठिंबा आहे हे जरा तपासून पहा. मराठा समाजाच्या प्रगतीसाठी सरकारने अनेक ठोस कामे केली आहेत. त्यातून समाजाला न्याय मिळवून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
हेही वाचा: लक्षवेधी लढत: माजी मंत्री राजेश टोपे यांची कसोटी
प्रश्न : लोकसभा निवडणुकीत ‘व्होट जिहाद’चा मुद्दा गाजला. मुस्लीम मतांचे ध्रुवीकरणाच्या भीतीमुळे तुम्ही प्रचाराची दिशा बदलली आहे का?
उत्तर : लोकसभा निवडणुकांमध्ये खोट्या कथानकामुळे मतांचे मोठया प्रमाणावर ध्रुवीकरण झाले. त्याला तुम्ही काहीही नाव द्या पण काही ठिकाणच्या मतांचा टक्का तुम्हाला नजरेआड करता येणार नाही. लोकसभेतल्या काही जागा आम्ही जिंकता जिंकता हरलो. त्याला कुठली मते कारणीभूत ठरली याचा तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला तुमच्याच प्रश्नांचे उत्तर मिळेल. परंतु मी सुरुवातीलाच सांगितले त्याप्रमाणे आम्ही विकासाच्या मुद्दयावरच ही निवडणूक लढवत आहोत. पंतप्रधानांनी आपल्याला ‘एक है तो सेफ है’ असा संदेश दिला आहे. आज देशात कुठेही गेलो तरी आपल्याला सुरक्षित वाटते. कारण आपण त्यांच्या नेतृत्वाखाली एक झालो आहोत. देशाला महासत्ता करण्यासाठी आपली एकजूट महत्त्वाची आहे. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर एकजूटीने मतदान महत्त्वाचे आहे. ब्रिटिशांसारखीच फोडा आणि राज्य करा ही कॉग्रेसची नीती आहे. आमची नीती एकमेकांना जोडा आणि सुराज्य निर्माण करा अशीच आहे.
© 2024 All Rights Reserved. Powered by Summit